मुंबई ः सोन्याच्या दागिन्यांना (Gold Jewellery) हॉलमार्क सक्तीचे करण्यापाठोपाठ आता प्रत्येक दागिन्याला युनिक आयडी क्रमांक (Unique ID Code) सक्तीचा करण्याच्या केंद्र सरकारच्या (Central Government) धोरणास सुवर्णकार संघटनांनी विरोध केला आहे. याचे तंत्रज्ञान आणि सोयी सध्या पुरेशा नसल्याने हे धोरण तहकूब करावे किंवा पुढे ढकलावे, असे त्यांचे म्हणणे आहे. ( Central Government Decision of Gold Jewellery Unique ID gold union against It-nss91)
प्रत्येक दागिन्याची स्वतंत्र ओळख असावी यासाठी त्यावर लेझर किरणांद्वारे नंबर टाकला जाईल. हा क्रमांक सहजी खोडता किंवा पुसता येणार नाही. या क्रमांकामुळे विक्री किंवा चोरी झाली तरी दागिना ओळखून तो कोठून कोठे गेला हे कळू शकेल. अर्थात दागिना वितळवला तरच क्रमांक नष्ट होईल. मात्र मुख्यतः यासाठी कराव्या लागणाऱ्या लिखापढीमुळे व्यापारी चिंतित आहेत.
हॉलमार्कला आमचा अजिबात विरोध नाही पण त्यासोबत ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस) ने आमच्याकडील सोन्याच्या साठ्याची वर्गवारी व तपशील देण्यास सांगितले आहे. प्रत्येक दागिन्याचे, वजन, किंमत, कधी केला, कोठून आणला, हॉलमार्क आहे का, नसेल तर का नाही आदी सर्व तपशील विचारण्याचा बीआयएस ला हक्क नाही. आम्ही आयकर रिटर्न भरताना आमच्याकडील साठ्याचा तपशील देतो. आता पुन्हा तेच तेच काम का करावे. तसेच हा तपशील भलत्या व्यक्तीच्या हाती पडला तर धोका उद्भवू शकतो, असेही सुवर्णकार सांगत आहेत.
युनिक आयडी क्रमांक असलेले दागिने कोणाला विकले ते देखील बीआयएस ला कळवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे तो ग्राहक देखील त्रस्त होऊ शकेल, तसेच हा सर्वांच्याच खासगीपणाच्या हक्कावर आघात होईल, असे गोल्ड व्हॅल्यूअर्स असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी सकाळ ला सांगितले. युनिक आयडी च्या नियमांमध्ये अद्याप स्पष्टता नाही. दागिन्यांचा किंवा सोन्याचा होलसेलर हा उत्पादकाकडून दागिने घेतो.
सुवर्णकार त्याच्याकडून खरेदी करतात, त्यामुळे दागिन्यावर तीन युआयडी मारावेत का. तिघांपैकी एकाने दुसऱ्याकडून खरेदी केल्यावर आपला युआयडी मारेपर्यंत कोणी चोरीची तक्रार केली तर तो अडचणीत येईल का. भारतात दरवर्षी किमान चाळीस लाख दागिने तयार होतात. दरवर्षी तेवढे युआयडी तयार होतील का, नाहीतर मग पिनकोड सारखी किंवा बँकेच्या खातेक्रमांकासारखी पद्धती वापरणार का, दोन दागिन्यांवर चुकून एकच क्रमांक पडला तर काय गोंधळ होईल, या सर्व गोष्टी अद्याप स्पष्ट नाहीत, असेही काळे म्हणाले.
धोरण तहकूब करावे - पेठे
हे धोरण सध्या अमलात आणणे व्यवहार्य वाटत नाही, त्यात अडचणी खूप आहेत. अद्याप यासाठीचे तंत्रज्ञान, सोयीसुविधा पुरेशा नाहीत. त्यामुळे त्यात चूक झाली तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतील. दुसरे म्हणजे हॉलमार्क व युआयडी क्रमांक टाकणारी केंद्रे तीच असून सध्या या क्रमांकांच्या कामामुळे हॉलमार्किंगला वेळ लागतो आहे. आता सणासुदीचे दिवस जवळ येत असल्याने या गोंधळात व्यावसायिकांची अडचण झाली आहे. त्यामुळे योजना तहकूब करावी किंवा पुढे ढकलावी, असे आमचे म्हणणे असल्याचे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष आशिष पेठे यांनी सकाळ ला सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.