Latest Traffic News : गणेशोत्सव सर्वत्र आजपासून उत्साहात साजरी केला जात आहे. सणाच्या निमित्ताने नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर वाहने घेऊन निघत असल्याने शहरात वाहन कोंडीची समस्या उद्भवते. रविवारी दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन आणि रविवार असल्याने या दिवशी वाहन कोंडीची समस्या अधिक तीव्र होऊ शकते. हे पाहता वाहतूक विभागाच्या वतीने गणेशोत्सव व गणपती विसर्जन कालावधीत डोंबिवली पूर्व व पश्चिमेतील मुख्य रस्त्यांवर काही वाहतूक बदल केले आहेत. तशी अधिसूचना वाहतूक विभागाच्या वतीने जारी करण्यात आली आहे.
रस्त्यांची दुरावस्था, पावसाची संततधार यामुळे शहरात सकाळ संध्याकाळ वाहन कोंडीची समस्या उद्भवत आहे. शनिवारी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा विराजमान होत आहेत. सायंकाळी भाविक गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. शनिवार रविवार ही लागून सुट्टी आल्याने भाविक गणेश दर्शनासाठी घराबाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच रविवारी दिड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन आहे.