बदलापूरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनेने महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. अक्षय शिंदे नामक व्यक्तीने दोन ४ वर्षांच्या चिमुरड्यांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा अमानुष प्रकार १२ ते १३ तारखेदरम्यान घडला. मुलांच्या पालकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.
मात्र, पोलिसांनी या घटनेला गंभीरपणे न घेतल्याचे आरोप पालकांनी केले आहेत. त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी तब्बल ११ ते १२ तास थांबावे लागले, असे समजते. त्यामुळे पोलीस प्रशासनावर तीव्र टीका होत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
या घटनेची माहिती सार्वजनिक केल्यामुळे सकाळच्या महिला पत्रकाराविरोधात शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी अर्वाच्च भाषा वापरली. यामुळे विरोधक आक्रमक झाले असून, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बदलापूरमध्ये दाखल होऊन देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सुषमा अंधारे यांनी या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. "गिरीश महाजन यांचा विभाग नसताना प्रत्येक गोष्टीत त्यांना पुढे केलं जातं. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अकार्यक्षम असतील, तर त्यांनी राजीनामा देऊन हिमालयात जावं आणि प्रत्येक वेळी पुढे पुढे करणाऱ्या गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री करावं," असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
सुषमा अंधारे यांनी वामन म्हात्रे यांच्या अटकेची मागणी केली आहे. "जोवर वामन म्हात्रे यांना अटक होत नाही, तोवर मी पोलीस स्टेशनवरून उठणार नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे पोलीस स्टेशनला जाऊन आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
सुषमा अंधारे यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "१० वर्षात तब्बल साडेसात वर्षे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यांच्याच कार्यकाळात क्राईम रेट आणि महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना अटक झाली नाही, अशा परिस्थितीत फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे," अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.