भिवंडी : देहव्यापाराच्या दलदलीत सापडलेली आई... वडिलांचा थांगपत्ता नाही... समाजाकडून वाट्याला आलेला सदैव तिरस्कार, हेटाळणी... चारही बाजूने नकारात्मकतेच्या नरकात लहानाचे मोठे झाल्यानंतर एक तर मुलींना मिळतो तो वारसा हक्काने वेश्या व्यवसाय अन् मुले एक तर दलाल बनतात किंवा गुन्हेगारीच्या वाटेवर जातात.
वारांगनांच्या वाट्याला आलेले हे जगणे थांबावे, किंबहुना त्यांचे आयुष्य नवजीवनाने उजळून जावे यासाठी भिवंडी महापालिकेने या चिमुरड्यांसाठी निवारा केंद्र सुरू करण्यास पुढाकार घेतला आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून भिवंडीतील देह व्यवसायात असणाऱ्या महिला व त्यांची बालके यांचे शिक्षण, संगोपन व पुनर्वसन होण्यासाठी हा पुनर्वसन प्रकल्प राबविला जात आहे. भिवंडी शहरातील कल्याण रोड प्रेमनगर भागात देहव्यापार करणाऱ्या महिलांच्या वस्तीतील वय वर्षे ३ ते १० वयोगटातील चिमुरड्यांसाठी ठाणे महिला व बाल विकास विभाग, श्री साई सेवा संस्था यांच्या प्रयत्नातून नवजीवन निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या निवार केंद्राचे उद्घाटन मुक्ती एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे, ठाणे जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर सावंत आदी उपस्थित होते.
विनामूल्य संगोपन
महिला व त्यांची बालके यांचे शिक्षण, संगोपन व पुनर्वसन प्रकल्पास निवारा गृह या योजनेंतर्गत अनुदानित तत्त्वावर नवजीवन निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये या बालकांच्या राहण्याची, शिक्षणाची, तसेच आहाराची संपूर्ण सुविधा विनामूल्य तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिक्षणाची गोडी लागणार
निवारा केंद्रात बालकांना ठेवण्यासाठी त्यांच्या माताना समुपदेशन करणे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व सदर महिलांमध्ये स्वयंरोजगाराची आवड निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. ३ ते १० या वयोगटातील ही सर्व मुले असल्याने त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, ते संस्कारक्षम व्हावेत यासाठी त्यांच्यावर निवारागृहात मार्गदर्शन होणार आहे. विशेष म्हणजे चिमुरड्यांना निवारागृहात घेऊन जाणाऱ्या वाहनास मुक्ती एक्स्प्रेस असे समर्पक नाव देण्यात आले आहे.
संस्काराचे बाळकडूही
या निवारा केंद्रात बालकांच्या जीवनामध्ये भविष्यात येणारा अंधार नष्ट होऊन त्यांच्यावर चांगल्या संस्काराचे बाळकडू रुजविण्याचा प्रयत्न नक्की यशस्वी होणार असल्याचा विश्वास साई सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्वाती खान यांनी व्यक्त केला आहे. येथील रहिवाशांनी मतदार नोंदणी करून ओळखपत्र करून घेण्याचे आवाहन आयुक्त डॉ. देशमुख यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.