Eknath Shinde : महाराष्ट्र राज्य नेहमी देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून काम करत आहे. उद्योगजगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आपण नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान युवा पिढीला देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील प्रत्येक आयटीआयमध्ये अभ्यासिका सुरू होत असून, त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक अनिल गावित यांसह ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रोजच्या प्रशिक्षण वेळेनंतर सायंकाळी साडेआठपर्यंत अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह व इतर सुविधा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
...त्यांनाही मिळणार लाभ
अभ्यासिकेत आयटीआयमधील विद्यार्थ्यांसोबत त्या-त्या शहर आणि भागातील जे विद्यार्थी यूपीएससी आणि एमपीएससी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील, तसेच जे विद्यार्थी दहावी-बारावीच्या आणि इतर अभ्यासक्रमाची तयारी करत असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत जाऊन त्याचा लाभ घेता येणार आहे. तसेच मुलींना यात स्वतंत्र वर्गखोल्या उपलब्ध केल्या जाणार आहेत.
‘स्वयंसेवक ते जनसेवक’चे प्रकाशन
मागील एक वर्षाच्या कालावधीमध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकास विभाग, महिला बाल विकास विभाग, पर्यटन विभाग आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचा आढावा ‘स्वयंसेवक ते जनसेवक’ या पुस्तिकेतून घेण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशनही आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.