दिवा - दिवा शहरात पालिका व वाहतूक प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था केलेली नसली तरीही रस्त्यावर फेरीवाले बसवून ठेवले आहेत. दुसरीकडे आपली वाहने रस्त्याकडेला पार्क करणाऱ्या नागरिकांच्या गाड्या मात्र पोलीस येऊन उचलत असल्याने नागरिकांत तीव्र संताप असल्याचे सांगत ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिव्यात पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पालिका आणि वाहतूक विभागाकडे केलेली आहे.
दिवा शहरात एकाही रस्त्याला पालिकेच्या माध्यमातून किंवा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. खरे तर रस्त्याच्या कडेला नागरिकांना पार्किंग उपलब्ध करून द्यायला पाहिजे. मात्र दिव्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसविण्यात आले आहेत. तसेच त्या फेरीवाल्यांकडून पालिका रोजचा आकार 20 रुपये घेते. तसेच रोड टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना मात्र वाहने पार्क करायला जागा नाही.
कामाला जाणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने पार्क केली तर ती उचलून नेली जातात. दिव्यात एकतर तुम्ही पार्किंग उपलब्ध करून देत नाहीत आणि रस्त्यांवर फेरीवाले बसवता, मग सामान्य नागरिकांनी त्यांच्या गाड्या पार्क कुठे करायच्या? असा प्रश्न रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे.
दिवा स्थानकात सकाळी रेल्वेने कामाला जाण्यासाठी आगासन, बेडेकर नगर, गणेश नगर, म्हातार्डी, बेतवडे, दातिवली, खर्डी, निर्मल नगरी अशा ठिकाणा वरुन येणारा प्रत्येक नागरिक स्टेशनजवळील रस्त्यांवर आपली स्वतःची दोन चाकी गाडी उभी करुन जात असतो. पण तीच गाडी वाहतूक पोलीस उचलून नेल्याने त्यांच्या मनस्तापात अजूनच भर पडते.
तसेच उचलून नेलेल्या गाड्यांच्या जागी त्या गाड्या कुठे मिळतील याची खडूने नोंद ही वाहतूक पोलीस करत नसल्याने त्या गाड्या चालकांना दोन दोन दीवस सापडत नाहीत. तसेच संपूर्ण दिव्यात झोनल प्रक्रिये द्वारे रस्त्याच्या कडेला पार्किंग नाही, तर पालिकेचे दिव्यात वाहनतळ ही नागरिकांना उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. यावर पालिका व पोलीस प्रशासनाने दिव्यात लवकरात लवकर पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
रोहिदास मुंडे, दिवा शहर संघटक, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे - दिव्यातील लोकसंख्या पाच लाखाच्यावर आहे. दिव्यातील नागरिक सामान्य असून नोकरदार वर्ग आहे. त्यामुळे सकाळी कामाला जाताना तो आपली दुचाकी ही स्टेशन परिसरात लावत असतो. परंतु रस्त्यावरती हातगाड्या लावत असल्यामुळे पार्किंगची समस्या ही बिकट झालेली आहे.
दिव्यात पार्किंग व्यवस्था नाही. दिव्यातली ट्रॅफिक काढण्यासाठी RTO कडे मनुष्यबळ कमी आहे, असे वाहतूक पोलीसांकडून सांगितले जाते. मग गाड्या उचलण्यासाठी यांच्याकडे मनुष्यबळ कुठून येते. याचा अर्थ दिव्यातील माजी लोकप्रतिनिधी व RTO यांचे काही साटलोटं आहे का?
तसेच दिव्यातील पार्क केलेल्या गाड्या उचलण्या आधी पार्किंगची सुविधा पालिकेने द्यावी आणि वाहतूक पोलीसांनी दिवा टर्निंग येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय योजना कराव्यात, अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
राकेश मुंडे, स्थानिक, आगासन -
मी रोज अंधेरीला कामाला जातो. त्यासाठी माझ्या आगासनच्या घरापासून मी साडे तीन किलो मीटरचा प्रवास करुन मी दिवा स्थानकात येऊन माझी दुचाकी लावतो. पण गेल्या महिन्यात माझी दुचाकी वाहतूक पोलीसांनी उचलून मुंब्रा हायवे या भागात नेल्याने मला त्या संध्याकाळी मनस्ताप झाला. दिव्यातील स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना जागा मिळते मग पार्किंगची सुविधा का नाही. आम्ही गाववाल्यांनी का त्रास सहन करायचा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.