देशभर दिवाळीची धामधूम सुरू असताना बहुसंख्य शहरांचा श्वास प्रदूषित हवेमुळे घुसमटल्याचे चित्र पाहायला मिळाले. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळूर आणि चेन्नई या मेट्रो शहरांवर दूषित हवेचे ढग दाटून आले आहेत. राज्यात पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही हवेचा दर्जा प्रचंड खालावला होता. अनेक ठिकाणांवर आतषबाजीने आवाजाची पूर्वनिर्धारित पातळी ओलांडल्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागला. नागपूर आणि नाशिक शहरांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.(Latest Marathi News)
दिवाळीच्या आतषबाजीने बहुसंख्य शहरांतील चित्र बदलले असून श्वसनविकारांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘पीएम २.५’ कणांचे हवेतील प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले आहे. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४३३ वर पोचला असून तो आता पुन्हा धोकादायक श्रेणीमध्ये आला आहे, असे ‘आयक्यूएअर’ने म्हटले आहे. सोमवारी पहाटे तीनच्या सुमाराला दिल्लीतील ‘एक्यूआय’ ८०० पर्यंत गेला होता.
मध्यंतरी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या पावसामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला होता पण दिवाळीतील फटाक्यांमुळे त्यावर पाणी पडले आहे. सध्या राजधानी दिल्लीच्या हवेतील ‘पीएम-२.५’ कणांचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा ७९ पटीने अधिक असल्याचे दिसून आले. जगातील दहा आघाडीच्या प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली, कोलकता आणि मुंबईचा समावेश आहे. कोलकता (१९६) हे चौथ्यास्थानी तर मुंबई नवव्यास्थानी (१५६) आहे.
दिल्लीतील प्रदूषणामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपच्या लोकांनी नागरिकांना फटके फोडायला भाग पाडले, त्यामुळे रातोरात राज्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक शंभर अंकांच्या पुढे गेल्याचा आरोप दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाळ राय यांनी केला आहे.
रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग
रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने सर्वत्रच जोरदार आतषबाजी करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पाहायला मिळाले. चेन्नई, लखनौ आदी शहरांमध्ये कचऱ्याच्या या समस्येने गंभीर रूप धारण केले होते. आमच्याकडे दिवाळीनंतर दरवर्षी पन्नास टनांपेक्षाही अधिक कचरा जमा होतो, असे लखनौ महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Marathi Tajya Batmya)
..तर सम-विषम योजना
पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले, ‘‘ हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४५० किंवा वरील पातळीवर पोहोचल्यास सरकार सम-विषम वाहन योजना लागू करेल. शहरात रविवारी रात्री दिवाळीसाठी फोडण्यात आलेले फटके हे उत्तर प्रदेश आणि हरियानातून आणण्यात आले होते. तिथे फटाक्यांवर बंदी असती तर प्रदूषण झाले नसते. या तिन्ही राज्यांमध्ये पोलिस दल भाजपच्या ताब्यात आहे.’’ हा निर्देशांक ४०० ते ५०० च्यावर गेल्यानंतर त्याचा निरोगी लोकांच्या श्वसन यंत्रणेवर विपरीत परिणाम होतो. या निर्देशाकांत ० ते ५० ही पातळी चांगली मानली जाते.
मुंबईच्या कानाचे पडदे फाटले
मुंबईतील प्रदूषणाची समस्या बिकट झाली असून यंदा पर्यावरणपूरक आणि कमी आवाजाचे फटाके फोडण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाला न जुमानल्यामुळे ठिकठिकाणी फटाक्यांचा आवाज वाढल्याचे निरीक्षण ‘आवाज’ फाउंडेशनने नोंदविले आहे. या संस्थेने काही ठराविक ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात ध्वनिप्रदूषण वाढल्याची बाब उघड झाली आहे. (Latest Maharashtra News)
‘मरिन ड्राइव्ह’ परिसरात सर्वाधिक ११७.२ डेसिबल आवाजाची नोंद झाली असून तीन वर्षांतील ही सर्वाधिक पातळी ठरली. मालाड, बोरिवली, बीकेसी आणि चेंबूर परिसरात हवेची गुणवत्ता खालावली असून हा भाग रेड झोनमध्ये गेला आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संभाजीनगर शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक तब्बल २०० च्या घरात पोचला होता. धाराशिवमध्येही काही अशीच स्थिती पाहायला मिळाली.
नागपूरमध्ये आगी
फटाक्यांमुळे नागपूर शहरात दिवाळीच्या दिवशी १७ ठिकाणी आग लागल्याच्या घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये तीन लाखांपर्यंतचे नुकसान झाले. सर्वच ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. या दुर्घटनांत विविध ठिकाणांवर ५० जण भाजले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत नाशिकमध्ये यंदा तिप्पट प्रदूषण झाले असून वायू आणि ध्वनी प्रदूषणाने उच्चांक गाठला होता. जळगाव शहरामध्येही प्रदूषणाची स्थिती बिकट झाली आहे..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.