उद्योजकांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्या सापडायला लागल्या, उद्योग कसे थांबतील; शिंदेंनी ठाकरेंवर डागली तोफ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व सभांना उपस्थित राहण्याबरोबरच महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांच्या स्वतंत्र सभाही मोठ्या संख्येने होताहेत.
CM Eknath Shinde, Lok Sabha Election 2024
CM Eknath Shinde Latest Interviewsakal
Updated on

CM Eknath Shinde Latest Interview

विजय चोरमारे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्व सभांना उपस्थित राहण्याबरोबरच महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांच्या स्वतंत्र सभाही मोठ्या संख्येने होताहेत. निवडणूक प्रचाराच्या अत्यंत व्यग्र वेळापत्रकातून गुरुवारी मध्यरात्रीनंतर सव्वा वाजता त्यांनी मुलाखतीसाठी वेळ दिली. महाविकास आघाडी सरकारमधील अनुभव, नेतृत्वाची कार्यशैली, शिवसेनेतील फूट, फुटीनंतरचे आरोप-प्रत्यारोप अशा विविध प्रश्नांना त्यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या खास मुलाखतीत मोकळेपणाने उत्तरे दिली.

प्रश्नः लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे तीन टप्पे पार पडल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचे राजकीय चित्र काय दिसते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : तिन्ही टप्प्यांमध्ये महायुती पुढे आहे आणि पाचही टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात महायुतीच पुढे राहील. जास्तीत जास्त जागा महायुतीला मिळतील. महाराष्ट्रात आमचे ‘मिशन ४५’ आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून त्यांना भक्कम पाठबळ द्यायचे आहे. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि महायुतीच्या सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात केलेली विकासकामे यामुळे राज्यातील जनता निश्चितच महायुतीच्या पाठीशी राहिली आहे आणि मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल.

लोकसभेच्या जागावाटपासाठी तुम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागल्याचे चित्र दिसत होते. तुमच्यासाठी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा संघर्ष मोठा होता की, लोकसभेच्या सन्मानजनक जागावाटपाचा?

- सन्मानजनक जागावाटपाचा काही प्रश्न नव्हता. जागावाटपामध्ये थोडेफार इकडे तिकडे होत असते. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात. अमुक जागा आपल्याला पाहिजे वगैरे..

पण तुमच्या हक्काच्या मानल्या जाणाऱ्या ठाणे, कल्याणच्या जागा अखेरपर्यंत जाहीर झाल्या नव्हत्या.

- कल्याणची जागा आधीच निश्चित झाली होती. ती मीच मुद्दाम मागे ठेवली होती. माझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांच्या जागा जाहीर केल्यानंतर श्रीकांतची जाहीर करायची असे मीच ठरविले होते. त्यांच्यासारखे आधी आपल्या मुलाची सोय लावण्याची माझी वृत्ती नाही.

तुमच्या काही खासदारांची तिकिटे कापावी लागली, काही उमेदवार बदलावे लागले. भाजपच्या दबावापुढे नमते घ्यावे लागल्याची टीका होते...

- कुठलाही दबाव नाही. काही समीकरणे आहेत. काही गणिते आहेत. काही गोष्टी नंतर कळतात की, आपण उमेदवार बदलला तर ती हमखास जिंकू शकतो. निवडणूक जर जिंकण्यासाठी लढायची असेल तर काही निर्णय बदलावे लागतात. परंतु आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, याची खात्री दिली असल्यामुळे कुणी नाराज नाही.

CM Eknath Shinde, Lok Sabha Election 2024
महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर तुमच्या पक्षाचे भवितव्य अवलंबून असल्याचे म्हटले जाते. त्यात कितपत तथ्य वाटते? निवडणूक प्रचारातले तुमचे प्राधान्याचे मुद्दे कोणते?

- विकासाच्या मुद्यांवर आम्ही ही निवडणूक लढवतोय. दोन वर्षे आमच्या सरकारने जे काम केले, त्याच्यासह दहा वर्षे मोदींनी केंद्रात केलेले काम घेऊन आम्ही लोकांपुढे जातोय. काम करणाऱ्या लोकांमागे जनता उभी राहते आणि आमच्या कामाची पोचपावती लोकसभा निवडणुकीत मिळेल.

- चर्चा तर खूप असते. निकाल लागू द्या. मला काहीच चिंता नाही. लोकसभेचे निकाल चांगले आणि अपेक्षित असेच लागतील. मोदी पंतप्रधान होतील. महाराष्ट्रातून चांगल्या जागा मिळतील. ज्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत, त्यांचा अपेक्षाभंग होईल.

शिवसेनेत फूट पडल्यानंतरची तुमची, तुमच्या नेतृत्वाखाली होणारी पहिली निवडणूक आहे आणि तुमच्यासह तुमच्या सहकाऱ्यांवर गद्दारीचा आरोप होतोय. पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाजूने सहानुभूतीही पाहायला मिळते, त्याचा काही फटका बसेल असे वाटते का?

