नवी मुंबईकर "पचवतात' सहा लाखांच्या चपात्या 

नवी मुंबईकर "पचवतात' सहा लाखांच्या चपात्या 
Updated on

नवी मुंबई - चपात्या करणे, हे महिलांसाठी काहीसे वेळखाऊ, जिकिरी व कष्टाचे काम. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत आवश्‍यकतेनुसार चपात्या बाहेरून म्हणजेच पोळी-भाजी केंद्र व हॉटेलमधून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. हा पसारा इतका मोठा आहे की, एका पोळी-भाजी केंद्रावर दिवसाला सरासरी 500 चपात्यांची विक्री होते. तर, नवी मुंबईत रोज दोन लाखांहून अधिक चपात्यांची विक्री होते. प्रत्येक चपातीचा घाऊक विक्री दर तीन रुपये लक्षात घेतल्यास रोज नवी मुंबईकरांना सहा लाखांच्या लागतात, असे म्हणता येईल. 

चपाती बनवण्याचे काम मुळात वेळखाऊ आहे. त्यामुळे रात्री ऑफिसमधून थकूनभागून घरी परतल्यावर महिलांना अनेकदा चपाती बनवणे त्रासदायक वाटते. पण, तो जेवणातला महत्त्वाचा घटक असल्याने टाळणेही शक्‍य होत नाही. अशा वेळी जवळचे पोळी-भाजी केंद्र वा हॉटेल महिलांसाठी "आधार' ठरतात. अनेकांकडे तर खास सकाळच्या वेळी चपात्या बनवण्यासाठी "मावशी' येते. एकूणच चपात्यांचे असे "आऊटसोर्सिंग' घरबसल्या लघुउद्योग करणाऱ्या महिलांच्याही पथ्यावर पडले आहे. 

याबाबत "पूर्णब्रह्म'च्या संध्या सोनावणे सांगतात, आमच्याकडे दिवसाला 10 हजार चपात्यांची ऑर्डर असते. या चपात्या नेरूळ, सीवूडस, खारघर येथील पोळी-भाजी केंद्रे, तसेच मागणीनुसार छोट्या-मोठ्या हॉटेल्सनाही पुरवल्या जातात. 

संध्या सोनावणे 15 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. त्यांचे कुटुंब त्यांना या कामात मदत करते. त्यांचे दीर, नणंद यांच्याकडेही प्रत्येकी रोज सात हजार चपात्यांची मागणी असते. ऐरोलीतील एक महिलांचा गट दिवसाला तब्बल 40 हजार चपात्या बनवतो. या गटाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, या चपात्या नवी मुंबईतल्या हॉटेल, कॅंटीनला पाठवल्या जातात. 

या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असल्याने नवी मुंबईतील लघुउद्योजकांना भीती आहे ती, मशीनने बनवल्या जाणाऱ्या चपात्यांची. त्यामुळे अनेक जण हा व्यवसाय कसा चालतो, याबद्दल माहिती देण्यासही नकार देतात. एका गटामध्ये जवळपास 10 ते 15 महिला दोन पाळ्यांमध्ये काम करतात. चपात्या बनवताना स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. 

या व्यवसायात 10 हून अधिक वर्षे असलेल्या प्रमिला सहानी सांगतात की , माझ्याकडे 10 महिला कामाला आहेत. रोज जवळपास तीन हजार चपात्या बनवल्या जातात. त्यातील काही कॅटरिंग सर्व्हिस देणाऱ्यांना दिल्या जातात; तर काही पोळी-भाजी विक्रेत्यांना. 

नेरूळ येथील ओम अन्नपूर्णा पोळी भाजी केंद्राचे गणपत बांगर यांनी सांगितले की, पोळी, भाजी, डाळ, भात व इतर पदार्थ आम्ही बनवतो; पण त्यातही चपात्यांना अधिक मागणी असते. दिवसाला 600 चपात्यांची विक्री होते. "किनेकर सर्व्हिसेस' आणि "दिव्य चपाती सप्लायर'चे सौरभ मोरे यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. रोज प्रत्येक पोळी-भाजी केंद्रावर सरासरी 500 चपात्या हमखास विकल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

चपत्यांचे गणित 
एका विभागात साधारण 15 पोळी-भाजी केंद्रे आणि प्रत्येक केंद्रावर सरासरी 500 चपात्यांची विक्री होते. नवी मुंबईतील सर्व विभागांचा विचार केल्यास 15 केंद्रे आणि सरासरी 500 चपात्या गृहीत धरल्यास रोज जवळपास सरासरी 90 हजार चपात्या विकल्या जातात. त्याशिवाय मोठ्या बचत गटांमार्फत हॉटेल, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, कॅंटीन यांना पुरवल्या जाणाऱ्या चपात्यांचा सरासरी 30 हजारांचा आकडा लक्षात घेता, चपात्यांचा दैनंदिन पसारा दोन लाखांवर पोहचत असल्याचे सांगण्यात आले. 

दररोज तयार होणाऱ्या चपात्या : 2 लाख. 
चपत्यांसाठी लागणारे पीठ : 4 हजार किलो. 
लहान चपातीचे वजन : 30 ग्रॅम. 
मोठ्या चपातीचे वजन : 52 ग्रॅम. 

चपात्यांचे विक्री दर (प्रति नग) 
घाऊक दर ः 3 रुपये. 
किरकोळ दर ः 5 ते 6 रुपये. 
हॉटेल दर ः 10 रुपये वा त्यापेक्षा जास्त. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.