Railway Latest Update: रेल्वे प्रशासनाची असंवेदनशीलता आणि नाकर्तेपणामुळे एका दिव्यांग कर्मचाऱ्याची ऑलिंपिकवारी हुकल्याची बाब समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर कार्यालयात कशाला येता, १० हजार रुपये द्या अन् घरबसल्या पगार घ्या, अशी ऑफर देत त्याची बोळवण करण्याचा प्रयत्न रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. यावरून रेल्वे प्रशासन दिव्यांग कर्मचाऱ्यांना किती असंवेदनशील वागणूक देते, हेदेखील उघड झाले आहे आहे.
मोहम्मद समसेगीर शेख असे या मराठमोळ्या खेळाडूचे नाव असून त्याचे कुटुंबीय मुंबईजवळील बदलापूर येथे वास्तव्यास आहे. १०० टक्के दृष्टिहीन असलेल्या मोहम्मदला लहानपणापासून मल्लखांबाची आवड होती. त्यातूनच तो राज्य, राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत चमकला. पुढे रेल्वे विभागात परीक्षा देऊन तो जानेवारी २०२४ मध्ये गुजरातच्या भावनगर विभागातील पारा येथे पश्चिम रेल्वेच्या रुग्णालयात 'हॉस्पिटल असिस्टंट' म्हणून रुजू झाला.
नोकरी लागल्यावरही त्याचा संघर्ष काही संपला नाही. पूर्णतः दृष्टिहीन असल्याने त्याला भाड्याने खोली मिळताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शेवटी एका मित्रासोबत त्याला खोली मिळाली; मात्र काही दिवसाने तो मित्रही सोडून गेल्याने घरमालकाने मोहम्मदला घराबाहेर काढले.
या विवंचनेत त्याचा मल्लखांबाचा सरावही सुटला. बदलापूरमध्ये वृद्ध आई-वडिलांची काळजी घ्यायला कुणीच नसल्याने आणि मल्लखांबचा सराव करता यावा, यासाठी मोहम्मदने मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयात बदली मिळावी, यासाठी दोन वेळा अर्ज केला; परंतु रेल्वे प्रशासनाने त्याच्या अर्जात चुकीचे पद टाकल्याने तो प्रलंबित राहिला. या दरम्यान, पॅरिस येथील ऑलिंपिक स्पर्धेत 'स्पेशल परफॉर्मन्स' म्हणून मोहम्मदला निमंत्रित करण्यात आले. पासपोर्ट आणि व्हिसा काढण्यासाठी रेल्वेच्या ना-हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) आवश्यकता होती.