Badlapur School Crime Case Details
बदलापूर : कोलकाता येथील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणाने देशाला हादरवून टाकले असताना महाराष्ट्रातील बदलापूर येथेही घृणास्पद प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. बदलापूरच्या नामांकित शाळेत साडेतीन-चार वर्षांच्या दोन चिमूरडींवर लैंगिक अत्याचार झाला आहे आणि त्याविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळतेय. आंदोलकांनी या शाळेत सकाळी मोर्चा नेला, तर बलदापूर रेल्वे स्थानाकवरही स्थानिकांनी आंदोलन केले. जवळपास साडेतीन तासांपासून बदलापूरमधील नागरिक रस्त्यावर, रेल्वे रुळांवर ठाण मांडून आहेत. ही घटना नेमकी काय, उघडकीस कशी आली आणि या घटनेत शाळा प्रशासनाची चूक काय, हे जाणून घेऊया.
बदलापूरच्या शाळेत नेमके काय घडले?
बदलापूर पूर्व येथील नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीने घरी आल्यानंतर आईवडिलांना शाळेत काय घडलं हे सांगितलं. त्या चिमुरडीवर शाळेतील 'काठीवाल्या दादा'ने अत्याचाराचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, आणखी एका मुलीवर शाळेतच अत्याचार झाल्याचे समोर आले. या मुलीचे आई-वडील कामानिमित्त कल्याणमध्ये राहत असून ती सध्या आजोबांसोबत राहते. या पीडित मुलीलाही काही दिवसांपासून त्रास होत होता. तसेच ती शाळेत जाण्यासाठी तयार होत नव्हती; मात्र घाबरलेली असल्यामुळे काहीच सांगत नव्हती. आजोबांना शंका आल्याने त्यांनी विचारपूस केली आणि मुलीने संपूर्ण घटनाक्रमच सांगितला.