महाराष्ट्राच्या खडकाळ भूमीत १३२ कमळे उगवतील हे भारतीय जनता पक्षाला १५ वर्षांपूर्वी सांगितले असते तर सामान्य कार्यकर्त्याला पटलेही नसते. मात्र दिल्लीत भाजपचा नियोजन आराखडा तयार होता. त्याचे मूर्त रूप आता दिसले असून भारतीय जनता पक्षाने लढविलेल्या जागांपैकी जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा विक्रम घडविला आहे. साधारण २६ .२२ टक्के मते मिळवत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. या यशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुशल नियोजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना दिलेली साथ, भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या दोन नेत्यांचे बारीक लक्ष आणि असंख्य कार्यकर्त्यांचे प्रयत्न दडलेले आहेत.