Latest Kalva News: महिन्याभरापूर्वी बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या नराधम आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तळोजा कारागृहातून चौकशीसाठी ठाण्यात जात असताना कल्याण शिळफाटाजवळ पोलिस व्हॅनमध्ये ही घटना घडली.
आरोपीने शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून तीन राऊंड गोळीबार केला. यावेळी एक पोलिस अधिकारी जखमी झाल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र ही चकमक नसून एन्काऊटर घटवून आणल्याचा आरोप आता विरोधक करत असल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.
बदलापूर बलात्कार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. त्याला अटक केल्यानंतर तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच त्याने गुन्ह्याची कबूली दिल्याचे समजते. मात्र या प्रकरणी अधीक चौकशी करण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाचे पथक सोमवारी २३ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तळोजा कारागृहात पोहचले.
आरोपी अक्षय शिंदेचा ताबा घेऊन जात असताना कल्याण शिळफाटाजवळ त्याने पोलिसांच्या हातातून बंदूक हिसकावून गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने आधी तीन राऊंड फायर केला.
त्यात पोलिस अधिकारी निलेश मोरे यांच्या पायावर गोळी लागल्याने स्वसंरक्षणासाठी इतर पोलिसांनाही गोळीबार करावा लागला, त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर जखमी पोलिस अधिकारी आणि आरोपी अक्षय शिंदेला ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी पोलिसांनी अक्षय शिंदेला मृत घोषीत केले.
आरोपी अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्याची चौकशी करण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तर सर्वप्रथम आरोपी अक्षय शिंदे यांने बंदूक हिसकावून गोळीबार केला. त्यात पोलिस जखमी झाल्याने स्वसंरक्षणासाठी पोलिसांनाही गोळीबार करावा लागल्याची कबूली उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
गोळी लागून अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे. एकीकडे बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या महिन्याभरानंतरही संबंधित शाळेतील संचालक अजूनही फरार आहे. दुसरीकडे गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर ही घटना घडल्यामुळे या गुन्ह्यातील ‘मोठे मासे’ वाचवण्यासाठी ही घटना घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी बदलापूर पोलिस सुरुवातीपासूनच दिरंगाई करत असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पण बदलापूरकरांनी केलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे आश्वासन दिले होते. तसेच या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात आला. पण आरोपीच्या पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून अधिक तापासासाठी घेऊन ठाण्यात येत असताना ही घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा पोलिस संशयाच्या घेर्यात सापडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.