कांदळवनांनी अडवली नवी मुंबईच्या विकासाची वाट 

 कांदळवनांनी अडवली नवी मुंबईच्या विकासाची वाट 
Updated on

नवी मुंबई  : नयनरम्य खाडीकिनाऱ्याबरोबर कांदळवनांच्या रूपाने विपुल वनसंपदा लाभल्याने नवी मुंबईचा लौकिक आहे; मात्र आता ही कांदळवने शहराच्या सेवा रस्ता, मलनिःसारण वाहिन्या अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अडथळा ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबई शहराला दिवाळे खाडी ते ऐरोलीपर्यंत विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. त्यामध्ये हजारो हेक्‍टरवर कांदळवने आहेत. 

महापालिका नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी पामबीच मार्गाला सेवा रस्त्याची जोड देत आहे; परंतु सानपाडा आणि बेलापूर मुख्यालयाजवळ कांदळवने विभाग आणि एमसीआरझेडने ना हरकत दाखला न दिल्यामुळे हे काम सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून रखडले आहे. 

महापालिकेच्या मलनिःसारण केंद्रातून स्वच्छ केलेले पाणी उद्यानांना देण्यासाठी नेरूळ येथे जलवाहिन्या टाकत आहे. या कामातही कांदळवनांचा आणि एमसीआरझेडचा अडथळा आल्याने हे कामही ना हरकत दाखल्याच्या प्रतीक्षेत आहे. याव्यतिरिक्त एमसीआरझेडच्या ना हरकत दाखल्याचा सर्वाधिक मोठा फटका अमृत योजनेतून सुरू असलेल्या "टर्शरी ट्रिटमेंट प्लांट'च्या कामाला बसला आहे. कोपरखैरणे येथून ऐरोली येथील नवीन केंद्रादरम्यान मलनिःसारण वाहिन्यांच्या जलवाहिन्यांचे नवे जाळे निर्माण करायचे आहे. त्या कामालाही ना हरकत दाखला मिळाला नसल्याने हे काम धीम्या गतीने सुरू आहे. 

सीबीडी-बेलापूर धारण तलावाची स्वच्छता रखडली 
सीबीडी-बेलापूर येथे सिडकोने तयार केलेल्या धारण तलावांमध्ये भरतीच्या पाण्यामुळे कांदळवने तयार झाली आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या कांदळवनांमुळे धारण तलावात गाळ साचला आहे. या अधिक गाळामुळे तलावाची पाणी साठवण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे दर वर्षी हा तलाव पावसाच्या पाण्यामुळे तुंबतो. त्यामुळे पावसाचे पाणी सीबीडी, सेक्‍टर 3, 4, आणि 5 तसेच सेक्‍टर 1 ते 11 येथील नाल्यांद्वारे रहिवाशांच्या घरात आणि दुकानात घुसते. दरवर्षी या ठिकाणी कमान 100 दुकाने पाण्यात बुडत असल्याने माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी सांगितले. त्यांनी कांदळवने स्वच्छ करण्यासाठी प्रशासनामागे तगादा लावला आहे. 

कांदळवनांचा अडथळा दूर झाल्यास काय होणार? 
पाम बीच मार्गावरील सेवा रस्ते 
- पाम बीच मार्गावर सानपाडा आणि नेरूळ येथील काही फुटांच्या अंतरावरील सेवा रस्ता अडकला आहे. हा रस्ता झाल्यास शहरातील वाहनांना प्रवेश करण्यास प्रत्येक वेळेला पाम बीच मार्गावर जाण्याची आवश्‍यकता नाही. पाम बीच मार्गावरचा ताण कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटेल. 

- उद्यान विभागातील झाडांना पिण्याचे पाणी 
मलनिःसारण केंद्रात शुद्ध होणारे पाणी उद्यानांतील झाडांना देण्याचे काम रखडले आहे. नेरूळ विभागातील उद्यानांमध्ये वेगळी जलवाहिनी टाकून झाडांना प्रक्रिया केलेले पाणी देऊन 5 एमएलडी पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. 

- टर्शटी ट्रिटमेंट प्लांट 
मलनिःसारण प्रक्रिया केंद्रात शुद्ध केलेल्या पाण्याचे पुन्हा शुद्धीकरण हे पाणी एमआयडीसीला विक्री करायचे आहे, परंतु कोपरखैरणे आणि ऐरोली मलनिःसारण केंद्रांना जोडणाऱ्या जलवाहिन्यांच्या कामाला एमसीआरझेडचा ना हरकत दाखला नसल्याने हे काम थांबले आहे. जलवाहिन्यांचे जाळे नसल्यामुळे ऐरोलीच्या केंद्राचे काम खोळंबले आहे. त्यामुळे एमआयडीसीला पाणी विक्री करून नफा कमावण्याचा मार्ग सध्या बंद आहे. 

  सीबीडी-बेलापूरच्या धारण तलावाची स्वच्छता 
सीबीडी-बेलापूर येथील धारण तलावात वाढलेल्या कांदळवनांची स्वच्छता न झाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात येथील घरे आणि दुकानांमध्ये पाणी घुसते. घरातील साहित्याचे आणि दुकानातील सामानाचे नुकसान होते. धारण तलाव स्वच्छ केल्यास दरवर्षी सीबीडी-बेलापूर शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल. 

एमसीआरझेडच्या परवानगीमुळे कोपरखैरणे-ऐरोलीदरम्यानच्या टर्शरी ट्रिटमेंट प्लांटच्या कामावर परिणाम झाला आहे. ऐरोलीचे प्रक्रिया केंद्राचे काम थांबलेले आहे. प्रक्रिया केलेले पाणी उद्यानांना देण्याचे पाच एमएलडीचे कामही ना हरकत दाखल्यामुळे रखडले आहे. या सर्व कामांचे प्रस्ताव एमसीआरझेडकडे सादर केले आहेत. या कामांबाबत पाठपुरावा करून हा प्रश्‍न सोडवण्यात येणार आहे. बेलापूर येथील धारण तलावाबाबत न्यायालयात बाजू मांडण्याचे आदेश पॅनेलवरील वकिलांना दिले आहेत. 
- अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका 
 

- संपादन : नीलेश पाटील 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.