नवी मुंबई : चीनमध्ये थैमान घातलेल्या आणि जगभरात भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूची नवी मुंबई शहरातदेखील दहशत वाढत चालली आहे. या विषाणूच्या वाढत्या भीतीमुळे शहरातील चिनी नागरिकांची पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे. सानपाडा व पारसिक हिल येथील दोन सोसायट्यांमधील चिनी कुटुंबांची आरोग्य विभागाने तपासणी केली.
चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे भारतातही आरोग्य यंत्रणा तत्परतेने काम करीत आहेत. राष्ट्रीय पातळीवरील सर्व आरोग्य यंत्रणांनी राज्यातील प्रमुख शहरांमधील आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिकेची आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी होऊन कामाला लागली आहे. कोरोना विषाणूचा भडका उडाल्यानंतर देशातील सर्वच विमानतळांवर चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विशेष चाचणी केली जात आहे. त्यानंतर संशयित आढळल्यास त्यांना कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्याच धर्तीवर मुंबईजवळचे उपनगर असणाऱ्या नवी मुंबईतही परदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करीत आहेत. नेरूळ आणि खारघर येथे असणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकण्यासाठी चीनमधून बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात. तसेच ठाणे एमआयडीसीत असणाऱ्या आयटी कंपन्या आणि वाशी, बेलापूर येथील आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमध्येही कामासाठी चीनमधील नागरिक येतात. शिक्षण व कामानिमित्त आलेले बरेचसे चिनी नागरिक नेरूळ, सानपाडा, वाशी, खारघर भागातील काही रहिवासी इमारतींमध्ये वास्तव्याला आहेत.
चीनमधून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे या नागरिकांना आपल्या इमारतींमध्ये राहत असलेले पाहून नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे चिनी नागरिक राहत असलेल्या सोसायट्यांमधील रहीवाशांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. आरोग्य विभागाला सानपाडा व नेरूळमधील पारसिक हिल अशा दोन ठिकाणांहून चीनी नागरीकांची तपासणी करण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ आपली पथके पाठवून, संबंधित चिनी कुटुंबीयांची तपासणी पूर्ण केली. या तपासणीअंती कोणत्याच चिनी नागरिकांनी कोरोना विषाणूची लागण नसल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
आत्तापर्यंत ६ जणांची तपासणी
महिनाभरात चीनहून आलेल्या अथवा चीनमधील शहरांशी संबंधित असणाऱ्या सहा चिनी नागरिकांची पालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात कोरोना विषाणूची चाचणी करण्यात आली. सहा जणांमध्ये एक वर्षाच्या लहान चिमुकल्याचाही समावेश आहे; तर इतर पाच जण २३ ते ३१ वयोगटातील नागरिक आहेत. या सर्वांच्या रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे तपासण्यात आले असता, ते कोरोनाबाधित नसल्याचे निष्पन्न झाले.
अखेर त्या महिलेची सुटका
१९ फेब्रुवारीला बीजिंग, मलेशिया आणि बॅंकॉक अशा परदेशातून भारतात परतलेल्या एका २९ वर्षीय महिलेला ताप आल्यामुळे कोरोना संशयित म्हणून कस्तुरबा गांधी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. २३ तारखेपासून काही दिवसांच्या तपासणीनंतर त्या महिलेच्या सर्व चाचण्यांमध्ये कोरोना विषाणू नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्या महिलेची सुटका करण्यात आली.
शहरात चीन किंवा परदेशातून येणाऱ्या नागरिकांची नियमित तपासणी होते. परंतू, तरीदेखील काही सजग नागरिक पालिकेकडे संपर्क साधत आहेत. अशा नागरिकांच्या शंका निरसनाचे काम पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.