जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल

जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल
Updated on

मुंबई: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खार येथे जान्हवी कुकरेजा(19) हिच्या हत्येने खळबळ उडाली होती. आता याप्रकरणी खार पोलिसांनी प्रियकर श्री जोंधळकर (22)  आणि दिया पडाळकर (18) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपींविरोधात हत्या आणि गुन्ह्यात मदत केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून न्यायालयाने त्यांचा जामिन फेटाळला आहे. याप्रकरणी दाखल आरोपपत्रानुसार, कुकरेजाच्या शरीरावर 48 जखमा आहेत. तसेच तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

‘भगवती हाइट्स’ इमारतीच्या तळमजल्यावरील जिन्याजवळ जान्हवीचा मृतदेह पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात आढळला. प्राथमिक पाहणी आणि कूपर रुग्णालयात पार पडलेल्या शवचिकित्सेतून जान्हवीच्या कवटीचा अस्थिभंग (ला फ्रॅक्चर) झाल्याचे निदर्शनास आले. कपाळावर आणि डोक्याच्या मागील बाजूस खोलवर जखमा आढळल्या. तसेच डोके, चेहरा, हात, गुडघे, निगडी, खुबा येथेही जखमा आणि खरचटल्याचे व्रण आढळले. याप्रकरणी खार पोलिसांनी वांद्रे येथील महादंडाधिका-यांकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

सांताक्रुझ परिसरात एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या जान्हवी आणि दिया जीवलग मैत्रिणी होत्या. तर श्री आणि जान्हवी यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र नववर्षाच्या पहिल्या दिवशी रात्री श्री आणि दिया यांच्यातील जवळीक जान्हवीला खटकली. त्यातच या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्यावर ती अस्वस्थ झाली आणि तिचा संयम सुटला, अशी माहिती कार्यक्रमास उपस्थित असलेल्या तरुणांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.

‘भगवती हाइट्स’ इमारतीत राहणाऱ्या यश आहुजाने नववर्ष स्वागतानिमित्त निवडक मित्रांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याला जान्हवी, दिया, श्री याच्यासह 15 तरुण उपस्थित होते. जान्हवी संध्याकाळी सातच्या सुमारास ‘भगवती हाइट्स’इमारतीत पोहोचली. वडिलांचा वाढदिवस असल्याने ती अकराच्या सुमारास सांताक्रुझ येथील घरी परतली. तेव्हा तिच्या घरी दिया आणि श्री हेही उपस्थित होते. या दोघांसोबत तिने वडिलांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तिघे रात्री बारापूर्वी पुन्हा ‘भगवती हाइट्स’च्या गच्चीत पोहोचले. त्यावेळी पार्टीदरम्यान अतिमद्यपानामुळे दियाला उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे जान्हवीने अन्य मित्रांच्या मदतीने दियाला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील यश आहुजा याच्या घरी नेले. त्यानंतर ही सर्व मंडळी पुन्हा गच्चीत आली.

काही वेळाने यश याच्या घरी दिया आणि श्री यांना जान्हवीने नको त्या अवस्थेत पाहिले. तिने हा प्रसंग अन्य एका मैत्रिणीला फोन करून कळवला. श्री याला गमावण्याची भीती तिने या मैत्रिणीकडे व्यक्त केली. ती बराच वेळ मोबाइलवर बोलत गच्चीत येरझारा घालत होती. कार्यक्रमाला उपस्थितांपैकी काहींनी इमारतीच्या जिन्यावर जान्हवीला रडतानाही पाहिले. त्यानंतर झालेल्या वादातून जान्हवीला मारहाण झाली. त्यानंतर तिला दुस-या मजल्यावरून खाली फेकण्यात आले. त्यानंतर तळ मजल्यावर रक्तांच्या थारोळ्यात तिचा मृतदेह सापडला होता. त्यावेळी श्री जोंधळकर इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहे. पण मारामारी झाली. त्याठिकाणी सीसीटीव्ही नसल्यामुळे घटनेची चित्रफीत पोलिसांना मिळू शकली नाही. त्यानंतर जोधंळकर जवळच्या रुग्णालयात दाखल झाला. त्याने दुचाकीवरून पडल्याचे कारण तेथे सांगितले. पडळकरलाही तिच्या मित्रांनी जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. तिनेही जिन्यावरून पडल्यामुळे लागल्याचे सांगितले. पण कोणीही या मारामारीच्या घटनेबद्दल सांगितले नाही.

याप्रकरणी दाखल आरोपपत्रात पार्टीत सहभागी झालेल्या 18 मित्रांसह 50 जणांचे जबाबही आहेत. उर्वरीत जबाब कुकरेजाचे पालक, शवविच्छेदन करणारे, न्यायावैधक डॉक्टर, तपास अधिकारी यांचे आहेत. पोलिसांना प्रत्यक्षदर्शी अथवा घटनेचे पुरावे मिळाले नसले, तरी वस्तूनिष्ठ पुरावे, न्यायावैध पुरावे, तांत्रिक पुरावे सादर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे घटनास्थळी तिघांच्याही रक्ताचे नमुने सापडले आहेत. तसेच सीसीटीव्हीमध्ये घटनासस्थळावर दोनही आरोपी उपस्थित असल्याच्या व्हिडिओ आहेत. घटनास्थळी चपला, केस, इतर साहित्यही घटनास्थळावरून जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी भादंवि कलम 302 आणि 109 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपपत्रात कोणतेही नवे कलम वाढवण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Chargesheet filed against both in Janhvi Kukreja death case

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.