Cm Eknath Shinde : ‘शिवसेनेचा मतदार आमच्यासोबतच’

‘महाराष्ट्रातील शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्याच बरोबर असून निवडणुकीत त्यांनी आपल्यावर विश्‍वास ठेवल्याचे सिद्ध झाले आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on

मुंबई - ‘महाराष्ट्रातील शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्याच बरोबर असून निवडणुकीत त्यांनी आपल्यावर विश्‍वास ठेवल्याचे सिद्ध झाले आहे. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्यांचा विजय मात्र काँग्रेसच्या मतपेढीमुळे झालेला आहे. आपल्या विजयामुळे दोन वर्षांपूर्वी आपण जो उठाव केला, त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले,’ असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. आगामी विधानसभेत विरोधकांना त्यांची जागा दाखवू, असा विश्‍वास व्यक्त करतानाच शिंदे यांनी ‘ग्रामसभा ते विधानसभा’ असा नारा देत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

शिवसेनेच्या ५८ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील वरळी डोम येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या पक्षाचा वारंवार ‘उबाठा’ असा उल्लेख करत टोमणे मारले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि इतर ठिकाणीही चांगले यश मिळाले, असे शिंदे यांनी सांगितले. शिवसेनेला आणि ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या जागांची आणि मतांची तुलना करून शिंदे यांनी, सर्व जनता आणि शिवसेनेचा परंपरागत मतदार आपल्याबरोबरच असल्याचा दावा केला. हा विजय आपण ठासून मिळविला असून दोन वर्षांपूर्वी जो उठाव केला, तो जनतेने मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले,‘‘बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांना आज ‘हिंदू’ म्हणवून घेण्याची लाज वाटते; त्यांच्यात तसे धाडस नाही. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा आणि मते मागण्याचा अधिकारही उबाठा पक्षाने गमावला आहे. शिवसेनेच्या १९ टक्के मतदारांपैकी साडे चौदा टक्के मते आपल्याकडे कायम राहिली आहेत. त्यांचा स्ट्राइक रेट ४२ टक्के आहे तर, आपल्या पक्षाचा ४७ टक्के आहे.

लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना सरासरी साडे चार लाख मते मिळाली, तर आपल्या उमेदवारांना सरासरी चार लाख ९३ हजार मते मिळाली. एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार असे अनेकांना वाटत होते. मात्र, शिवसैनिकांच्या साथीने एकनाथ शिंदे जिंकला आहे.

विरोधकांना मिळालेल्या जागा ही तात्पुरती सूज आहे.’ उबाठा पक्षाचा विजय हा काँग्रेसच्या मतपेढीमुळे झाला आहे, असा दावाही शिंदे यांनी केला. हे सांगताना त्यांनी मुंबईतील काही मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाची माहिती देत, आपला दावा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

‘ग्रामसभा ते विधानसभा’

येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून देणे, हेच आपले उद्दिष्ट असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘‘येत्या तीन ते चार महिन्यांत आपल्या सरकारने दोन वर्षांत केलेले काम, मोदींनी दहा वर्षांत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा. विरोधकांनी केलेला खोटा प्रचार उघड करा,’ असा आदेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला. विधानसभा जिंकण्यासाठी झपाटून काम करण्याचे आवाहन करताना शिंदे यांनी ‘ग्रामसभा ते विधानसभा’ आपल्यालाच विजय मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

‘नवे मसिहा’

‘त्यांच्या सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले. ते आता औरंगजेबाची वाहवा करणाऱ्यांना साथ देत आहेत. ओवेसीपेक्षा आता हेच लोकांना मसिहा वाटत आहेत,’ असा टोमणा मारताना शिंदे यांनी विरोधकांच्या प्रचारसभांमध्ये दहशतवादाचा आरोप असणारे सहभागी झाले होते, असा आरोपही केला. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला, त्याच काँग्रेसला मतदान करणारे त्यांचे वारसदार कसे होऊ शकतात?, असा सवालही त्यांनी विचारला.

खोटा प्रचार पुसून काढू

‘महाविकास आघाडीने खोटा प्रचार करून दलित, मुस्लिम समाजाला फसवले आहे. राज्यघटना बदलणार असाही खोटा प्रचार विरोधकांनी केला आणि त्याचाच फटका बसला, हे मान्य करावेच लागेल. हा खोटा प्रचार आम्ही येणाऱ्या काळात पुसून काढू,’ असा विश्वास शिंदे यांनी सभेत व्यक्त केला. त्याचबरोबरच, इतर कोणत्याही वर्गाला धक्का न लावता मराठा आरक्षण आमच्याच सरकारने दिले आहे, त्यामुळे त्यामुळे इतर वर्गानेही शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कदम यांच्या म्हणण्याला पुष्टी

‘लोकसभेत आपले सात उमेदवार निवडून आले असले तरी आणखी पाच उमेदवार हे निवडून आले असते, मात्र भाजपच्या धोरणामुळे फटका बसला आणि अजित पवार हे महायुतीत थोडे उशिरा आले असते तरी चालले असते,’’ असे रोखठोक विधान नेते रामदास कदम यांनी केले होते. याचाच संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी,‘‘उमेदवार कशामुळे हरले हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र मी राज्याचा प्रमुख असल्याने महायुती टिकवणे माझी जबाबदारी असल्याने झाले ते विसरून आपल्याला पुढे जायचे आहे,’ असे शिंदे म्हणाले.

शिंदे म्हणाले ...

  • आमच्या उठावावर जनतेकडून शिक्कामोर्तब

  • परंपरागत मतदार शिवसेनेबरोबरच

  • ‘धनुष्यबाण’ पेलण्याची ताकद आमच्यामध्ये

  • फार काळ लोकांची दिशाभूल करता येणार नाही

  • आपल्याला महायुती मजबूत करायची आहे

  • ‘उबाठा’ गटाने आता आपले नाव बदलावे

  • पंढरीची वारी विरोधकांना घरी बसवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.