ठाणेकरांच्या स्वतंत्र धरणासाठी शिवसेनेला जाग येईल का? भाजपची खरमरीत टीका 

ठाणे महापालिका
ठाणे महापालिका
Updated on

ठाणे  : ठाणे महापालिकेने स्वतंत्र धरण उभारण्याची 2003 मध्ये सुवर्णसंधी गमावल्यानंतर झोपी गेलेल्या शिवसेनेला आता पुन्हा जाग आली आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली. 2003 मध्ये स्वतंत्र धरण नाकारल्यानंतर जुलै 2016 मध्ये पुन्हा स्वतंत्र धरणाच्या सत्ताधारी शिवसेनेने डरकाळ्या फोडल्या होत्या; मात्र आता पुन्हा चार वर्षांनंतर धरणासाठी "फुकाची बडबड' केली जात असून कृती शून्य आहे, अशी टीका नारायण पवार यांनी केली. 


राज्यात कोठे धरणे असावीत, याबाबत चितळे किंवा गोडबोले समितीने अहवाल दिला होता. त्या वेळी ठाणे ही नगर परिषद असल्याने शाई धरण मुंबईला देण्याचे ठरवण्यात आले होते; मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात हे धरण ठाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही धरणाला मंजुरीही दिली होती. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही शाई धरण विकत घ्यावे, असे सत्ताधारी शिवसेनेला सुचवले होते. त्या वेळी फक्त 450 कोटी रुपयांत धरण मिळत होते;

तर या धरणाच्या सर्वेक्षणासाठी ठाणे महापालिकेने 2007 मध्ये 71 लाख रुपयांचा निधीही मंजूर केला होता; मात्र ठाणे महापालिकेने धरणाबाबत गांभीर्याने भूमिका घेतली नव्हती. त्यानंतर एका अर्थसंकल्पात 25 कोटी रुपयांची तरतूदही केली होती; मात्र धरण घेण्याऐवजी एमएमआरडीएने धरणाचे काम करण्याचे सुचवले होते, याकडे भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे. 

आव्हाडांच्या सूचनेकडे लक्ष द्या 
यापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची राजवट असताना शाई धरणाबाबतची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सूचना शिवसेनेने नाकारली होती. आता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले आहेत. सध्या एकाच मंत्रिमंडळात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड मंत्री आहेत. त्यामुळे आता तरी मंत्री आव्हाड यांची सूचना ऐकावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. 

BJP criticizes Shiv Sena over independent dam in thane

(संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.