ऐतिहासिक क्षणापर्यंत आम्ही आपल्यासोबत! शिंदे, भुजबळ यांची सीमावर्तीयांना भावनिक साद

ऐतिहासिक क्षणापर्यंत आम्ही आपल्यासोबत! शिंदे, भुजबळ यांची सीमावर्तीयांना भावनिक साद
Updated on

मुंबई : सीमाभागातील सर्व जाती-धर्माचा मराठी बोलणारा माणूस महाराष्ट्र आपला मानतो, त्यामुळे सीमाभागातील दलित, बहुजनांचे आणि अल्पसंख्याकांचे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सहभागाचे आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्‍न आम्हाला अत्यंत महत्त्वाचे वाटतात. त्यासाठीची आवश्‍यक ती सर्व पावले उचलण्याची सरकारची भूमिका आहे. ज्या दिवशी हा भाग महाराष्ट्रात येईल, त्या दिवशी सीमाभागातील जनतेचेच नव्हे; तर महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचे स्वप्न पूर्ण होईल. तो ऐतिहासिक क्षण येईपर्यंत आम्ही आपल्यासोबत आहोत, अशी भावनिक साद सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी सीमाभागातील नागरिकांना पत्राद्वारे घातली आहे. 

भाषावार प्रांत रचनेमुळे बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग कर्नाटकमध्ये गेल्याने 1 नोव्हेंबर हा काळा दिवस पाळला जातो. त्या पार्श्‍वभूमीवर सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी सीमाभागातल्या जनतेसाठी पत्र लिहिले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेने महाराष्ट्र दणाणून सोडला. दुर्दैवाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवताना सीमाभाग मात्र आपण मिळवू शकलो नाही.

भाई दाजीबा देसाईंच्या संपूर्ण महाराष्ट्र समितीपासून ते आताच्या काळा दिन आणि हुतात्मा दिनाला आंदोलन करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांपर्यंत सहा दशकांहून अधिक काळ सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठीचा लढा चालू आहे. साराबंदी आंदोलन ते कन्नड सक्ती विरोधी आंदोलनापर्यंत आणि येळ्ळूरमधल्या ग्रामस्थांना झालेल्या अमानुष मारहाणीविरोधात उभ्या राहिलेल्या सनदशीर प्रतिकारापासून ते मराठी शाळा आणि मराठी संस्कृती यांच्या जतनासाठी उभ्या राहिलेल्या विधायक चळवळींपर्यंत, अनेक स्वरूपाची सामुदायिक ताकद सीमाभागाने पाहिली आहे. आम्हीही या सीमा लढ्यातले छोटे शिपाई आहोत. राज्यातील राजकीय, सामाजिक जीवनातील अनेकांनी सीमालढ्याची धग कायम राहावी, म्हणून प्रयत्न केले आहेत. असे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

कायदेशीर बाबींची पूर्तता सुरू 
सीमाभागातील लोकांचे बलिदान, त्याग आणि धाडस याचे खूप मोठे उपकारांचे ओझे महाराष्ट्राच्या मनावर आहे. शक्‍य त्या पद्धतीने त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचे आणि राज्याच्या राजकीय जीवनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही करत आहोत. सरकारने हा भाग राज्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. हा दावा यशस्वी व्हावा यासाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता युद्ध पातळीवर करत आहोत. पण फक्त तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. सीमाप्रश्‍न आणि सीमाभागातील लोकांच्या इतर प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणारा सीमाकक्ष नव्या जोमाने प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

We are with you till the historic moment Eknath Shinde Chhagan Bhujbals emotional appeal to the belgaon dharawad peaple
-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.