मुंबई: 'बर्ड फ्लू'च्या भीतीने खवय्यांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवल्याने चिकनची मागणी घटली आहे. तर खवय्यांनी मटण आणि मासे खाण्याला पसंती दिल्याने मटणाचे दर किलोमागे 200 रुपयांनी वाढले आहेत. त्याचबरोबर मासळीची मागणी वाढली असून पर्यायाने त्यांचे दर ही वाढले आहेत.
मार्गशीर्ष महिना गुरुवारी संपला. त्यामुळे खवय्यांची मांसाहाराकडे आपला मोर्चा वळवला. त्यातच शुक्रवारी किंकरांत आल्याने मांसाहाराचा चांगला बेत जमला. यावेळी चिकन मोठ्या प्रमाणावर फस्त करतात. मात्र सध्या राज्यभरात 'बर्ड फ्लू'ने हाहाकार माजवल्याने खवय्ये मटण आणि मासळीला पसंती देत आहेत. त्यामुळे ऐन हंगामात चिकन विक्रेत्यांचे चिकन विकले गेले नसल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे.
खवय्यांची चिकनकडे पाठ फिरवल्याने मटण मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. रविवारी ही खवय्ये मांसाहाराला पसंती देत असल्याने बॉयलर चिकनला मोठी मागणी असते. यावेळी मात्र परिस्थिती उलटी दिसली. अनेक चिकन शॉप ओस पडली होती तर मटणाच्या दुकानात तसेच मासळी बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती.
मुंबईत 'बर्ड फ्लू'चा प्रभाव नसला तरी ग्राहक चिकन खाणे टाळत आहेत. कोरोनामुळे चिकन विक्रेत्यांचे कंबरडे मोडले त्यात आता 'बर्ड फ्लू'मुळे ही प्रचंड नुकसान होत असल्याचे भायखळा येथील चिकन विक्रेते समीर नाईक यांनी सांगितले. कोरोना काळात खूप नुकसान झाले. मार्गशीर्ष महिना संपल्यावर आता कुठं हंगामाला सुरुवात झाली होती. त्यामुळे नुकसान भरून निघेल अशी अपेक्षा होती. किंक्रांतीला त्यानंतर आलेल्या रविवारी देखील खूप माल संपतो त्यामुळे सर्व तयारी करून ठेवली होती. मात्र दिवसभरात एकही ग्राहक फिरकले नसल्याचे ही त्यांनी सांगितले.
मटण खरेदीसाठी आता ग्राहक येत आहेत. मटण शॉपवर येणाऱ्या ग्राहकांची संख्या 40 ते 50 टक्के वाढल्याने मटणाची मागणी वाढली आहे. पर्यायाने मटणाचे दर ही वाढले असून किलोमागे 150 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. पूर्वी मटणाचा दर 600 रुपये होता तो आता 750 रुपयांच्यावर पोहोचला असल्याचे दि बॉम्बे मटण डीलर असोसिएशनचे उपाध्यक्ष जुल्फिकार इस्माईल यांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांपासून चिकनचा ग्राहक मटणाकडे वळाल्याने मटणाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून बकरे येतात. मात्र बर्ड फ्लूमुळे बकऱ्यांचे दर ही वाढले आहेत. बकऱ्यांचे दर 4 ते 6 हजार रुपये होते ते त्यात आता 2000 ते 2500 रुपयांची वाढ झाल्याचे मटण विक्रेते नाना मुस्ताक यांनी सांगितले. मात्र मुंबईत येणाऱ्या बकऱ्यांना ठाणे, पुणे, नाशिकमधून देखील खरेदी वाढल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
चिकनकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने रविवारी मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी दिसली. ग्राहक वाढले असले तरी समुद्रात मासळी कमी सापडत असल्याने मासळीचा तुटवडा आहे. पर्यायाने मासळीचे दर ही 40 ते 50 टक्क्यांनी वाढल्याचे मासळी पुरवठादार संतोष पवार यांनी सांगितले. पापलेटचा दर सर्वाधिक वाढला असून 250 ग्रॅमची 600 रुपयांची पापलेटची जोडी आता 800 ते 850 रुपये झाली आहे. सुरमईचे दर किलोमागे 600 वरून 800 , बांगडा 200 वरून 250 ते 300 , बोंबिल 150 वरून 200 रुपये विकले जात आहेत.
बर्ड फ्लूमुळे 50 टक्के मांसाहारी पदार्थांची विक्री कमी झाली त्यात मच्छी आणि मटणाच्या खरेदी दरात 15 टक्के वाढ झाली. तर दुसरीकडे बर्ड फ्लूमुळे कुठलंच मांसाहारी खाणेच धोक्याचे असल्याचे खवय्यानी सध्या मांसाहारी खाणेच नापसंत केले आहे.
प्रीतम सिंग हॉटेल व्यावसायिक
बकऱ्याचे दर अडीच हजार रुपयांनी वाढल्याने मटणाचे दर किलोमागे 200 रुपयांनी वाढले आहेत. मात्र बकऱ्यांचे आवक तेवढीच असून मागणी वाढली आहे. मात्र हॉटेल, बार, रेस्टॉरंटला जुन्याच दरात मटण पुरवावे लागत असल्याने दर वाढून ही आम्हाला नुकसान सोसावे लागत आहे.
जुल्फिकार इस्माईल , उपाध्यक्ष , दि बॉम्बे मटण डीलर असोसिएशन
----------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Bird flu effect mutton price up by Rs 200 per kg fish price increased
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.