मुंबईत शिवसेनेला मुस्लीम समाजाची निर्णायक साथ

मुंबईत शिवसेनेला मुस्लीम समाजाची निर्णायक साथ

विनोद राऊत, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईतील मुस्लिम वस्त्यांमध्ये बदलाचे नुसते वारेच नव्हे, तर त्सुनामी आल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. १९९३ च्या मुंबई दंगलीच्या जखमा विसरून मुस्लिम मतदार पहिल्यांदाच शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला. अटीतटीच्या या लढाईत मुस्लिमबहुल भागात मिळालेल्या निर्णायक आघाडीच्या जोरावर शिवसेनेचे दोन खासदार निवडून आले आहेत, तर काँग्रेस उमेदवाराच्या विजयात अल्पसंख्याक समाजाने मोलाची भूमिका बजावली आहे.

बाबरी मशीद पाडल्यानंतर १९९३ मध्ये मुंबईत उफाळलेल्या दंगलीने हिंदू-मुस्लिम समाजात कायमची कटुता निर्माण केली. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर भूमिका घेतल्याने शिवसेना या दंगलीत सक्रिय होती. दंगलीत सहभागी असलेल्या शिवसेना नेत्यांवर श्रीकृष्ण आयोगाने ठपकाही ठेवला होता. या दंगलीनंतर शिवसेनेने प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका अंगीकारली. यामुळे मुस्लिम समाज कायमचा शिवसेनेपासून दूर झाला, मात्र तीन दशकानंतर मुंबईतील हे चित्र बदलले असून मुंबईत पहिल्यांदा मुस्लिम वस्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेला मतदान केल्याचे समाजाचे म्हणणे आहे.

दक्षिण मुंबई
शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत ५३ हजारांनी विजयी झाले. लोकसभा मुंबादेवी आणि भायखळा या दोन्ही मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेतली. या आघाडीमुळे सावंत यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. मुंबादेवीतून ४० हजार, तर भायखळ्यातून जवळपास ४६ हजारांची आघाडी सावंत यांना मिळवून दिली. त्या तुलनेत सावंत यांना वरळी, शिवडी या मराठीबहुल विधानसभा मतदारसंघाने १० ते २० हजारांची आघाडी मिळवली.

ईशान्य मुंबई
गुजरातीबहुल मतदारांची मोठी लोकसंख्या असलेल्या ईशान्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी २९ हजार ८६१ मतांनी विजय मिळवला. गुजरातीबहुल मुलुंड, घाटकोपर पश्चिममध्ये भाजपच्या मिहीर कोटेचा यांनी पाटील यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली होती, मात्र मुस्लिमबहुल मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील यांनी तब्बल ८७ हजार ९७१ मतांची आघाडी घेतल्याने ते विजयी झाले आहेत. या मतदारसंघात संजय दिना पाटील यांना एक लाख १६ हजार ७२ मते पडली, तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांना केवळ २८,१०१ मते मिळाली.

दक्षिण मध्य मुंबई
मतदारसंघात शिवसेनेचे अनिल देसाई ५३ हजार मतांनी विजयी झाले. या मतदारसंघात विजय नव्हे, पण मताधिक्य देण्यात मुस्लिम प्राबल्य असलेल्या अणुशक्तीनगर आणि मुस्लिम समाजाची प्रभावी संख्या असलेल्या शीव कोळीवाडा या दोन मतदारसंघाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अणुशक्तीनगरमधून २९ हजारांची लीड, तर शीव कोळीवाडा मतदारसंघातून ९,३१२ मतांच्या आघाडीमुळे देसाई यांना विजयापर्यंत पोहोचण्यात मदत मिळाली आहे.

काँग्रेसला तारले
वर्षा गायकवाड यांना कुर्ला, चांदीवली, वांद्रे पूर्व, कलिना या मुस्लिमबहुल मतदारसंघातून ७४ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे गायकवाड यांना उज्ज्वल निकम यांनी घेतलेली ५८ हजारांची आघाडी तोडून विजय संपादन करता आला, तर उत्तर मुंबईतील सहापैकी भाजपच्या पियूष गोयल यांनी पाच मतदारसंघात मताधिक्य घेतले. केवळ मालाड पश्चिम या मुस्लिमबहुल मतदारसंघात काँग्रेसच्या भूषण पाटील यांना १५३८ मतांची आघाडी मिळाली.

हिंदुत्व साेडून काँग्रेससोबत गेलेल्या उबाठाबाबत मुस्लिम समाजाला खात्री झाल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत फतवे काढून उबाठा उमेदवारांना एकगठ्ठा मतदान केले. मुस्लिम मतांमुळेच उबाठाचे उमेदवार निवडून आले. अन्यथा एक लाखाने ते पराभूत झाले असते.
दीपक केसरकर, नेते शिवसेना (शिंदे गट)
...
मानखुर्दच्या बांगलादेशी मतदारांमुळेच मिहीर कोटेचा यांचा पराभव झाला आहे.
किरीट सोमय्या, भाजप नेते
...
कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेदभाव न करता मुंबईकरांची काळजी घेतली. मुंबई पालिकेत अडीच दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे, मात्र मुस्लिम धर्मीयांसोबत काही भेदभाव झाला नाही. यासोबत संविधान वाचवण्याच्या नाऱ्यावरही मुस्लिम समाजाने शिवसेनेला भरभरून मतदान केले.
फारुख इंजिनीयर, मुस्लिम विचारवंत
...
मुस्लिम शिवसेनेकडे का झुकला
- कोरोना काळात उद्धव ठाकरे यांचे काम
- संविधान, लोकशाही बचावचा नारा
- शिवसेना सर्वसमावेशक झाली
- हिंदुत्वाची व्यापक व्याख्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com