मुंबई : रोजगारहिन (unemployment) अवस्थेत रस्त्यावर भटकणाऱ्या बेघरांना (homeless people) आता पोट भरण्यासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरविण्याची गरज भासणार नाही. महापालिकेतर्फे (bmc) अशा बेघरांना कौशल्य प्रशिक्षण (skill development) देण्यात येणार आहे. माहुलमध्ये १५०० बेघरांसाठी निवारा केंद्र (Shelter center) उभारण्यात येत असून तेथे कौशल्य प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. १० आॅक्टोबर रोजी असणाऱ्या जागतिक बेघर दिनानिमित्त महापालिकेने ही घोषणा केली आहे.
बेघरांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी पालिका प्रयत्न करत असून त्यासाठी सर्वेक्षणही करण्यात येत आहे. प्रौढ बेघरांसाठी १२ आणि १८ वर्षांखालील बेघरांसाठी महापालिकेचे ११ निवारा केंद्र सुरू आहेत. या निवारा केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी माहुल येथे १५०० जण राहू शकतील, असे निवारा केंद्र सुरू करण्यात येत आहे. या निवारा केंद्रात फक्त निवाराच मिळणार नाही; तर तेथे बेघरांना रोजगारासाठी प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
त्यांच्या आवडीप्रमाणे तसेच उपलब्ध सोयीप्रमाणे हे कौशल्य विकसित करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. बेघरांना समाजात सन्मानजनक स्थान मिळवून देण्यासाठी पालिकेचा हा प्रयत्न असल्याचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. यासाठी पालिकेच्या तसेच केंद्राच्या विविध योजनांमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वयंरोजगार, रोजगार, बचत गट या माध्यमातून बेघरांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही दिघावकर यांनी सांगितले.
निवारा केंद्रात लसीकरण
जागतिक बेघर दिनानिमीत्त मुंबईतील विविध निवारा केंद्रांत आज कोविड लसीकरण करण्यात आले. तसेच निवारा केंद्रांचे निर्जंतुकीकरणही करण्यात आले आहे. प्रौढांसाठीच्या १२ निवारा केंद्रात २३९ व्यक्ती आणि १८ वर्षांखालील ४८८ जण निवारा केंद्रांमध्ये राहत आहेत. बेघरांच्या मदतीसाठी महापालिकेने १८००२२७५०१ ही हेल्पलाईनही सुरू केली आहे. सोमवारपासून ही हेल्पलाईन सुरू होणार आहे.
लवकरच चार नवे निवारा केंद्र
माहुल येथील महानिवारा केंद्रांसह चांदिवली, दहिसर, अंधेरी, गोवंडी या चार ठिकाणी नवे निवारा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. माहुल येथील म्हाडा वसाहतीत २२४ खोल्यांमध्ये १५०० जणांसाठी निवारा केंद्र सुरूरु करण्यात येत आहे.
"बेघरांना निवारा केंद्रात तात्पुरता आश्रय मिळेल. या काळात कौशल्य विकसित करून ते स्वत:च्या पायावर उभे राहातील. त्यांना स्वयंरोजगार व हक्काचा निवारा मिळावा, यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे."
-किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.