Eknath Shinde: बंडखोर आमदार मध्यरात्री आसामला रवाना; सत्तेचा सस्पेन्स कायम

विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून म्हणजे कालपासून एकनाथ शिंदेंशी कोणताही संपर्क झालेला नाही. शिंदेंसोबतच शिवसेनेचे १३ आमदारही संपर्कात नाहीत.
Uddhav Tahckeray
Uddhav TahckeraySakal
Updated on

या सर्व थरार नाट्यानंतर उद्या काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सर्व बंडखोर आमदारांना मध्यरात्री आसामला नेले जाणार असून यानंतर शिवसेना सत्ता टिकवणार की एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सत्तेचा सस्पेन्स वाढत असून सुरतेतील आमदारांना आसाममधील गुवाहटीला नेले जात आहे तर अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या तपासासाठी अकोल्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सुरतेत दाखल झाले आहेत. त्यांचा अजूनही देशमुखांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे आता सर्वांची धाकधूक वाढली असून गुजरात पोलिसही आम्हाला साथ देत नसल्याचं शिवसेना पदाधिकांऱ्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र क्राईम ब्रांचच्या दोन टीम सुरतेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हार्टअटॅक आलेले आमदार नितीन देशमुख यांना सकाळी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. पण देशमुख आता हॉस्पिटलमध्ये नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान अरविंद सावंत यांना देशमुखांनी फोन करून मला डांबून ठेवल्याचं सांगितलं आहे. या IPS अधिकाऱ्याला समजावून सांगा असं नितीन देशमुखांनी अरविंद सावंत यांना सांगितल्याचं समोर आलं आहे.

बंडखोर आमदारांना आज रात्री सुरत येथून हलवण्यात येणार असून त्यांना आसाममधील गुवाहटी येथे नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. स्पाईजेटचं विमान सुरतच्या विमानतळावर दाखल झालं आहे. दरम्यान आमदारांना हॉटेलवरून विमानतळाकडे नेण्यात येत आहे. रात्री १२ च्या दरम्यान आमदारांना विमानात बसवलं जाणार आहे.

बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्यात येणार असून त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवावी लागेल असा इशारा शिवसेनेच्या संजय राऊत यांनी दिला आहे. तर एकनाथ शिंदेंनी प्रेमाने परत यावं असंही ते म्हणाले.

  • नितीन देशमुख मारहाण प्रकरणं समोरं आल्या नंतर आणखी दोन शिवसेनेच्या आमदारांच्या कुटुंबीयांकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

  • आमदारांच्या कुटुंबियांकडून स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

  • फुटून गेलेल्या आमदारांपैकी 5 आमदारांना जबर मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर गृह खात्याकडून या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे

महाराष्ट्र कॅबिनेटची बैठक उद्या दुपारी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आम्ही शिवसेनेसोबत असणार आहोत असं स्पष्टीकरण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलं आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. आम्ही शिवसेनेसोबत राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

उद्धव ठाकरे : राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आपल्या सोबतच राहणार आहेत. तर एकनाथ शिंदे लवकरच आपल्यात असतील असं ते म्हणाले

नार्वेकरांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी दोन प्रस्ताव मांडले होते. भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा सल्ला शिंदेंनी दिला आहे. त्यामुळे शिवसेना आता संकटात सापडली आहे. त्यानंतर आता शिवसेना काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. तर सर्व पक्षांच्या बैठकांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीनंतर 'सिल्वर ओक'वर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. त्यामध्ये अजित पवार, शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे हजर आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथे दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रातल्या बंडाची मोदींकडून दखल; दिल्लीत घडामोडींना वेग

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली भाजप मुख्यालयात थोड्याच वेळात पोहोचत आहेत. त्याआधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुख्यालयात पोहोचले आहेत. राष्ट्रपती निवडणूक आणि महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

नार्वेकरांच्या रणनीतीकडे लक्ष

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर नाराज एकनाथ शिंदेंची मनधरणी करायला सूरतला गेले होते. शिंदे आणि नार्वेकर यांचे जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे आता शिंदेंची घरवापसी आणि बंडामुळे जाऊ शकणारं मुख्यमंत्रीपद वाचवण्याची जबाबदारी नार्वेकरांच्या खांद्यावरच आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान एकनाथ शिंदेंना थेट निरोप देण्यात आला आहे. आपण चर्चेसाठी तयार आहोत, पण अटीतटींचं राजकारण मान्य नाही, असा इशाराच शिवसेनेने शिंदेंना दिला आहे.

"आमच्या आमदारांचं अपहरण करण्यात आलं असून त्यांना बळजबरी कोंडून ठेवलं आहे. जवळपास नऊ आमदारांचा मुंखमंत्र्यांना फोन आला असून आम्हाला बाहेर काढण्यासाठी त्याच्याकडून मागणी करण्यात आली आहे. तर काही आमदार महाराष्ट्रात पळून येत असताना त्यांनी गुजरात पोलिसांनी मारलं आहे. त्यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे." असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Uddhav Tahckeray
"शिवसेना आमदार पळून मुंबईला येत होते पण गुजरात पोलिसांनी मारलं"; राऊतांचा आरोप

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि अजित पवार वर्षावर पोहचलेले आहेत. काही वेळातच बैठकीला सुरुवात होणार असून एकनाथ शिंदेंच्या बंडावर चर्चा होणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हेही आता गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. हे भाजपा नेते आता एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे.

"पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशीची पूजा फडणवीस करतील"

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. तसंच त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकारही धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्यात लवकरच भाजपाची सत्ता येईल आणि येत्या आषाढीची पंढरपुरातली विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस करतील, असं भाकित साताऱ्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनी केलं आहे.

"मला शिंदेंचा नाईलाज माहित आहे" - संजय राऊत

नार्वेकर आणि फाटक शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले असतानाच संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना खळबळजनक खुलासे केले आहेत. मला एकनाथ शिंदेंचा नाईलाज माहित आहे. मी त्यांच्याशी बोलायचो. आमच्यावरही ईडीने दबाव आणला. पण म्हणून आम्ही पक्ष सोडला नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. तसंच शिवसेनेच्या आमदारांंचं अपहरण करुन त्यांना मारहाण करण्यात आली. त्यातच नितीन देशमुखांना हृदयविकाराचा झटका आला, असंही संजय राऊतांनी सांगितलं.

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, रवी फाटक हे एकनाथ शिंदे थांबलेल्या सूरतमधल्या ली मेरिडियन हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. काही वेळातच ते एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार आहेत.

भागवत कराड गुजरात प्रदेशाध्यक्ष सी आर पाटलांच्या भेटीला

केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड आता गुजरातचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे आता पुढच्या हालचाली काय घडणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, मिलिंद नार्वेकर आणि रवी फाटक हे शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी जाणार आहेत.

सेनाभवनाबाहेर बंदोबस्त वाढला. मोठ्या संख्येने शिवसैनिक सेना भवनाबाहेर जमायला सुरूवात झाली आहे. शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचेही ५ आमदार Not Reachable

काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील हे मुंबईत दाखल होण्यापूर्वीच काँग्रेसची चिंता वाढली आहे. शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचेही ५ आमदार Not reachable आहेत.

दरम्यान, काँग्रेसकडून एच के पाटील, कमलनाथ मुंबईत पोहोचणार आहेत. तर अशोक गेहलोतही राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेस आमदारांचा दिल्ली दौरा रद्द करण्यात आल्या असून सर्वांना सायंकाळी ७ पर्यंत मुंबईत पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादीकडून शरद पवार मैदानात उतरले आहेत.

भाजपा नेते संजय कुटेंसोबत शिंदेंची बैठक सुरू; कोणता ट्विस्ट येणार?

सूरतमधल्या हॉटेलमध्ये सध्या असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपाचे आमदार संजय कुटे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.

राज्यातल्या गोंधळानंतर काँग्रेस हायकमांड सक्रीय

काँग्रेसकडून महाराष्ट्रातल्या ताज्या राजकीय स्थितीवर निरीक्षक म्हणून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Congress
CongressSakal

बंडानंतर एकनाथ शिंदेंचं पहिलं ट्वीट

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.

एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवलं. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना आता एकनाथ शिंदेंवर दबाव टाकताना दिसत आहे.

Shivsena letter to Ajay Chaudhary
Shivsena letter to Ajay ChaudharySakal

शिंदे ठाम! नार्वेकर, फाटक मन वळवण्यात यशस्वी होणार?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि रवी फाटक हे दोघेही गेले आहेत. शिंदे आणि नार्वेकर यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे आता नार्वेकर शिंदेंचं मन वळवू शकणार का याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत आहेत.

शिवसेनेच्या साताऱ्यातल्या कार्यालयाला टाळं; पदाधिकारी गायब

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सोमवारी सायंकाळपासून संपर्कात नाहीयत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 17 आमदार देखील असल्याची माहिती आहे. या शिवाय, साताऱ्यातील शिवसेना कार्यालयाला कुलूप लागल्याचं कळत असून जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख 5 नेते पदाधिकाऱ्यांसह गायब असल्याचं समजतंय. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसेना शहर प्रमुख नीलेश मोरे, उप शहर प्रमुख गणेश अहिवळे हे देखील नॉट रिचेबल असून आज सकाळपासून शिवसेना शहर कार्यालयाला कुलूप लावल्याचं कळतंय.

सेनेच्या अंतर्गत बैठकीला आव्हाडांची हजेरी

शिवसेनेची अंतर्गत बैठक उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावर सध्या सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर शिवसेनेच्या सर्व नेत्यांची बैठक सध्या सुरू आहेत. मात्र आता या बैठकीत जितेंद्र आव्हाडांनी हजेरी लावली आहे. सेनेच्या अंतर्गत बैठकीत आव्हाड आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सेनेचे शिलेदार सूरतकडे रवाना; शिंदेंचे ठाकरेंना तीन प्रस्ताव

एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे काही नेते मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन सूरतकडे रवाना झाले आहेत. हे नेते उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याचं समोर येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसमोर तीन प्रस्ताव ठेवले आहेत. भाजपसोबत सरकार स्थापन करा, फडणवीसांना मुख्यमंत्री करा, उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना द्या, असा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे.

