MLA Kisan Kathore: बदलापूरमध्ये एका बालविद्यालयात दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होतोय. बदलापूरमध्ये तर लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला तातडीने फासावर लटकवा, अशी मागणी आंदोलकांची आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात बसलेले आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर भाजप आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर संताप व्यक्त होतोय. कथोरे म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी आहे. परंतु सुरु असलेलं आंदोलन भरकटलं आहे. शाळा सोडून लोक रेल्वेकडे वळले. जे आंदोलक ट्रॅकवर आंदोलन करत आहेत ते बदलापूरचे नसून बाहेरुन आलेले आहेत.
आमदार कथोरे पुढे म्हणाले की, लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात आलेली असून संस्थाचालकाची चौकशी होणार आहे. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅक अडवून बदलापूरकरांना वेठीस धरलंय. आंदोलन बघून ही ठरवून केलेली स्टंटबाजी असल्याचं कथोरे म्हणाले.
''बदलापूरच्या प्रकरणामध्ये राजकारण करु नये, बाहेरुन आलेल्या लोकांनी रात्रीतून बॅनर तयार करुन लावले. लाडकी बहीण योजनेवरुन तयार केलेले बॅनर म्हणजे राजकारणाचा भाग आहे.. हे उल्हासनगरमधून आले आहेत.'' असा आरोप कथोरे यांनी आंदोलकांना उद्देशून केला.
दरम्यान, बदलापूरमध्ये नागरिक आंदोलनावर ठाम असून त्यांना पोलीस अधिकारी समाजावून सांगण्याचा आणि आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत.
आंदोलकांना आवाहन करताना पोलिस म्हणाले की, या घटनेची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त हजर आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींचा खटला आपण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवणार आहोत. त्यासाठी सरकारी वकिलांची नेमणूकही करण्यात येणार आहे. इतकं सांगूनही नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे यावर ते ठाम असून 'वुई वॉन्ट जस्टिस' अशी घोषणाबाजी आंदोलक करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.