Kapil Patil : भिवंडीत वेगवान प्रवासाचा कपिल पाटील यांचा संकल्प!

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढील पाच वर्षांत नागरिकांना वेगवान प्रवासाची सुविधा देण्याचा संकल्प केला आहे.
Kapil Patil
Kapil PatilSakal
Updated on

ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढील पाच वर्षांत नागरिकांना वेगवान प्रवासाची सुविधा देण्याचा संकल्प केला आहे. ठाणे-भिवंडी वाहतूककोंडी दूर करणारा माजिवडा ते वडपे हा बारा पदरी मार्ग काही महिन्यांत पूर्ण झाल्यानंतर वाहतूककोंडीतून सुटका होईल.

तर पुढील दोन वर्षात रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा दरम्यान दहा मिनिटांत लोकल, `डीएफसी' पूर्ण झाल्यावर भिवंडीहून दिवा व वसईरोड येथे लोकलसेवा, पी एम ई बस सेवा, कल्याण ते वसईपर्यंत रो-रो सेवा सुरू करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी कोल्ड स्टोरेज आणि महिला सक्षमीकरणाबरोबरच ७५ हजार लखपती दीदी करण्याचा संकल्प केला आहे.

लोकसभा निवडणुकीनिमित्ताने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचे संकल्पपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले. या संकल्पपत्रात १० वर्षांत पूर्ण केलेल्या कामांबरोबरच आगामी काळात मतदारसंघाच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचा संकल्प करण्यात आला आहे.

खासदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये बारवी प्रकल्पग्रस्तांतील ४१८ तरुणांना नोकरी मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षांत मतदारसंघातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचा निर्धार केला आहे. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग पूर्ण करणे, कासगाव-कामोठे रेल्वे सेवेला मंजुरी, पीएम ग्रामसडक योजनेतून दुर्गम भागात रस्ते आदी कार्य करण्याची हमी देण्यात आली आहे.

पीएम आवास योजनेंतर्गत पुढील पाच वर्ष धान्य, प्रत्येक गरीब कुटुंबाला पीएम आवास योजनेतून मोफत घरे, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तीर्थयात्रा, नवउद्योजक तरुणांसाठी २० लाखांची वाढीव क्रेडिट आदी आश्वासने देण्यात आली आहेत.

त्याचबरोबर भिवंडीतील २०० बेडचे माता-बाल रुग्णालय लवकर कार्यान्वित करणे, नोकरदार महिलांसाठी कल्याण व बदलापूर येथे हॉस्टेल, पिण्याच्या पाण्यासाठी भिवंडी शहरातील ४२६ कोटींची पाणी योजना पूर्ण करणे, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तानसा ते कशेळीपर्यंतच्या गावांना जादा पाणी, ग्रामस्थांच्या सहकार्याने छोटी धरणे उभारण्याची ग्वाही दिली.

तसेच खेळाडूंसाठी कल्याण येथे इनडोअर स्टेडियम पूर्ण करणे, बदलापूर येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियम पूर्ण करणे आदींबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीकोनातून माळशेज घाट, माहुली आणि सिद्धगड येथे पर्यटनाला चालना देण्याचे जाहीर केले आहे.

कुळगाव-बदलापूरसाठी स्वतंत्र महापालिका, बदलापूर व रायते भागात मल्टीमॉडेल लॉजिस्टिक केंद्र, भिवंडीत लॉजिस्टिक क्लस्टर, वाडा व शहापूर तालुक्यातील नागरिकांना इको-सेन्सेटिव्ह झोनमधून दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.