वाशी : निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी, जलप्रदूषण (Water pollution) टाळण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव (Ganeshostav) साजर करण्याबाबत जनजागृती (Awareness) करण्यात येत आहे. भक्तांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्तींबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्तीची मागणी वाढत आहे. मात्र यंदा लक्ष वेधून घेत आहेत त्या ‘वृक्ष गणेशमूर्ती’.
लाल मातीपासून तयार करण्यात आलेल्या या मूर्ती कुंडीसह दिल्या जात आहेत. त्यामुळे उत्सवानंतर घरीच त्या कुंडीत विसर्जन करता येणार असून त्यापासून एक झाड तयार होणार आहे. १० सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून गतवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे गणेश मूर्तीच्या उंचीवर मर्यादा ठरविण्यात आली आहे. घरगुती मूर्ती २ फूट तर सार्वजनिक मंडळातील मूर्ती ४ फुटांची असेल.
गेल्या तीन-चार वर्षांपासून भक्तांचा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदीकडे कल वाढला आहे. त्यामुळे मूर्तिकारांनीही बाजारात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले असून यात शाडू, कागदी लगद्यापासून तसेच लाल मातीच्या वृक्ष गणेशमूर्तींचा समावेश आहे.
शाडू व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत या गणेशमूर्ती वजनाने हलक्या आहेत. वृक्षमूर्तीमध्ये लाल माती चाळून पाण्यात मिसळून तिला आकार दिला जातो. या मूर्ती काही विक्रेते कुंडीसहित त्यात बी टाकून देतात. मूतींचे त्या कुंडीत किंवा घरीच विसर्जन करता येणार असून त्यापासून एक झाड तयार होणार आहे. त्यामुळे त्या मूर्तींना वृक्षमूर्ती असे बोलले जाते. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
यंदा जवळपास ९८ टक्के पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्या आहेत. यामध्ये शाडूच्या मूर्ती ९० टक्के असून लाल माती आणि कागदी लगद्यापासून बनविलेल्या उर्वरित मूर्ती आहेत. फक्त दोन टक्के पीओपीच्या मूर्ती उपलब्ध आहेत.
- मयूरेश लोटलीकर, श्री मूर्ती केंद्र
कोरोनामुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची भक्तांकडून मागणी वाढली आहे. घरी विसर्जन करता येतील अशा मूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. शाडू व कागदापासून बनवलेल्या मूर्तींबरोबर यंदा लाल मातीच्या ‘वृक्ष गणपतीमूर्ती’ही आहेत. आम्ही या मूर्ती अधिक प्रमाणात ठेवल्या आहेत.
पंकज घोडेकर, विक्रेते, श्री सदगुरू कृपा आर्ट, वाशी
मूर्तींच्या दरांत १५ ते २० टक्के वाढ
रंग, शाडू मातीचे दर तसेच वाहतूक खर्च दुपटीने वाढला आहे. त्यामुळे यंदा मूर्तींच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. शाडूच्या मूर्ती तीन ते सहा हजार रुपये, कागदी मूर्ती अडीच ते पाच हजार रुपये तर लाल मातीच्या मूर्ती २५०० ते ३००० रुपयांना उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.