मुंबई : कोरोना संसर्गामुळे अनेक रुग्णालयांचे रुपांतर कोव्हिड रुग्णालयात केल्याने इतर आजार असलेल्या रुग्णांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता हळूहळू सरकारी रूग्णालयातील बाह्य सेवांसह बहुतेक विभाग हळूहळू सामान्य स्थितीत परत येत आहेत. मात्र, मानसिक आजार असलेल्या रुग्णांसाठी अद्यापही अनेक रुग्णालयांचे दरवाजे बंद असल्याचे दिसून येत आहे. सद्या अनेक रुग्णालयांतील बहुतांश वॉर्ड कोव्हिड वॉर्डमध्ये रूपांतरित झाले आहेत. त्यामुळे, जागेचा प्रश्न निर्माण झाला असून इतर रुग्णांसोबत मानसिक रुग्णांवर उपचार कुठे करावे, असा प्रश्न विचारला जात आहे.
गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात एप्रिलपासून मनोरुग्णांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे, जेव्हापासून हे रुग्णालय एक समर्पित कोव्हिड -19 सुविधेमध्ये बदलले गेले. त्याच महिन्यात जेजे रुग्णालयातही मानसिक रूग्ण घेणे बंद केले असून इथला मनोरुग्ण वॉर्ड जागेच्या कमतरतेमुळे कोविड वॉर्डमध्ये रूपांतरित झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात मानसिक रूग्णांसाठी पुन्हा सेवा सुरू होण्यास काही महिने लागतील. जेजे हॉस्पिटलमधील मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. विनायक काळे म्हणाले, ''आम्ही ओपीडीच्या आधारे स्किझोफ्रेनिया किंवा सायकोसिस रूग्णांचे व्यवस्थापन करीत आहोत." हॉस्पिटलमधील आणखी एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, काही मानसिक रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती, त्यांना सायन रुग्णालयात पाठवले आहे. पण, मानसिकदृष्ट्या आजारी रूग्णांवर उपचार करुन घेण्याचे पर्याय शहरात कमी झाले आहेत.
प्राध्यापक प्रखर जैन यांच्या मते, ''रुग्ण, रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरस संबंधित ताण आणि चिंतेचे प्रमाण वाढले आहे. मानसिक आरोग्यामध्ये हा एक नवीन भार आला आहे. या सर्वांना साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी समुपदेशन आवश्यक आहे. सध्या जेजे हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर दोन्ही ओपीडीचे व्यवस्थापन करत आहेत कोविड -19 रूग्णांचे आणि आरोग्यसेवा कामगारांचे समुपदेशन करत आहेत.''
सायन रूग्णालयातील मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. निलेश शहा म्हणाले की, तीन महिन्यांत ओपीडीमध्ये मानसिक रूग्णांची संख्या 250 ते 300 वरून 150 पर्यंत खाली आली आहे. ही संख्या कमी होण्यामागची दोन प्रमुख कारणे आहेत. एकतर मानसिक रूग्ण आणि त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात यायला घाबरतात आणि दुसरे म्हणजे, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आम्हाला कर्मचार्यांची कमतरताही भासू लागली आहे. सायन रुग्णालयाप्रमाणेच सर्व रुग्णालयांमधील मानसोपचार विभाग सध्या कोविडशी संबंधित रुग्णांच्या समुपदेशनावर काम करत आहेत. शिवाय, मनोविकृत आणि स्किझोफ्रेनिक रुग्ण हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध नाही.
ठाण्याच्या मानसिक रुग्णालयात पहिल्या तीन महिन्यात (जानेवारी ते मार्च) ओपीडीमध्ये 13,174 मनोरुग्ण आणि 567 लोकांना दाखल करुन घेतले. एप्रिल ते जून या महिन्यातील ओपीडीत 6,150 रुग्ण आणि केवळ 61 रुग्णांना दाखल करुन घेतले गेले. रुग्ण दाखल करुन घेण्यामध्ये 90 टक्के घट झाली. सदर रुग्णालय कोव्हिड -19 केअरमध्ये समाविष्ट नाही, परंतु कोरोना संसर्गाची जोखीम असल्याने मोजक्याच रुग्णांना प्रवेश दिला जात आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसिक आजार हा जीवघेणा नसतो. आम्हाला काळजी आहे की जर रुग्णालयात दाखल होण्यास विलंब झाला तर सायकोसिस आणि स्किझोफ्रेनियाची प्रकरणे हाताळणे कठीण होईल. लॉकडाऊनदरम्यान, अनेक निराधार व्यक्तींना निवारा गृहात पाठवले आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी बरेच रुग्ण मानसिक रूग्ण होते. पण, निवारा घरात त्यांना हाताळण्यासाठी योग्य ती सुविधा नसते आणि रूग्णालयात संसर्गाच्या जोखमीच्या भीतीपोटी त्यांना दाखल करून घेणे शक्य नाही.
50 टक्के रुग्णांचे प्रमाण घटले
सायन रूग्णालयाच्या मानसोपचार विभागातील 24 निवासी डॉक्टरांपैकी 20 जणांची कोव्हिड -19 रुग्णांच्या समुपदेशनासाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटल, बीकेसी कोविड केअर सेंटर आणि सायन रुग्णालयात नेमणूक करण्यात आली आहे. मानसोपचार रूग्णांना मोठ्या प्रमाणात हाताळण्यासाठी फक्त चारच डॉक्टर आहेत. शिवाय, कोरोनाच्या भीतीपोटी रुग्णांच्या प्रमाणातही 50 टक्क्यांनी घट झाली आहे.
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.