Doctors Village Gharivali : डॉक्टरांचे गाव घारीवली! जिल्हा परिषद शाळेतून घडले 20 डॉक्टर

गावात जिल्हा परिषदेची 7 वी पर्यंत शाळा...याच शाळेतून शिक्षण घेतलेले 20 विद्यार्थी आज डॉक्टर झाले असून राज्यात गावाच्या नावाची ओळखच बदलली आहे.
Doctos
DoctosSakal
Updated on

डोंबिवली - गावात जिल्हा परिषदेची 7 वी पर्यंत शाळा...याच शाळेतून शिक्षण घेतलेले 20 विद्यार्थी आज डॉक्टर झाले असून राज्यात गावाच्या नावाची ओळखच बदलली आहे. डोंबिवली जवळील 27 गावांतील घारीवली गावाची आज डॉक्टरांचे गाव म्हणून नव्याने ओळख निर्माण झाली आहे. गावात 25 ते 30 आगरी समाजातील गावकऱ्यांची घरे असून 20 डॉक्टर या घरांत आहेत.

आगरी समाज म्हटले की पदवी पर्यंतचे शिक्षण मुल कसेबसे पूर्ण करतात. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मुले उच्च शिक्षण घेतात. घारीवली गावातील मुलांनी मात्र एक वेगळाच आदर्श सर्व समाजापुढे निर्माण केला आहे. त्यांच्या कामाची पोचपावती व इतरांना त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून गावकऱ्यांनी मुलांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाचा फलक गावाच्या वेशीवर लावला आहे.

सातारा, पुणे या भागात काही अशी गावे आहेत की त्या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती हा लष्करात असतो. त्यामुळे सैनिकांचे गाव, जवानांचे गाव अशी ओळख त्या गावांना पडते. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली मधील 27 गावातील घारीवली गावाने देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या गावातील मुलांनी शिक्षणात प्रगती करत वैद्यकीय शिक्षण घेत राज्यातील नकाशावर गावाची डॉक्टरांचे गाव अशी ओळख करुन दिली आहे. गावातील 20 जणांनी डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करुन आज ते वैद्यकीय क्षेत्रात सुविधा देत आहेत. मुलांच्या या कामगिरीमुळे सर्व पक्षिय युवा मोर्चा व गावकऱ्यांनी त्यांचा सन्मान करण्याचे योजिले.

या मुलांचा आदर्श इतर गावांनी सुद्धा घ्यावा याकरीता या विद्यार्थ्यांच्या नावाचे फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आला असून रविवारी त्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी सरपंच सुभाष पाटील, गजानन पाटील, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कदम, मिनाक्षी परब, कदम सर, डॉक्टर विद्यार्थी यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कल्याण डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असले तरी पालिकेत समाविष्ट झालेली 27 गावे मात्र विकासापासून आजही वंचित आहेत. यातीलच एक घारीवली गाव. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. गावात जेमतेम गावकऱ्यांची 30 च्या आसपास घरे असून याच जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांनी 7 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बाजूच्याच गावातील सखाराम शेठ शाळेत 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

1992 - 94 काळात प्रिमिअर कंपनीत गावातील काही ग्रामस्थ हे काम करीत होते. ही कंपनी बंद झाल्यानंतर अनेक समस्या त्यांच्यापुढे उभ्या होत्या. त्यावेळी आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, नाव कमवावे, नोकरी करावी अशी इच्छा पालकांची होती. त्यातूनच हे विद्यार्थी घडले असल्याचे पालकवर्ग सांगतात. डॉ. संजय पाटील यांनी गावातील पहिले डॉक्टर होण्याचा मान पटकाविला.

संजय यांनी एमएस ईएनटी शिक्षण घेतले असून ते आज वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर गावातील इतर मुलांना देखील आपण वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घ्यावे अशी इच्छा झाली. आणि गावात 20 विद्यार्थी आज डॉक्टर झाले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊनही इच्छा शक्तीच्या जोरावर तुम्ही उच्च शिक्षण घेऊ शकता असाच संदेश या मुलांनी देऊ केला आहे. आगरी समाजातील मुलांची पावले शिक्षणाकडे आत्ता वळू लागली आहेत.

जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. या गावातील मुलांनी मात्र इतर गावातील मुलांना एक वेगळाच आदर्श देऊ केला आहे. केवळ वैद्यकीय शिक्षण घेऊन सेवा देऊ नये तर गोर गरीबांना देखील त्याला लाभ मिळावा यासाठी भविष्यात घारीवली गावात रुग्णालय उभे राहील्यास त्या रुग्णालयात मोफत सुविधा देखील हे डॉक्टर देणार आहेत.

जिल्हा परिषद शाळेत माझे शिक्षण झाले आहे. माझ्या घरच्यांची तसेच वडिलांची इच्छा होती की मी उच्च शिक्षण घ्यावे. शिक्षणातही चांगला असल्याने मला वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची उत्सुकता होती. शाळेतील शिक्षक, घरच्यांच्या पाठिंब्याने मी ते शिक्षण पूर्ण करु शकलो. 2000 साली मी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. तर 2005 साली एमएस ईनटी पूर्ण केले. डोंबिवलीत मी सध्या प्रक्टीस करतो. या क्षेत्रात मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी मी मुलांना मार्गदर्शन करतो.

- डॉ. संजय पाटील, कान नका घसा तज्ञ

माझ्या घरात मुलगा, सूनबाई तसेच काकांच्या मुली डॉक्टर आहेत. गावात मी आई वडिलांच्या नावे ट्रस्टचे रुग्णालय उभारणार असून तेथे गावातील सर्व डॉक्टर मोफत ओपीडी सेवा देतील अशी विनंती केली आहे. त्यांनी ती मान्य केली आहे. जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुलांनी आज उच्च शिक्षण घेतले असून शाळेतील शिक्षकांचा आम्ही सन्मान केला आहे. गावाच्या वेशीवर लावलेला फलक हा फलक नसून आगरी समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी हा फलक राहील.

- सुभाष पाटील, सरपंच घारीवली गाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.