मुंबई : सन १७०० ते १८००च्या काळात मुंबईची भौगोलिक स्थिती आणि क्षेत्राचा विकास सांगणाऱ्या ब्रिटिशकालीन दुर्मिळ नकाशांचे प्रदर्शन मुंबईतील एशियाटिक वाचनालयाच्या दरबार हॉलमध्ये सुरु आहे. मुंबईच्या ताडदेव, गिरगाव चौपाटी, कामाठीपुरा अशा विविध भागांचे ब्रिटिशकालीन नकाशांचा दुर्मिळ ठेवा या प्रदर्शनात मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे.
द एशियाटिक सोसायटी मुंबई, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टाटा प्रायोजित एशियाटिक वाचनालय येथे 'मॅप: सर्व्हे दॅट लेफ्ट बिहाईन्ड ए लेगसी' हे १७०० ते १८०० याकाळातील ब्रिटिशांनी भारतात केलेल्या सर्व्हेक्षणावर आधारित नकाशांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
मुंबईच्या एशियाटिक सोसायटीकडे १६०० हून अधिक दुर्मिळ नकाशांचा समृद्ध संग्रह आहे. २०१९ पासून, रोटरी क्लब ऑफ बॉम्बेची अर्बन हेरिटेज कमिटी यापैकी जवळपास शंभर नकाशे जतन करण्यासाठी आपले योगदान देते आहे. या पुनर्संचयनाच्या प्रक्रियेमुळे हे नकाशे लोकांना पाहण्यासाठी खुले कऱण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्व्हे ऑफ इंडियाने भारतातील विभिन्न प्रदेशांचे बारकाईने केलेल्या नोंदींचे अभूतपूर्व दर्शन घडविते आहे. हे प्रदर्शन ७ मे ते ४ जून याकाळात सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहा यावेळेत आयोजित करण्यात आले आहे.
रविवारी (ता.७) रोजी पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. 'पास्ट परफेक्ट हेरिटेज मॅनेजमेंट' ही संस्था या प्रदर्शनात संशोधक आणि स्वयंसेवक म्हणून भूमिका बजावत आहेत. या संस्थेच्या सह संस्थापिका दीप्ती आनंद म्हणाल्या,
हे नकाशे एक दुर्मिळ ठेवा असून आगामी काळात आम्ही लहान मुलं आणि मुंबईकरांसाठी एक छोटा अभ्यास दौरा आयोजित करणार आहोत. यातून या नकाशातील मुंबई आणि आज २१व्या शतकातील मुंबई हा बदल अनुभवता येईल. अधिकाधिक मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही दीप्ती आनंद यांनी केले.
सर्वेक्षण करणारे हेर
या सर्वेक्षणांमध्ये भारतीय उपखंडाचे आतापर्यंतचे काही पहिले गणले जाणारे अचूक नकाशे दाखवले आहेत. सुरुवातील गुप्तपणे करण्यात आलेले हे सर्व्हे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील क्षेत्र समजावून घेण्याचा प्राथमिक पर्याय होता. ज्याद्वारे त्यांनी हळूहळू आपल्या क्षेत्रांवर नियंत्रण मिळविले.
त्रिकोणमितीय, स्थलाकृतिक आणि सागरी सर्वेक्षण पद्धती वापरून हे नकाशे बनविण्यात आले. त्यापूर्वी अखंड भारताचा एकही अचूक नकाशा पाहण्यात आला नव्हता. या नकाशांचे महत्व ओळखून ईस्ट इंडिया कंपनीने सर्व्हेक्षणासाठी स्थानिकांनी प्रशिक्षण दिले तर काही इंग्रजांनी त्याकाळी पंडितांच्या वेशात गावगांवमध्ये जाऊन सर्वेक्षणाची कामेदेखील केली.
अनेकदा सर्वेक्षण करणाऱ्या हेर आणि स्थानिकांना अज्ञातवासात किंवा विशेष मोहिमेसाठी पाठविले जात तेव्हा त्यांच्या मानसिक स्वास्थ्याच्या गंभीर परिणामांची नोंद घेणारे दस्तही उपलब्ध आहेत.
महसुली सर्व्हेक्षणातून जुन्या मुंबईचे दर्शन
या प्रदर्शनात कर्नल जी.ए. लॉफ्टनमार्फत करण्यात आलेल्या दुसऱ्या मुंबई महसुली सर्व्हेक्षणातील १० नकाशे देखील येथे प्रदर्शित केले आहेत. १८६८-६९-७०मध्ये झालेल्या या सर्वेक्षणातुन त्याकाळच्या मुंबईचे दर्शन घडते.
यामध्ये मुंबईच्या रेल्वे लाईन, मुंबईतील गिरण्या सुरु होण्याआधीची मुंबई, येथील पाण्याच्या टाक्या आणि इतर सरकारी कार्यालयांच्या नोंदी आहेत. मात्र यामध्ये शासकीय जमिनीचे तपशील बारकाईने असून खासगी जमिनींबाबतच्या नोंदीमध्ये अनेक अडथळे आल्याने त्या नोंदी आढळून येत नाहीत.
गिरगाव चौपाटी, ताडदेव, कामाठीपुरा, माझगाव अशा मुंबईतील भागांचे नकाशे याठिकाणी आहेत. हे नकाशे बनविण्यासाठी एशियाटिकच्या पायऱ्यांवर एक निशाणी बनविण्यात आली होती. समुद्रसपाटीपासून ती उंची हे प्रमाण वापरून हे नकाशे बनविण्यात आले आहेत. ती निशाणी आजही या पायऱ्यांवर आढळत असल्याचे इतिहास तज्ज्ञ सांगतात.
मॅप ऑफ हिंदुस्थान
ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या सामर्थ्याला चालना देण्याच्या उद्देशाने १७५७ मध्ये जेम्स रेनेल हा तरुण सर्वेक्षणकर्ता भारताचा अचूक नकाशा तयार करू शकला. प्रामुख्याने सुरुवातीला अंतर, कोस मोजण्याच्या स्थानिक एककाचे मानक ठरवून हे पॅरिस किंवा ग्रीनवीचला नेण्याऐवजी कलकत्ता येथे रेखांश आणि मापन करण्याचे त्याने ठरविले.
सुरुवातीला बंगाल आणि नंतर भारताचे सर्व्हेयर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. रेनेलचे नकाशे त्यांच्या उपयुक्ततावादी हेतूच्या पलीकडे गेल्याने या नकाशांमुळे उपखंडातील मालमत्तेची नोंद झाल्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला बळकटी मिळाली, असल्याचेही इथल्या नोंदी सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.