काँग्रेसने विश्वजित कदम यांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी पाठवलं आहे. राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या प्रकरणात आपल्याला काही माहित नाही. काही विकासकामांबद्दल अजितदादांशी चर्चा करायची होती, अशी प्रतिक्रिया विश्वजित कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

एकनाथ शिंदेंमुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघत असताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. तर अमित शाह हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीला निघाले आहेत. या तिघांमध्ये आता भेट होण्याची शक्यता आहे.

शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. - नारायण राणे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व काही आमदार नॉट रिचेबल असल्याने राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Eknath Shinde
Eknath ShindeSakal

संपर्क होऊ न शकलेले शिवसेनेचे आमदार -

1. शहाजी बापू पाटील

2. महेश शिंदे

3. भरत गोगावले

4. महेंद्र दळवी

5. महेश थोरवे

6. विश्वनाथ भोईर

7. संजय राठोड

8. संदीपान भुमरे

9. उदयसिंह राजपूत

10. संजय शिरसाठ

11. रमेश बोरणारे

12. प्रदीप जैस्वाल

13. अब्दुल सत्तार

14. तानाजी सावंत

15. सुहास कांदे

16. दादा भुसे

राज्यातल्या राजकीय गोंधळाबद्दल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची फोनवरून शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. या प्रकरणी दुपारी राष्ट्रवादी नेते भेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर,वर्षा गायकवाड, नितीन राऊत, सतेज पाटील,सुनील केदार,विश्वजित कदम बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर पोहोचले आहेत. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

देवेंद्र सूर्याचा महाराष्ट्रात उदय होईल - सदाभाऊ

महाविकास आघाडीची एकजूट किती आहे हे संध्याकाळी समजेल - संजय राऊत

महाराष्ट्रातील जनता विचारत आहे सत्तापालट कधी? संध्याकाळ गेली.. सत्तेची काळी रात्र पण लवकरच सरेल. आणि देवेंद्र सूर्याचा महाराष्ट्रात उदय होईल, असं ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.

फडणवीसांच्या दिल्लीवारीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या!

राज्यात मोठी खळबळ सुरू असतानाच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले आहेत. शिवसेनेचे १३ हून अधिक आमदार आणि नेते नाराज असून ते एकनाथ शिंदेंसह गुजरातमध्ये असल्याची माहिती हाती येत आहे. या सगळ्या गोंधळादरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या तातडीच्या दिल्लीवारीमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा गोंधळ सुरू झाला आहे.

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक आमदार संपर्कात नाहीत. ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता शिवसेनेचे तीन मंत्रीसुद्धा नॉट रिचेबल आहे. शंभुराजे देसाई, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे यांच्याशीही कोणताही संपर्क होत नाहीये.

शिवसेना खासदारांना मुंबईत तातडीने दाखल होण्याचे आदेश देण्यात आल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात कोण कोण आहे याची माहिती ठाकरे सरकारकडून घेतली जात आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिल्लीला जाणार होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी ते हजेरी लावणार होते. मात्र एकनाथ शिंदेंबद्दलच्या घडामोडी सुरू झाल्यानंतर राऊतांनी तात्काळ आपला दौरा रद्द केला आहे. तर छगन भुजबळही नाशिकमधल्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार होते. मात्र त्यांनीही आता आपले दौरे रद्द केले आहेत.

  • बुलडाण्यातील दोन आमदारांचा फोन नॉट रिचेबल

  • आमदार संजय गायकवाडांच्या डीपीमध्ये एकनाथ शिंदेंचा फोटो

पण अपक्ष आमदारांसारखेच शिंदे समर्थक आमदारांमध्ये नेतृत्वाबाबत प्रचंड नाराजी आहे. गेली अडीच वर्ष आम्हाला फारशी किंमत दिली जात नव्हती. आता मात्र आम्हाला नव-नवे आदेश देऊन, आमच्यावर अविश्वास दाखवला जात आहे, अशी भावना शिंदे समर्थक आमदारांनी खासगीत मांडली आहे.

नगरविकास मंत्री शिदे यांना मानणारा मोठा गट शिवसेनेत आहे. त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढत आहेत. पक्षातील नव्या नेतृत्वाच्या 'स्टाईलवर' आक्षेप घेऊन ही वादाची ठिणगी पडली आहे. या ठिणगीचा वणवा आता मातोश्री ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पेटण्याची शक्यता आहे. शिंदे समर्थकांनी आपला रोख युवासेनेचे नेते, पर्यटन मंत्री यांच्या दिशेने ठेवल्याचे मानले जात आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे. (MLC Election 2022)

याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसतंय. शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहतात की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय. (Shivsena in MLC Election 2022)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.