Dadar: दादर रेल्वेस्थानकातील मध्य रेल्वे मार्गावरील फलाट क्रमांक एकवर होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने फलाटांचा विस्तार करण्याचे काम हाती घेतले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकातील फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
९ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने प्रवाशांना गर्दीपासून आणि फलाट क्रमांकांच्या गोंधळापासून मोठा दिलासा मिळणार आहे. दादर रेल्वेस्थानकात पश्चिम आणि मध्य रेल्वेचे फलाट गाठताना प्रवाशांमध्ये कायम गोंधळ उडतो. कारण दोन्हींकडील फलाट क्रमांक एकने सुरू होतात.
प्रवाशांचा हा गोंधळ लक्षात घेऊन येथे सलग १ ते १५ फलाट क्रमांक देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. दादर स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या पहिल्या फलाटापासून क्रमांक सुरू होतील आणि सलग मध्य रेल्वेच्या शेवटच्या फलाटापर्यंत वाढत जातील. मध्य रेल्वेचे एक ते आठ फलाट क्रमांक इतिहासजमा होतील. त्याऐवजी ते आता आठ ते १४ क्रमाकांनी ओळखले जातील. नऊ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
असे होतील बदल
मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकात फलाट क्रमांक एक आणि दोन एकमेकांना लागून होते. सीएसएमटी, परळहून सुटणाऱ्या लोकल फलाट क्रमांक एकवरून जातात, तर दोनवरून ११ गाड्या सुटत होत्या. त्यामुळे सात मीटर रुंदी असलेल्या या फलाटावर नेहमी प्रवाशांची गर्दी होऊन गाडीतून प्रवासी पडून अपघात होत असत. त्याची दखल घेत रेल्वेने फलाटाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे फलाट क्रमांक दोन रद्द राहणार आहे. सुधारित क्रमानुसार फलाट क्रमांक एक हा आता आठ होणार आहे.
तयारी पूर्ण
रेल्वे प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी दादर रेल्वेस्थानकात सलग फलाट क्रमांक केले जात असून नऊ डिसेंबरपासून अंमलबजावणी होणार आहे. त्या दृष्टीने मध्य रेल्वेने तयारी सुरू केली आहे. साईन बोर्ड, घोषणांची पूर्वतयारी करण्यात आली आहे. तसेच लोकलमध्ये यासदर्भात सूचना फलक बदलण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दादर रेल्वेस्थानकातील मध्य रेल्वे मार्गावरील फलाट क्रमांक एकचे विस्तारीकरण शेवटच्या टप्प्यात आले असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. या फलाटावरील गर्दी कायमस्वरूपी दूर होणार आहे. प्रवाशांचा होणारा गोंधळ टाळण्यासाठी सलग फलाट क्रमांक दिले जात आहेत.
- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्यरेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.