मतमोजणीच्या दिवशी डोंबिवली वाहतुकीत बदल

मतमोजणीच्या दिवशी डोंबिवली वाहतुकीत बदल

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : पुढील आठवड्यात ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुल परिसरात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ४) डोंबिवलीतील वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. पहाटे ५ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत हे बदल राहतील, अशी माहिती वाहतूक विभागातर्फे देण्यात आली आहे.

मंगळवारी मतमोजणी असल्याने या दिवशी येथे वाहन कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय मतमोजणीच्या ठिकाणी येणारे पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची वाहने, नागरिकांची वर्दळ यामुळे कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी वाहतूक विभागाने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. मंगळवारी सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे बदल लागू राहतील, अशी अधिसूचना काढली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. तसेच ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी थेट लढत होत आहे. मंगळवारी दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. यासोबतच क्रीडा संकुलासमोरील रस्ता हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कल्याण, ठाणे, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने, डोंबिवली एमआयडीसी, निवासी भागात जाणारी वाहने या मार्गाचा वापर करतात. यामुळे येथे सातत्याने वाहनांची वर्दळ असते.

असे आहेत वाहतुकीत बदल
डोंबिवली स्टेशन, चार रस्ता, टिळक चौक, शेलार नाका मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम हॉस्पिटल, डोंबिवली पूर्व येथे प्रवेश बंदी आहे; तर ही वाहने शिवम हॉस्पिटलला येऊन जिमखाना रोड, सागर्ली मार्गे इच्छित स्थळी जातील.

सुयोग रिजन्सी अनंतम, पेंढारकर कॉलेज मार्गे घरडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर. आर. हॉस्पिटल, डोंबिवली पूर्व येथे प्रवेश बंदी आहे. ही वाहने आर. आर. हॉस्पिटल येथून डावीकडे वळून कावेरी चौक, एम.आय.डी.सी. मार्गे इच्छित स्थळी जातील.

खंबाळपाडा रोड, ९० फूट रस्ता, ठाकुर्ली रोडकडून घरडा सर्कलकडे तसेच विको नाकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेल येथे प्रवेशबंदी आहे. पर्यायी मार्ग खंबाळपाडा रोड, ९० फुट रस्ता, ठाकुर्ली रोड कडून येणारी वाहने खंबाळपाडा रोड टाटा नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

आजदे गाव आणि आजदे पाडा कमान येथून घरडा सर्कल मार्गे बंदिश पॅलेस हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना घरडा सर्कल येथे प्रवेशबंदी आहे.आजदेगाव आणि आजदे पाडा कमान येथून बाहेर पडणारी वाहने डावीकडे वळून शिवम हॉस्पिटलमार्गे इच्छित स्थळी जातील.

विको नाकाकडून बंदिश पॅलेस हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हॉटेल मनीष गार्डन येथे प्रवेश बंदी आहे. त्यामुळे विको नाकाकडून येणारी वाहने हॉटेल मनीष गार्डन येथून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.