डोंबिवली - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांचा प्रवास खड्डेमुक्त व्हावा यासाठी मुंबई- गोवा महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. या कामाची जबाबदारी कोकणसुपूत्र आणि डोंबिवलीकर असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे आहे. त्यामुळे कामात कुठेही कसूर होऊ नये याची जबाबदारी त्यांनी डोंबिवलीतील भाजप पदाधिकार्यांवर सोपवल्याची चर्चा आहे.
हे डोंबिवलीच्या ‘सुभेदारांच्या’ चकारा गेल्या काही दिवसांपासून कोकणात वाढल्या आहेत. गावी जाण्याच्या बहाण्याने ते महामार्गाचे काम तपासून ते कसे वेगवान आणि उत्तम चालले आहे, हे आपली ओळख लपवून समाजमाध्यमांवर सतत दाखवत आहेत.
गणेशोत्सवसाठी गावाला जाण्यासाठी चाकरमानी गर्दी करतात. कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकींग तर महिने दोन महिने आधीच फुल्ल होत असल्याने विशेष रेल्वे सेवा चालवली जाते. रेल्वे सेवेवर ताण येऊ नये तसेच रेल्वेचे बुकींग न झालेल्या कोकणवासीयांसाठी बसेसची सुविधा उपलब्ध असते.
राज्य शासनाकडून मोफत बस सेवा चालविल्या जातात. वाहतूकीसाठी साधनांची सुविधा उपलब्ध करुन दिली तरी कोकणची वाट म्हणजे बिकट अवस्था याचा प्रत्यय दरवर्षी येतो. मुंबई, ठाणे व उपनगर परिसरातून कोकणात जाण्याचा महत्वाचा रस्ते मार्ग म्हणजे मुंबई गोवा महामार्ग.
कोकणात जाणारे मार्ग नागमोडी वळणाचे असल्याने वाहतूकीला ते अडथळा निर्माण करत होते. हे मार्ग सरळ करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले. 450 किमी लांबीच्या या महामार्गाचे चौपदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यातील कामाला पळस्पे ते इंदापूर कामाला 2010 - 11 साली तसेच इंदापूर ते झाराप काम 2014 ला हाती घेण्यात आले.
कामाचा अनुभव लक्षात घेता नंतर हे काम लहान लहान टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. अद्याप हे काम पूर्ण झालेले नसून मागील वर्षी चाकरमान्यांचे मोठे हाल झाले होते. या कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी उदासिन असल्याचे दिसून येते, तर राजकीय पक्षांनी देखील कोणी आवाज आत्तापर्यंत उठविला नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा यंदा हा मुद्दा उचलल्याने या कामास काहीशी गती प्राप्त झाली म्हणण्यास हरकत नाही.
राज्यात सत्तातरांच्या घडामोडीनंतर यातील महत्त्वाची भूमिका बजाविणारे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हाती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची धुरा पडण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार सोपविण्यात आला.
यापूर्वी हे खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. सध्याच्या घडीला मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यात सारे काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील जागेवरुन हा वाद चव्हाट्यावर देखील आला. राष्ट्रवादीचे अजित पवार यांची सत्तेत एन्ट्री होताच राज्यातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले.
शिंदे गटास अनेक अडचणी पवार यांच्यामुळे निर्माण झाल्या, तसेच युती सरकारमध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेला देखील काहीशी आडकाठी निर्माण झाली. यानंतर पुढे आला मुद्दा तो मुंबई गोवा महामार्गाचा...सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षरित्या काही आरोप केले गेल्याने चव्हाण यांच्यासाठी या मार्गाचे काम म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरले आहे.
मनसेने रस्त्यावर उतरत आंदोलन करताच कोकण सुपूत्र असा स्वतःचा उल्लेख करत कोकणवासीयांना साद घातली. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची सिंगल लेन पूर्ण करण्याचे आश्वासन चव्हाण यांनी कोकणवासीयांना दिले आहे. डोंबिवलीत कोकण वासीयांची बैठक घेत त्यांच्या मनाला हात चव्हाण यांनी घालण्याचा प्रयत्न केला.
यानंतर येथील कामासाठी लागणारी मदत करण्यास कोणी तयार असेल तर तसेही आवाहन केले. टप्प्या टप्प्याने हे काम पूर्ण करण्यात येत असून चव्हाण त्यावर स्वतः लक्ष ठेवून आहेत. यासोबतच त्यांनी या कामावर देखरेख करण्यासाठी डोंबिवलीतील भाजपच्या सुभेदारांची निवड केली आहे.
दादांच्या सांगण्यावरुन सुभेदार देखील झटकून कामाला लागलेले आहेत. याविषयी उघड बोलण्यास कोणी तयार नसले तरी डोंबिवलीतील भाजपचे अनेक पदाधिकारी सध्या कोकणात सातत्याने फिरायला जात आहेत.
कोकणात गावी आलो आहोत, फिरायला आलो आहोत असे म्हणत या कामावर देखरेख ते ठेवून असून कोणत्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे, काम कसे सुरु आहे याविषयीच्या पोस्ट ते समाज माध्यमावर टाकत आहेत. यामध्ये कोणीही आपला चेहरा येणार नाही याची खबरदारी मात्र बाळगून असल्याचे दिसते.
मंत्री चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरच्या महत्त्वाच्या टप्प्याचं काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कशेडी बोगद्यातील सिंगल लेनची वाहतूक सुरु करण्यात आली आहे. याकामामुळे कशेडी ते पोलादपूर हा प्रवास अवघ्या 10 मिनीटांत पार करता येईल अशी माहिती चव्हाण यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर टाकली आहे.
उर्वरीत कामदेखील लवकरच पूर्ण करुन संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होईल असे पुढील आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे डोंबिवलीचे सुभेदार आपले काम चोख पार पाडत असल्याची चर्चा सुरु आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.