पनवेल : पावसाळ्यात दर वर्षी कर्नाळा अभयारण्य पर्यटकांनी गजबजते. मात्र, या वर्षी ना पर्यटकांचा गडबड गोंधळ, ना बंदोबस्त. कोरोनामुळे सरकारने पर्यटकांना पर्यटनस्थळांवर फिरण्यास बंदी घातल्याने येथील पक्षी अभयारण्य सुने असून, भिंती मात्र बोलू लागल्या आहेत. ही किमया साधली आहे अभयारण्यातील बंदोबस्तावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी. बंदोबस्तावरील ताण कमी झाल्याने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत कल्पकतेतून अभयारण्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या भिंती प्राणी-पक्ष्यांच्या चित्रांनी रेखाटल्या आहेत. त्यामुळे कायम निर्जीव असलेल्या या भिंती येथून मार्गस्थ होणाऱ्या पर्यावरणप्रेमींना साद घालत असल्याचा भास होत आहे.
कोरोनामुळे पावसाळ्यातील ऐन हंगामात पर्यटनाला बंदी घातल्याने नेहमीच पर्यटकांनी गजबजलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यातील अधिकाऱ्यांवरील बंदोबस्ताचा ताण कमी झाला आहे. या अधिकाऱ्यांनी पर्यटकांच्या गर्दीतून मोकळा मिळालेला वेळ सत्कारणी लावत आपल्या कल्पकतेने अभयारण्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या भिंतीं आणि इतर ठिकाणी निसर्गातील प्राणी, पक्ष्यांसोबत सजीवसृष्टींची चित्रे रेखाटून निर्जीव भिंतींना बोलके केले आहे. त्यामुळे अभयारण्यातील आकर्षणात आणखी भर पडली आहे.
मुंबई-पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यातून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ जातो. नुकतीच महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी अभयारण्यातील अनेक डेरेदार वृक्षांची तोड केली आहे. महामार्गाच्या कामासाठी अभयारण्य क्षेत्रातून जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या संरक्षक भिंती उभारल्या आहेत. यासोबतच अनेक ठिकाणी छोटे-मोठ्या पुलांसाठी बांधकाम करण्यात आल्याने कर्नाळा पक्षी अभयारण्याचे प्रवेशद्वार म्हणजे सिमेंट काँक्रीटचे जंगल आहे का, असा भास होऊ लागला आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुनील लिमये व अर्जुन म्हसे या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सिमेंटच्या भिंतींवर निसर्गाची चित्रे रेखाटून भिंतींना बोलते करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती वनरक्षक युवराज मराठे यांनी दिली आहे.
प्रत्येक भिंत निसर्ग, प्राणी-पक्ष्यांनी बोलू लागल्याने येणाऱ्या पर्यटन हंगामात पर्यटक चित्रांनी भारावून जातील. भिंतीच्या माध्यमातून अभयारण्याचा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. या कामातून आम्हालाही समाधान मिळते. याचा खर्च आकस्मिक निधीतून केला आहे.
- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी
कर्नाळा दृष्टिक्षेप
- अभयारण्यात १२५-१५० जातीचे पक्षी
- १२ चौरस किमी क्षेत्रफळात विस्तार
- पनवेलपासून १२ किलोमीटरवर
- आपटे-कल्हाया व रानसई-चिंचवण गावांच्या पंचक्रोशीत वसलेले.
- मलबार, व्हिसलिंग कोकीळ, भोरड्या, तांबट, कोतवाल आदींचा वावर
- पक्ष्यांव्यतिरिक्त भोकरे, रानमांजर, माकडे, ससे इत्यादी प्राण्यांचा अधिवास
(संपादन : उमा शिंदे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.