गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचे आव्हान

पेब किल्‍ल्‍याला पर्यटकांची कायमच पसंती असते. त्‍यामुळे येथे नेहमी गर्दी असते.
पेब किल्‍ल्‍याला पर्यटकांची कायमच पसंती असते. त्‍यामुळे येथे नेहमी गर्दी असते.
Updated on

नेरळ : विकटगड (पेब किल्ला) नवीन वर्षाच्या सुरुवातीला मद्यपींनी घातलेल्या गोंधळामुळे चर्चेत आला आहे. पेब किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे. निधीअभावी पेब किल्ल्याची दुरवस्था झाली असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचे मोठे आव्हान सरकार आणि स्वयंसेवी संस्थांपुढे निर्माण झाले आहे. 

नेरळपासून पश्‍चिमेला चार किलोमीटर अंतरावर पेबचा किल्ला आहे. या किल्ल्याचे पेब हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेबी देवीवरून पडले असावे. पेबच्या किल्ल्याचे विकटगड असेदेखील नाव आहे. किल्ल्यावरील गुहेचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता, असा ऐतिहासिक संदर्भ पेबच्या किल्ल्याबाबत आढळतो.

किल्ल्यावर जाण्यासाठी नेरळ, माथेरान या ठिकाणांहून वाटा आहेत. नेरळजवळील माथेरान डोंगरालगत असलेला पेब किल्ला हा विकटेश्‍वर या भगवान शंकराच्या स्वयंभू शिवलिंग यामुळे ‘विकटगड’ नावाने ओळखला जातो. या किल्ल्याचे महत्त्व आजही येथे गेल्यावर आणि तेथील परिसराची पाहणी केल्यानंतर लक्षात येते. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरतची लूट केल्यानंतर कल्याण मार्गे रायगडावर जाताना या किल्ल्यावर लुटीतील खजिना काही काळ सुरक्षित ठेवला होता. या किल्ल्यावर खजिना ठेवल्याची माहिती कळताच मोगलांचे सैनिक किल्ल्यासमोर नेरळजवळील उल्हास नदीच्या तीरावर तळ ठोकून होते. त्यावेळी या किल्ल्यांचे संरक्षण करणाऱ्या मावळ्यांनी किल्ल्यावरून केलेल्या तोफांच्या माऱ्यात मोगलांचे तळ उद्धवस्त केले होते. त्यांच्या खाणाखुणा आजही त्या ठिकाणी असून त्यामुळे या किल्ल्याबाबत मुंबई, पुण्यापासून गडप्रेमी माहिती घेण्यासाठी येथे मोठ्या संख्येने येत असतात.

गडकिल्ल्यावर पोहचण्यास गेल्या २० वर्षांपूर्वी सोपा रस्ता नव्हता. त्यावेळी मिनीट्रेनचे मोटरमन राजाराम खडे यांनी गडावर पोहचण्यास तीन ठिकाणी लोखंडी शिड्या तयार केल्या आहेत. या लोखंडी शिड्यांमुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि गिर्यारोहक येथे गडावर पोहचू शकले आहेत. मात्र बहुतांश वेळा गडावर पोहचलेले पर्यटक येथे अनेकदा मद्यपान केल्याच्या स्थितीतही आढळून आले आहेत. त्यामुळे गडकिल्ल्यांवर पावित्र्य राखण्याचे मोठे आव्हान सरकार आणि विविध स्वयंसेवी संस्थांपुढे निर्माण झाले आहे.

पेब किल्ल्यावरील विकटेश्‍वराच्या मंदिरात फार कमी पर्यटक गडावर जाऊन देखील पोहचत नाहीत. त्यातील असंख्य पर्यटक किल्ल्यांच्या सर्व भागात फिरत असतात. त्यांचे आवडीचे ठिकाण म्हणजे गडावरील दगडात असलेले भुयार. त्या मोठ्या घळीत २०० माणसे आरामात बसून कोणाचे मार्गदर्शन ऐकू शकतात, अशी ती प्रशस्त जागा आहे. या जागेत काही लोक जुगार खेळतानादेखील आढळून आले आहेत. 

किल्ल्यावर अंधाराचा फायदा घेऊनही अनेकदा प्राणीही मारण्यात आले आहेत. त्यामुळे किल्ल्यावर येणारे पर्यटक, गिर्यारोहक आणि गडप्रेमींकडून कशाप्रकारे पावित्र्य राखले जाणार? याचा देखील विचार करण्याची आवश्‍यकता आहे.

जनजागृतीची आवश्‍यकता

एकीकडे पेब किल्ल्याच्या नूतनीकरणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असताना कोथळी गडाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुमारे ४०० किलो वजनाचा सागवान दरवाजा बसविण्यात आला आहे. त्यावेळी तेथे हजारो शिवभक्‍त पोहचले होते. त्यामुळे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सर्वच स्तरावर जनजागृतीची आवश्‍यकता असून यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.