मुंबईः बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेतील दोन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षण उपसंचालकांच्या पातळीवर तयार करण्यात आलेल्या वस्तुस्थितीदर्शक चौकशी अहवालातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शाळेने पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजच गायब केल्याची बाब समोर आली आहे. तसेच पीडित मुलींना प्रसाधनगृहापर्यंत नेण्याचे काम करणाऱ्या महिला सेविका कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याने ही घटना घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणाचा अहवाल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी जाहीर केला. शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल प्राथमिक स्तरावरील असून यात करण्यात आलेल्या सूचना आणि त्याचा सखोल तपास पोलिस, संबंधित यंत्रणांनी करावा यासाठी दिला जाणार आहे. पीडित मुलगी बराच काळ वर्गात उपस्थित नसताना आणि प्रत्यक्षात ती वर्गात आल्यानंतर देखील तिच्या वर्तनाकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणात शाळा प्रशासनाने दिरंगाई आणि निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका दीपाली देशपांडे, सेविका कर्मचारी कामिनी गायकर आणि निर्मला भुरे यांना सहआरोपी करून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सत्यपरिस्थिती तपासून याबाबतचे कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले जाणार आहेत. तसेच शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया पन्नास टक्के पूर्ण झाली असून लवकरच सर्वंकष शासन आदेश जारी करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली आहे.
दरम्यान, पोक्सो प्रकरणातील शाळेच्या मुख्याध्यापिका, विश्वस्त मंडळातील अध्यक्ष व सेक्रेटरी फरार झाल्याची माहिती आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
‘पॅनिक बटन’साठी निविदा
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मोबाईलवर पॅनिक बटन देता येईल का? यासाठी महिला, गृहविभाग निर्णय घेत आहे. हे बटन दाबताच पोलिसांना माहिती जाते, ट्रॅकिंग सिस्टम त्यात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये अशी सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून त्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत आणि पदवीपर्यंत शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा मंत्री केसरकर यांनी केली. तसेच ज्या मुलीचा विनयभंग झाला आहे तिलाही तीन लाखांची मदत केली जाणार आहे.
- १३ तारखेला घटना घडली, १४ तारखेला मुलीच्या आजी-आजोबांनी वर्ग शिक्षिका दीपाली देशपांडे यांना ही माहिती दिली. परंतु. त्यांनी ही माहिती पुढे दिली नाही. तर दुसरीकडे मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनीही पोलिसांना माहिती देण्यास दिरंगाई केली
मुख्याध्यापिका म्हणून अर्चना आठवले यांनी कोणतीच कारवाई केली नाही. यामुळे आठवले आणि वर्गशिक्षिका देशपांडे यांच्यावर ‘पॉक्सो’च्या कलम १९/८ आणि २१/६ खाली कारवाई करावी
शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाला १४ ऑगस्टला माहिती दिल्याचे आणि नंतर १६ ऑगस्टला माहिती दिल्याचे सांगितले. यात मोठी तफावत असून यात व्यवस्थापन दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनीही ही घटना वरिष्ठांना वेळेवर कळविली नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. गुन्हा नोंदविण्यासाठी झालेल्या दिरंगाईची गृह विभागाने दखल घ्यावी. पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब का झाले याचीही चौकशी करावी?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.