मुंबई : कोविडचे उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांना पुन्हा श्वसनाचा त्रास झाल्यामुळे वरळीच्या एनएससीआय डोम या कोविड केंद्रात दाखल करावे लागले आहे. त्यांच्यावर सध्या केंद्रात उपचार सुरु असुन प्रकृती ठिक आहे.
या दोन्ही रुग्णांना श्वास घ्यायला त्रास झाल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी केंद्रात दाखल केले. रुग्णांना होणाऱ्या त्रासामूळे पल्मनरी फायब्रोसिसचा धोका जाणवू लागला. त्यानुसार, डॉक्टरांनी तात्काळ ऑक्सिजन लावून उपचार सुरु केले. सर्वात आधी केईएम रुग्णालयात कोविडमधून बरे होऊन गेलेले रुग्ण पुन्हा दाखल झाले होते. त्यानंतर आता वरळीच्या एनएससीआय या कोविड केंद्रात पल्मनरी फायब्रोसिसचे दोन रुग्ण पुन्हा दाखल झाले आहेत. त्यानुसार, कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना पल्मनरी फायब्रोसिस या आजाराचा धोका जास्त प्रमाणात असू शकतो अशी भीती तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
10 जुलै या दिवशी कोविड केंद्रात पहिला रुग्ण श्वासाची समस्या घेऊन आला. 14 जुलैला त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला. 20 जुलैला त्यांचा ऑक्सिजन काढला. त्यानंतर ते नॉर्मल श्वास घेत होते. 27 जुलैला त्यांना पुन्हा ऑक्सिजनची गरज लागली. त्यादरम्यान, त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. मात्र, गेले 10 ते 12 दिवसांपासून ते ऑक्सिजनवर आहेत. डॉक्टरांनी त्यांना पल्मनरी फायब्रोसिस झाल्याचा निष्कर्ष काढत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रमाकांत लिमये (बदललेले नाव) 20 जुलै या दिवशी श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून पुन्हा कोविड केंद्रात दाखल झाले. त्याच दिवसापासून त्यांना ऑक्सिजन सुरु करण्यात आला. 4 ते 5 दिवस ऑक्सिजनवर ठेवून एका आठवड्यानंतर म्हणजेच 1 ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज दिला गेला आणि ते घरी गेले. दोन ते तीन दिवसांनंतर त्यांना पुन्हा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे, 3 ऑगस्ट या दिवशी त्यांना कोविड केंद्रात आणले गेले. त्याच दिवसापासून ऑक्सिजन सुरु केले गेले. आता काही दिवसांपासून ते नॉर्मल श्वास घेत आहेत. त्यामुळे, या दोन्ही केस मध्ये पल्मनरी फायब्रोसिसचा धोका असू शकतो.
आपल्याकडे दोन रुग्ण परत आले आहेत. ते बरे झाले घरी गेले आणि पुन्हा त्यांचा ऑक्सिजन कमी झाला आणि ते इथे आले. दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून आल्या आहेत. कोरोना झाल्यानंतर 10 दिवस त्याचा जास्त प्रादुर्भाव असतो. त्यानंतर आपला संसर्ग कमी होतो. 10 ते 15 दिवसांमधील जो काळ असतो तो रुग्णांसाठी खुप जास्त रिस्की असतो. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती साठी टोसीलीझुमॅब, रेमडेसिवीर हे इंजेक्शन दिले जातात. पण, त्याने प्रतिकारक शक्ती कमी होऊन ते पुन्हा संसर्ग घेऊन येऊ शकतात किंवा ज्यांच्या फुप्फुसावर कोरोनाचा जास्त प्रभाव झाला आहे ते पल्मनरी फायब्रोसिस घेऊन येऊ शकतात. त्यामूळे, इंजेक्शनचा वापर कधी आणि कसा करायचा? हे देखील पाहिले पाहिजे, असं एनएससीआय डोम प्रमुख डॉ. निता वर्टी यांनी म्हटलंय
फुप्फुसांचा फायब्रॉसिस म्हणजे काय ?
जेव्हा फुफ्फुसाच्या ऊतींना इजा होते किंवा भेगा पडतात तेव्हा होणाऱ्या आजाराला फुप्फुसांचा फायब्रॉसिस असे म्हणतात. या जाड, कठीण ऊतीमुळे फुप्फुसांचे कार्य व्यवस्थित पार पडत नाही. त्याचप्रमाणे फुप्फुसांच्या फायब्रॉइडने अधिक गंभीर स्वरूप धारण केले की, तुम्हाला श्वास लागतो आणि परिस्थिती बिकट होऊन बसते. फुप्फुसांचा फायब्रॉसिस झाला असेल, तर तुम्हाला धाप लागणे, कोरडा खोकला, थकवा, अचानक वजन कमी होणे, स्नायू आणि साध्यांमध्ये वेदना होणे, हाताची किंवा पायाची बोटे रुंद आणि गोलाकार होणे यांसारखी लक्षणे दिसतात. कोरोनाचा आजार बरा झाल्यानंतरही जर श्वसनाच्या त्रासाच्या काही व्याधी झाल्या तर घाबरून न जाता डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार करावेत. असं झेन मल्टीस्पेशॅलिटी रुग्णालयातील फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. अरविंद काटे म्हणालेत.
( संपादन - सुमित बागुल )
beware if covid test is negative but some patients are detected with respiratory problems
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.