डोंबिवली : गावातील पायाभूत सुविधा व बेकायदा बांधकामांचे उच्चाटन याची तजवीज राज्य सरकारनेच करावी. मगच गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावी अशी भूमिका भाजप नेते गणेश नाईक यांनी घेताच ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेते नाईक यांची मागणी रास्त आहे. त्यांच्या भूमिकेला पाठिंबा आहेच. मात्र नाईक आपली भूमिका मवाळ करतील अशी अपेक्षा आम्हाला असून त्यांची समजूत काढू. गावांना विकासापासून ताटकळत ठेवणे योग्य रहाणार नाही असे मत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले आहे. यामुळे नाईक शिंदे वादात आता पाटील मध्यस्थी करून 14 गावांचा प्रश्न विधानसभा निवडणुकी आधी मार्गी लागेलं का याची चर्चा सुरू झाली आहे.