Ram Nemade : डोंबिवलीतील ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम नेमाडे यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम नेमाडे (वय 84) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी दुपारी दुःखद निधन झाले.
Ram nemade
Ram nemadesakal
Updated on

डोंबिवली - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम नेमाडे (वय 84) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी दुपारी दुःखद निधन झाले. येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर डोंबिवली येथील शिवमंदिर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे.

प्राचार्य राम नेमाडे यांचा जन्म 8 एप्रिल 1940 ला शेतकरी मजूर कुटुंबात झाला. अकरावी पर्यत शिक्षण घेतल्यावर त्यांनी माध्यमिक शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. राष्ट्रभाषा पंडित व सीनियर हिंदी शिक्षक सनद ह्या पदव्या घेतल्या. पुढे बाहेरून बी.ए ऑनर्स पदवी संपादन करून रात्र काॅलेजातून पुणे विद्यापीठाचे एम्.ए. व नियमित बी. एड् प्रशिक्षण पदवी घेतली.

विश्वकर्मा विद्यापीठ, दिल्ली यांनी डी. लिट. ही मानद डिग्री त्यांना प्रदान करण्यात आली. शाळा-काॅलेजातून अध्यापन करून पुढे स्वेच्छा निवृत्ती घेऊन ' राजेश स्टडी सेंटर ' नावाने शिक्षण वर्ग त्यांनी चालविले. मराठी, हिंदी भाषा अध्यापना बरोबरच निबंध, व्याकरण-लेखनाची पुस्तके प्रकाशित केली.

'ऋतुगंध,' हिरवा चाफा,' 'अभंग वारीचे- दुनियादारीचे,' 'माही लेवागणबोली आणि इतर कविता,' हे चार कविता संग्रह प्रकाशित झाले असून वृत्तपत्र, मासिकांतून कविता, लेख, कथा इ. लेखन सुरू होते. साहित्यिकांच्या पुस्तकांना प्रस्तावना, अभिप्राय देऊन प्रोत्साहित करण्याचे काम त्यांनी केले आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. सामाजिक कार्यात यथाशक्ती योगदान.पहिल्या लेवागणबोली साहित्य संमेलन, जळगाव,संमेलनाध्यक्ष पद भूषविले आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. प्रकृती ठीक नसतानाही समिती मधील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली होती. नुकत्याच पार पडलेल्या जादूटोणाविरुद्ध कायद्याच्या प्रबोधन यात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

घरात पाय घसरून पडल्याने त्यांना दुखापत झाली होती. नोव्हेंबर महिन्यापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होत होते. त्यांना पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.