कोरोनामुळे विसर्जन सोहळ्याच्या परंपरेत खंड; 93 वर्षानंतर प्रथमच मिरवणूका, पृष्पवृष्टींविना सोहळा

कोरोनामुळे विसर्जन सोहळ्याच्या परंपरेत खंड; 93 वर्षानंतर प्रथमच मिरवणूका, पृष्पवृष्टींविना सोहळा
Updated on


शिवडी : दरवर्षी अनंत चतुर्थीला लालबाग, चिंचपोकळीत बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक आवर्जुन हजेरी लावतात. लालबागमधून निघणारे मानाचे गणपती, भव्यदिव्य देखावे, ढोल- ताशा पथकाचे सादरीकरण आणि अनोखी पुष्पवृष्टी पाहण्यासाठी भाविकांची एकच रीघ लालबागमध्ये लागते. मात्र, यंदा कोरोनामुळे 93 वर्षांची परंपरा असलेल्या या धामधुममध्ये खंड पडणार आहे. परिसरातील कृत्रिम तलावातच बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे असंख्य भाविकंचा 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष यंदा ऐकू येणार नाही.

विसर्जन सोहळ्यासाठी विद्युत रोषणाईने नटलेले रस्ते, इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील घरांमधून बाहेर डोकावणारी गर्दी, पारंपरिक वेशभूषा, मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे कोळिबांधवांचे नृत्य, गाणी, समाजप्रबोधनात्मक चलचित्र, रस्तोरस्ती वाटण्यात येणारा प्रसाद, सामाजिक संदेश देणारी मंडळे, संस्था त्याचबरोबर मोठ्या श्रद्धेने प्रत्येक वस्तीतून केला जाणारा बाप्पाचा मानपान, असे सर्व काहीसे यंदा नाहीसे होणार असल्याने शेकडो वर्षांच्या गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याच्या परंपरेत यंदा खंड पडणार आहे.
गेल्या 93 वर्षांपासून लालबागमध्ये अनंतचतुर्थी दिवशी पहिला मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा गणपती बाहेर काढण्यात येतो. त्यानंतर येथील चिंचपोकळी, लालबागचा राजा, कॉटनग्रीन, प्रगती मंडळ सायन इतर मानाचे गणपती विसर्जनासाठी निघतात. लालबाग, चिंचपोकळी ते सातरस्ता, मुंबई सेंट्रल, लॅमिंग्टन रोड आणि चौपाटी अशा मार्गाने मिरवणूक निघते. लालबागचा राजा लालबाग चिंचपोकळी, बकरी अड्डा, भायखळा स्थानक, नागपाडा दोन टाकी, गोल देऊळ, गिरगांव, चर्नीरोड अशा मार्गाने सर्वांना गल्लोगल्ली दर्शन देतो.  मात्र, यंदा या दर्शनाला भाविक मुकणार आहेत.
लालबाग परिसरात गेली 50 वर्षे ‘श्रॉफ बिल्डिंग उत्सव मंडळा’तर्फे गणरायांवर होणारी पुष्पवृष्टी विसर्जन सोहळ्याचे विशेष आकर्षण असते. सर्व मानाचे तसेच या परिसरातील गणपती श्रॉफ बिल्डिंग येथून जातात. त्यामुळे बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी केवळ मुंबईच नव्हे तर आसपासच्या सर्व परिसरातून या ठिकाणी भाविक येतात. साधारण 150 गणपतींवर या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते. यासाठी मंडळांतर्फेही दरवर्षी विविध प्रतिकृती साकारल्या जातात. यात बच्चेकंपनींपासून, जेष्ठांपर्यंत सर्वांचाच समावेश असतो. मात्र, यंदा बाप्पांवर हा फुलांचा पाऊस होणार नाही.

मुस्लिम बांधवांकडून भरणारी राजाची ओटी सुनी
लालबागमधील दोन टाकी या मुस्लिम वस्तीत लालबागच्या राजाचे दरवर्षी मुस्लिम बांधव मनोभावे स्वागत करतात. पुष्पहार अर्पण करून खना नारळाने मुस्लिम बांधवांकडून राजाची ओटी भरण्यात येते.  एकात्मतेची भावना निर्माण करणारा हा देशातील हा अनोखा सोहळा नेहमी रंगतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लालबागचा राजा चौपाटीवर पोहचतो. मिरवणूक निघाल्यापासून साधारण 21 ते 22 तासानंतर लालबागच्या राजाचे भक्तिभावे समुद्रात विसर्जन केले जाते. मात्र, यंदा मिरवणूकच निघणार नसल्याने हा एकात्मिक सोहळाही रद्द करावा लागला आहे.

उत्साह पुर्वीच विसर्जित; कोळी बांधवांची खंत
मुंबईचे खरे मानकरी असलेले कोळी बांधव गेल्या 86 वर्षांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने पारंपरिक कपडे परिधान करून सोहळ्यात सहभागी होतात. नाचत, गाजत लालबागच्या राजासोबत चौपाटीपर्यंत जाऊन मनोभावे पूजा, आरती करून बाप्पाला निरोप देतात. यंदा, कोरोनामुळे हा उत्सव आणि उत्साह दोन्हीही पुर्वीच विसर्जित झाले आहेत, अशी खंत कोळी बांधव व्यक्त करीत आहे; पुढच्या वर्षी नव्या जोमाने आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा होईल, असे लालबागमधील कोळीबांधव मंजुळा खणकर यांनी सांगितला.

गेली पन्नास वर्षे अनेक प्रकारचे पुष्प करंडक बनवून यातून फुलांचा वर्षाव गणरायावर करून सर्व गणेश भक्तांचे डोळ्याचे पारणे फेडले. लाखो गणेशभक्त टीव्हीवरही या सोहळ्याचा आनंद घेतात. यंदा हा सोहळाच रद्द झाल्याने सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. ही प्रथा खंडित पडू नये म्हणून परिसरातील सर्व गणेश मंडळाला भेट देऊन त्या गणरायाला श्रीफळ व पुष्पहार अर्पण करण्याचे ठरवले आहे. 
- मनोज मान,
सदस्य, श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी मंडळ 

दरवर्षी आम्ही पुष्पवृष्टीच्या मार्गाने जाणार्‍या सर्व गणेशमूर्तीवर पुष्पवृष्टी करतो. चिंचपोकळीच्या चिंतामणीवर तीन वेळा पुष्पवृष्टी होते. यंदा मुर्तींचे विसर्जन स्थानिक पातळीवर होत असल्याने पुष्पवृष्टी करणार नाही आहोत. गणेशाच्या आशिर्वादाने यावर्षी कोरोनामुक्त होऊन पुढील वर्षी नेहमीच्या जोशात श्रींच्या मुर्तीवर पुष्पवृष्टी करू 
- संदीप कदम,
सदस्य,  सेवा साधना पुष्पवृष्टी उत्सव मंडळ

-------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()