Dombivali News : डायघर घनकचरा प्रकल्पास गावकऱ्यांचा विरोध; गावकरी उतरणार रस्त्यावर

ठाणे महानगरपालिकेच्या भंडार्ली येथील डम्पिंग ग्राउंडस गावकऱ्यांचा तीव्र विरोध होत असतानाच आता डायघर येथील घनकचरा प्रकल्पास गावकऱ्यांनी विरोध दर्शविला.
Yogesh Patil
Yogesh PatilSakal
Updated on

डोंबिवली - ठाणे महानगरपालिकेच्या भंडार्ली येथील डम्पिंग ग्राउंडस गावकऱ्यांचा तीव्र विरोध होत असतानाच आता डायघर येथील घनकचरा प्रकल्पास गावकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. डायघर पंचक्रोशी संघर्ष समिती अंतर्गत पालिका क्षेत्रातील 8 गावातील गावकरी शुक्रवारी रस्त्यावर उतरून मानवी साखळी आंदोलन करत निषेध करणार आहेत.

मौजे डायघर येथील 18 हेक्टर पैकी 5 हेक्टर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. मात्र यामुळे आजूबाजूच्या शेतजमिनीस तसेच मानवी आरोग्यास प्रदूषणामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे गावकऱ्यांनी हा विरोध दर्शवला आहे.

हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी करत हे आंदोलन छेडले जाणार आहे. भंडार्ली येथील गावकऱ्यांच्या रोषानंतर आता डायघर वासीयांच्या रोषाचा सामना पालिका प्रशासनास करावा लागणार आहे.

दिवा येथील डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी हटविण्यासाठी ठाणे महापालिकेकडून डायघर येथे घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. डायघरचे काम सुरू असल्याने तात्पुरत्या स्वरूपात भंडार्ली येथे हा प्रकल्प उभारण्यात आला. भंडार्ली डम्पिंगच्या प्रकल्पाची मुदत संपल्याने 14 गावातील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत हा प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा दिला होता.

यानंतर दोन महिन्याच्या मुदतीत भंडार्ली येथील डम्पिंग बंद करण्यात येईल असे ठाणे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. डायघर येथील घनकचरा प्रकल्पाचे काम जोरात सुरू असून लवकरच हा प्रकल्प सुरू होण्याची चर्चा गावांत सुरू आहे.

ठाणे महानगरपालिका यांच्या मंजूर सुधारित विकास योजनेअंतर्गत मौजे डायघर येथील 18 हेक्टर पार्कसाठी आरक्षित जमिनीपैकी 5 हेक्टर जमिनीत घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. या प्रकल्पास डायघर पंचक्रोशी संघर्ष समितीने विरोध केला आहे.

या पंचक्रोशीतील डायघर, शीळ, पडले, खिडकाळी, देसाई, उत्तरशीव, गोटेघर, सांगर्ली या गावातील गावकरी शुक्रवारी सकाळी डायघर येथील डी.के.दास महाराज क्रीडांगण समोर आंदोलन करणार असल्याची माहीती ग्रामस्थ संतोष पाटील यांनी दिली.

गेल्या वीस वर्षापासून या प्रकल्पास येथील गावकरी विरोध करत आहेत. दहिसर येथील मंडळ अधिकारी यांनी सरकारी जमिनीची प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली आहे. त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार या जमिनीमध्ये काही शेतकरी भात शेती करत आहेत. भूमिहीन शेतमजुरांचे प्लॉट्स आहेत. गृहप्रकल्प येथे उभे राहिले आहेत.

या जागेतून अति विद्युत दाबाच्या विजेच्या वाहिन्या गेल्या आहेत. 18 हेक्टर पैकी 17 हेक्‍टर जमीन गुरचरण असून पाच हेक्टर जमीन घनकचरा प्रकल्पास देण्यास आमचा विरोध आहे असे ग्रामस्थ योगेश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.