- घरी बसणाऱ्यांना, कामे बंद पाडणाऱ्यांना, विकासकामांमध्ये खो घालणाऱ्यांना कशाला सहानुभूती मिळेल? युतीमध्ये निवडणुका लढवून युतीला धोका देणाऱ्यांना सहानुभूती मिळण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा होती शिवसेना-भाजपचे सरकार बनेल. मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही सगळी विचारधारा गुंडाळून ठेवली. खुर्चीसाठी आणि स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार विकले. बाप चोरला म्हणताना तुम्हाला काही वाटायला पाहिजे. जनतेला धोका दिला. ज्या जनतेला विश्वास होता की युतीचे सरकार होईल, त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला.

तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करून विचारांशी गद्दारी केली. मग तुम्ही त्याचवेळी बंड करून का बाहेर पडला नाहीत?

- आम्ही त्याचवेळी त्यांना सांगितले होते, ही आपली नैसर्गिक युती नाही. आपली नैसर्गिक युती आणि विचारधारा भाजपशी जुळणारी आहे. पक्षप्रमुखांचा आदेश मानायचा ही शिवसेनेची पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. आम्ही बाळासाहेबांच्या संस्कारांत वाढल्यामुळे आदेश मानून सरकारमध्ये सहभागी झालो. पण सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसैनिकांना न्याय मिळण्याऐवजी शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले. आमदारांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले. विकासाला पैसे नाहीत. लोकांची कामे होत नाहीत, मतदारसंघातील लोकांपुढे कसे जायचे असा प्रश्न निर्माण झाला.

तुमच्या बंडामागचे काँग्रेससोबत केलेली आघाडी आणि शिवसैनिकांना मिळणारी वागणूक यापैकी कोणते कारण होते?

- दोन्ही कारणे होती. काँग्रेससोबत आघाडी म्हणजे बाळासाहेबांचे विचारच तुम्ही सोडले. तेव्हाच आम्ही विरोध केला होता. पण पक्ष म्हणून, पक्षप्रमुखांचा आदेश मानणारे कार्यकर्ते असल्यामुळे निर्णय मान्य केला. वाटले की, सत्तेचा उपयोग करून शिवसेना पक्ष मोठा करू, शिवसैनिकांना न्याय देऊ. पण प्रत्यक्षात शिवसैनिकांवर अन्याय होऊ लागला. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले. त्यांच्याविरोधात कारस्थाने रचू लागले...

CM Eknath Shinde, Lok Sabha Election 2024
Devendra Fadnavis : पराभवाच्या शक्यतेने विलीनीकरणाची भाषा; फडणवीस यांची शरद पवार यांच्यावर टीका

उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात तुम्ही सरकार पाडण्यासाठी कारस्थान रचत होता, असा आरोप केला जातो...

- सहानुभूती घेण्याचा हा प्रकार आहे. गळ्याचा पट्टा एका दिवसात कसा निघाला? एका दिवसात निघतो का? आम्ही गेलो तेव्हा हे विधानभवनात बसले होते. विधान परिषदेची निवडणूक हाताळत होते. ते आजारी असताना, बेडवर पडलेले असताना आम्ही बाहेर नाही पडलो. त्यांच्याशी बोलत गेलो. लपून छपून गेलो नाही. जे करतो ते उघडपणे करतो, धाडसाने करतो. निर्णय घेण्याची क्षमता आमच्यात आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचे खच्चीकरण वाचविण्यासाठी आम्ही हे केले. त्यांनी ज्या युतीधर्माशी प्रतारणा केली होती, तो युतीधर्म आम्ही पाळला.

तुम्ही केंद्र सरकारचे गुणगान करता, पण मोदी सरकारने महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो. वेदांत- फॉक्सकॉन, टाटा एअरबस असे मोठे प्रकल्प, डायमंड मार्केट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले. राष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, मरिन पोलिस अकादमीसारख्या केंद्रीय संस्थांची कार्यालये महाराष्ट्राबाहेर हलवली ...

- वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला तेव्हा आमचे सरकार दोन महिन्यांचे होते. दोन महिन्यांत एवढा मोठा प्रकल्प येतो का जातो? त्या प्रक्रियेला वर्ष-सहा महिने लागतात. आधीच्या सरकारने त्यांना मदत केली नाही. आमचे काय, आम्हाला काय मिळणार अशी भाषा बोलू लागल्यावर ते कशाला थांबतील? उद्योजकांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्या सापडायला लागल्या, घरावर मोर्चे काढायला लागले. कसे थांबतील उद्योग?

बाकीच्या केंद्रीय संस्थांचे काय?

- निवडणुकीच्या तोंडावर काहीही आरोप केले जातात. आज महाराष्ट्रात पाच लाख कोटींचे उद्योग येताहेत. केंद्रसरकारचे पाठबळ आहे म्हणून येताहेत. महाराष्ट्राचे रेल्वेचे प्रस्ताव, पाण्याचे प्रस्ताव मंजूर होताहेत. महाराष्ट्राबद्दल आकस असता तर हे झाले असते का? त्यांचा अहंकार उघडा पडला आहे. सत्तेवर असताना केंद्राकडे पैसे मागितले नाहीत. सरकार जनतेसाठी असते. जनतेचे प्रश्न केंद्राकडे मांडले पाहिजेत. केंद्राकडून मदत घेतली पाहिजे. राज्यकर्त्याला अहंकार असता कामा नये.

मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन आधी दिल्यामुळे तुम्ही बंड केले, की बंड केल्यानंतर मुख्यमंत्रिपद मिळाले?

- आमच्या डोक्यात काहीच नव्हते. आमच्यावर अन्याय करीत होते. शिवसैनिकांवर अन्याय करीत होते. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे काम केले.

मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन आधी नव्हते?

- बिलकूल नाही. मुख्यमंत्रिपदाचे काही डोक्यातही नव्हते.

शिवसेनेतून पर्यायाने सरकारमधून बाहेर पडताना तुमचे सगळे आमदार अजित पवारांनी निधीवाटपात अन्याय केल्याचे एका सुरात सांगत होते. नंतर अजित पवारच सरकारमध्ये आले. म्हणजे सासूसाठी वाटून घेतले आणि सासूच वाटणीला आली, अशी तुमची अवस्था झाली...

- अजित पवार तेव्हा कुठे पक्षाचे प्रमुख होते. मुख्यमंत्री कोण होते ते बघा..अजित पवार आता विकासाला साथ द्यायला आले आहेत. अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. आज मी मुख्यमंत्री आहे. माझ्या आमदारांवर अन्याय होऊ देणार नाही. सगळ्यांना निधी मिळू लागलाय. मतदारसंघात विकासकामे होऊ लागल्यामुळे आमदार खूष आहेत.

श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेला उमेदवार तुलनेने कमकुवत आहे, ही भविष्याच्यादृष्टिने तुमची उद्धव ठाकरे यांच्याशी तडजोड म्हणायची का?

- श्रीकांत शिंदे यांनी दहा वर्षांत एवढी कामे केली आहेत, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येण्याचे कारण नाही. त्यांनी कुणीही उमेदवार दिला तरी आम्हाला त्याची चिंता नाही. केलेल्या कामांच्या बळावर आम्ही निवडणूक लढवतोय आणि ती जागा विक्रमी मतांनी जिंकू.

भविष्यात तुम्ही तुमच्या पक्षाचे काय चित्र पाहता? एका स्वतंत्र पक्षाचे नेते म्हणून स्वबळावर सत्तेत येण्याचे स्वप्न पाहता का?

- आम्ही युतीमध्ये काम करतोय. युतीमध्ये उत्तम चालले असताना का पुढचा विचार करायचा? आम्हाला आता लोकसभेचा विचार आहे. आमचे पहिले उद्दिष्ट लोकसभा आहे. लोकसभेत आम्ही चांगल्या जागा जिंकू. मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. त्यामुळे त्यात बिघाड येईल असा विचार आम्ही करीत नाही.

मराठा आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होईल असे वाटते?

- मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याचे प्रतिबिंब निश्चितच मतदानामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही.

मराठा आंदोलन सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे नवी मुंबईत येईपर्यंत तुमचा त्यांच्याशी सुसंवाद होता. नंतरच्या टप्प्यात का बिनसले?

- मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम आम्ही केले. मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि आरक्षण देऊन ती शपथ पूर्ण केली. विशेष अधिवेशन बोलावून दहा टक्के आरक्षण दिले. जे लोक आरोप करताहेत त्यांनी आधी आरक्षण द्यायला हवे होते. त्यांनी सत्ता भोगली परंतु मराठा समाजाला वंचित ठेवले. मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार नाही अशी ओरड आता ते करताहेत. आरक्षण देताना आम्ही सगळ्या बाबींचा विचार केला आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून ते दिले आहे.

जरांगेंना हाताळण्यात अखेरच्या टप्प्यात काही चूक झाली का?

- जरांगेंचा लढा राजकीय स्वरूपाचा नव्हता. सामाजिक स्वरूपाचा होता. आम्हाला जेवढे करता आले तेवढे आम्ही केले. कुणबी प्रमाणपत्रे मिळत नव्हती, ती आम्ही सुरू केली. ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही केले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेपर्यंतच्या काळात कोणत्या कामांना तुमचे प्राधान्य राहील?

- जे प्रकल्प सुरू आहेत, त्यांना गती देऊन पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य राहील. शेतकऱ्यांसाठी योजना केल्या आहेत. आरोग्यासाठी योजना केल्या आहेत. शिक्षणामध्ये ‘मॉडेल स्कूल’सारखे उपक्रम घेतले आहेत, त्याद्वारे शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम आम्ही करतोय. विकासाला आम्ही महत्त्व देतोय. पायाभूत सुविधांचे प्रकल्प जे आहेत - समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल, शक्तिपीठ, वसई-विरार मल्टिमॉडेल कॉरिडॉर, मुंबई-गोवा ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे इत्यादी मार्गी लावण्याला प्राधान्य राहील. आम्ही महाराष्ट्रात पाच हजार किलोमीटरचे ॲक्सेस कंट्रोल ग्रीडचे काम करणार आहोत. राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात सहा-सात तासात पोहोचता आले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर उद्योग राज्यात आणून तरुणांच्या हातांना रोजगार देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.