Ulhasnagar Latest News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी उडत असून हे वाद दिवसेंदिवस वाढत आहेत. विधानसभा निवडणुकीत कल्याण पूर्वेत शिंदे गटाने भाजप उमेदवार विरोधात शड्डू ठोकत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तर कल्याण पश्चिमेत भाजपचे नरेंद्र पवार यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यानंतर आता उल्हासनगर मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी "ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात, असं खळबळजनक विधान केलं आहे. यामुळे उल्हासनगर मधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
ठाणे जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीपासून येथील महायुती मधील भाजप आणि शिंदे गटात वाद होत असून हे वाद विकोपाला जात आहेत. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.