मुंबई : अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनाचे , सुशोभीकरणाचे काम शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सुरु आहे. गेल्या काही महिन्यात 'कोरोना'मुळे हे सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरु होते. आज आमदार सरनाईक व पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी किल्ल्यात सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावर याचवर्षी ३१ डिसेंबरपूर्वी किल्ला सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले जाईल , अशी ग्वाही पालिका आयुक्तांनी दिलीय. तर नवीन वर्षात घोडबंदर किल्ल्याचे नवीन रूप आपल्याला पाहायला मिळेल , या सुशोभीकरणाचे लोकार्पण नवीन वर्षात महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्यजी ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे.अशी माहिती प्रताप सारणी यांनी दिली.
घोडबंदर किल्ल्याचे संवर्धन व या परिसराचे सुशोभीकरण व्हावे म्हणून आमदार प्रताप सरनाईक हे आमदार झाल्या दिवसापासून प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन हा किल्ला राज्य संरक्षित किल्ला म्हणून 'महाराष्ट्र वैभव- राज्य संरक्षित स्मारक योजने'अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेस संगोपनार्थ देण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आवश्यक विविध परवानग्या , जिल्हा नियोजन समितीकडून कामासाठी निधी मिळवून किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले होते. काम प्रगतीपथावर असतानाच कोरोनाच्या संकटामुळे काही कामे रखडली आहेत.
घोडबंदर किल्ल्यात सुरु असलेले सुशोभीकरण व नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आयुक्तांनी कामाची पाहणी करावी,अशी विनंती आमदार सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार आज आ. सरनाईक, आयुक्त दिलीप ढोले, पालिकेचे अधिकारी यांनी कामाची पाहणी केली. घोडबंदर किल्ल्यात सुरु असलेल्या प्रत्येक कामाची बारकाईने माहिती घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. घोडबंदर किल्ल्यात एक मोठा हौद असून त्याठिकाणी 'म्यूजिकल फाउंटन'चे काम सुरु करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार किल्ल्याची डागडुजी , नूतनीकरण करण्यात आले आहे. किल्ल्यात मोकळ्या जागेत एक छोटे अँपी थिएटर करावे जेणेकरून विद्यार्थी किंवा इतिहास प्रेमी किल्ला पाहण्यासाठी आल्यास त्यांना किल्ल्याची माहिती देता येईल. किल्ल्याच्या आजूबाजूला गवत , झुडपे वाढली असून ती सर्व काढून त्याठिकाणी फुलझाडे लावून सुशोभीकरण करावे , किल्ल्याच्या परिसराचे झाडे लावून सुशोभीकरण केले जावे अशा सूचना आमदार सरनाईक यांनी केल्या , त्या आयुक्तांनी मान्य करीत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
पालिका प्रशासनाने यापुढे वेळेचे बंधन ठेऊन दिलेल्या कालमर्यादेत हे किल्ला सुशोभीकरणाचे काम पूर्ण करावे, असे आ. सरनाईक यांनी सांगितले. त्यावर कोणत्याही परिस्थितीत ३१ डिसेंबरपर्यंत सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले जाईल ,आमदार सरनाईक यांनी दिलेल्या इतर सूचनांप्रमाणे सुशोभीकरण कामाला गती दिली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. किल्ल्याच्या शेजारी असलेल्या जागेत भव्य 'शिवसृष्टी' प्रकल्प मंजूर झाला आहे. शिवसृष्टीसाठी मंजुरी व प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून निधीही देण्यात आला आहे.
त्यामुळे घोडबंदर किल्ल्यातून शिवसृष्टी प्रकल्पात जाण्यासाठी रस्ता असावा, अशी अपेक्षा आ. सरनाईक यांनी व्यक्त केली. त्यावर हा रस्ता तयार करण्याबाबत पालिका प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्यजी ठाकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे व मीरा भाईंदर महापालिकेतील सर्व लोकप्रतिनिधी-पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घोडबंदर किल्ला सुशोभीकरण प्रकल्पाचे उदघाटन नवीन वर्षात जानेवारी महिन्यात केले जाईल,असे आमदार सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे उदघाटन होत असताना किल्ल्या शेजारी उभ्या राहणाऱ्या भव्य शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजनही त्याच दिवशी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा मनोदय आ. सरनाईक यांनी बोलून दाखवला. यावेळी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलिप ढोले, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, विरोधी पक्षनेता नगरसेवक प्रविण पाटील गटनेते शहर संघटक निलम ढवण, नगरसेवक उपजिल्हाप्रमुख राजू भोईर, उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील, उपजिल्हासंघटक सुप्रिया घोसाळकर, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.