मुंबई - गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून अनेक डॉक्टर आणि पोलिसांना 22 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी (ता. 27) कार्तिक मोहनप्रसाद श्रीवास्तव (वय 39) याला अटक केली.
या प्रकरणी फसवणूक झाल्याचे सांगणारे चार डॉक्टर आणि सात पोलिसांसह 21 गुंतवणूकदार पुढे आले आहेत. त्यांची रक्कम 22 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणी श्रीवास्तव याच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक गुंतवणूकदारांना आरोपीने 180 टक्के; तर काहींना 10 टक्के प्रतिमहिना परतावा देण्याचे प्रलोभन दाखवल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणी आतापर्यंत दोन निवृत्त पोलिसांसह एकूण सात पोलिस तक्रारदार पुढे आले आहेत. याशिवाय तीन डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील एक व्यक्ती अशा एकूण 21 जणांनी तक्रार केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. त्याने समभागांमध्ये गुंतवणूक केली होती. त्यात त्याला नुकसान झाल्यामुळे ही रक्कम तो परत करू शकला नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.
या प्रकरणातील एक आरोपी सहायक पोलिस निरीक्षकाचा भाऊ आहे. त्याने अनेक पोलिसांना गुंतवणूक करण्यास सांगितले. अशा 100 हून अधिक पोलिसांनी आरोपीकडे पैसे गुंतवले असून, त्यात अतिरिक्त पोलिस आयुक्तापासून पोलिस शिपाई दर्जाच्या अनेक पोलिसांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.
|