छत्रपती संभाजी महाराज : पराक्रमी, नीतिमान राजे

छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
Updated on

छत्रपती संभाजीराजांचे कार्यकर्तृत्व केवळ महाराष्ट्राच्या चौकटीत मावणारे नव्हते. संभाजीराजांनी बालवयातच म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी जयसिंगाच्या छावणीत जाऊन आपला निर्भीडपणा दाखवला होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी गुजरात मोहीम यशस्वी केली, असे समकालीन ऍबे करे सांगतो. संभाजी महाराज म्हणजे पराक्रमी, सुंदर आणि बुध्दिमान राजपुत्र होते, असे करे सांगतो.

शिवरायांच्या मृत्यूनंतर न थकता सतत नऊ वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंविरुध्द संभाजीराजे लढत होते. संभाजीराजांनी मोगल फौजांना, साक्षात औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. औरंगजेब हतबल झाला. त्याने डोक्यावरील विमॉश खाली उतरवला आणि ‘संभाजीचे पारिपत्य केल्याशिवाय तो डोक्यावर धारण करणार नाही,’ अशी शपथ घेतली, अशा प्रकारची नोंद कारपारकर इंग्रज १६८२ च्या पत्रात करतात. 

शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी संभाजीराजांनी सर्वस्व पणाला लावले. त्यांच्या धैर्याचे, शौर्याचे, पराक्रमाचे आणि निर्भीडपणाचे वर्णन समकालीन खाफिखान करतो. वडिलांपेक्षा म्हणजे शिवाजीराजांपेक्षा संभाजीराजे मोगलांसाठी दहापटींनी तापदायक होते, असे वर्णन खाफीखान करतो. 

संभाजीराजे जसे रणांगण गाजविणारे होते, तसेच ते राजनीती, डावपेच यामध्येदेखील निपुण होते. पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्यावर वचक बसविण्यासाठी संभाजीराजांनी अरबांशी मैत्री केली, असे वा. सी. बेंद्रे नमूद करतात. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, ही त्यांची राजनीती होती. २८ ऑक्टोबर १६८५ च्या पत्रात इंग्रज लंडनवरून मुंबईकर इंग्रजांना कळवितात की, ‘संभाजीराजांशी कट्टर मैत्री करा. कारण, ते अत्यंत शूर आणि मैत्री करण्याच्या योग्यतेचे आहेत. त्यांच्याशी मैत्री केल्यावर पोर्तुगीज किंवा मोगलांची भीती बाळगण्याचे कारण नाही.’ या पत्रावरून स्पष्ट होते की, संभाजीराजांचा दरारा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता, तर तो जागतिक स्तरावरचा होता. संभाजीराजांना मंत्र्यांकडून साथ मिळाली असती, तर जग जिंकण्याचे सामर्थ्य संभाजीराजांकडे होते. 

संभाजीराजे केवळ किल्ल्यावर बसून राज्यकारभार करणारे नव्हते, तर शिवरायांप्रमाणेच रणांगणात लढा देणारे होते. गोव्यावरील मोहिमेप्रसंगी घोड्यावर बसून मांडवी नदीत घोडा घालून गोवा जिंकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. औरंगजेबाला दक्षिणेत गुंतवून त्याचा पुत्र शहाजादा अकबराला इराणला पाठवून त्याच्या मदतीने दिल्ली जिंकण्याची ही योजना संभाजीराजांनी आखली होती; परंतु ती प्रत्यक्षात येण्यापूर्वीच संभाजीराजांचा घात झाला. 

या सर्व गदारोळात त्यांनी प्रजेची हेळसांड होऊ दिली नाही. अन्यायग्रस्तांना न्याय देणे, दुष्काळग्रस्तांना मदत करणे, प्रकल्पग्रस्तांचे तत्काळ पुनर्वसन करणे, ही कामे संभाजीराजे तत्काळ पूर्ण करत असत. शिवरायांप्रमाणेच आपल्या राज्यातील आणि परराज्यातील महिलांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली. महाराणी येसुबाईंचा त्यांनी आदर सन्मान केला. त्यांना स्वराज्याचे सर्वाधिकार दिले. त्यांच्या नावांचा शिक्का तयार करवून घेतला. ‘श्री सखी राज्ञी जयति’ या नावाने महाराणी राज्यकारभार करू लागल्या. 

आपल्या महाराणीला सर्वाधिकार देणारे संभाजीराजे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. आपल्या आजीचा, सावत्र मातांचा त्यांनी सन्मान-आदर केला. कनिष्ठ बंधू राजाराम महाराजांना अत्यंत प्रेमाने वागविले. त्यांचे तीन विवाह लावून दिले. इतिहासप्रसिध्द महाराणी ताराबाई या राजाराम महाराजांच्या महाराणी होत्या. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य छत्रपती घराण्याने केले. छत्रपतींचा वारसा महिलांचा सन्मान करणे, त्यांना संधी देणे, त्यांना स्वातंत्र्य देण्याचा आहे. याचा पाया शिवरायांनी घातला. तो वारसा संभाजीराजांनी चालविला. 

संभाजीराजे जसे तलवारबाजीमध्ये निपुण होते, तसेच ते ज्ञानक्षेत्रात अर्थात साहित्य क्षेत्रातदेखील निपुण होते. त्यांचे संस्कृत, हिंदी, मराठी इत्यादी भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला; पण आजचा ‘बुधभूषण’ प्रक्षिप्त आहे, असे प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात; पण एवढे मात्र निश्‍चित की संभाजी महाराज हे सुसंस्कृत असे संस्कृत भाषेचे महापंडित होते, तसेच त्यांनी हिंदी भाषेत ‘नखशिख,’ ‘नायिकाभेद’ आणि ‘सातसतक’ हे तीन ग्रंथ लिहिले. एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात लेखणी घेऊन इतिहास घडविणारे आणि इतिहास लिहिणारे संभाजीराजे होते. 

संभाजीराजे सुसंस्कृत राजकारणी होते. त्यांची मोगल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीजांच्या विरोधातील लढाई राजकीय होती. धार्मिक नव्हती. ते कधीही, कोणाशीही धार्मिक द्वेषाने वागले नाहीत. दिलेरखानाचा भाऊ मिरबातखान हा संभाजीराजांचा शेवटपर्यंत जीवलग मित्र होता. समकालीन निकोलाओ मनुची संभाजी राजांना भेटला होता. तो लिहितो, संभाजीराजांच्या दरबारात मला चांगल्या प्रकारे वागविण्यात आले. त्याने मला दोन जरीचे रुमाल भेट दिले.

संभाजीराजांनी आपल्या राज्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. सर्व जाती-धर्मियांवर मनापासून प्रेम केले. त्यांना प्रशासनात संधी दिली. जखमी सैनिकांना मायेच्या ममतेेने जवळ केले. सावत्र भावाचा दुःस्वास न करता त्यांना अत्यंत प्रेमाने वागविले. अकाली आलेल्या जबाबदारीने त्यांना अकालीच सर्व प्रश्‍नांची जाण झाली. त्यामुळे त्यांच्याकडे अकालीच प्रगल्भतादेखील आलेली होती. 

सर्वांवर प्रेम करणार्‍या या लोकप्रिय राजाला मात्र बालवयापासून जीवघेण्या संकटाला समोरे जावे लागले. आजी जिजाऊ, वडील शिवाजीराजे, सर्व सावत्र मातांनी त्यांना अत्यंत प्रेमाने सांभाळले. त्या राजाला वयाच्या अत्यंत तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना अवघ्या बत्तिसाव्या वर्षी निर्दयी अशा मृत्यूला सामोर जावे लागले, ते जगले असते, तर त्यांनी इतिहास बदलला असता. इंग्रज अधिकारीदेखील छत्रपती संभाजी महाराजांच्या सौजन्याचे, विद्वत्तेचे, शौर्याचे वर्णन करताना काटकसर करत नाहीत. चरित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, पराक्रमी राजा म्हणून संभाजीराजांचा लौकिक सर्वत्र होता.

(लेखक इतिहास संशोधक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.