नवीन पनवेल : करंजाडे येथे रेल्वे रुळाच्या खालून भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्याकरिता नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदार बिनदिक्कतपणे रेल्वे रुळाच्या बाजूला सुरुंग लावत आहे. याचा नाहक त्रास सोसायट्यांना सहन करावा लागत असून परिसरात आदिवासी वाडी असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पनवेल-जासई रेल्वे मार्गावर माल वाहतूक केली जाते. जवळच महाविद्यालय असल्याने विद्यार्थी येथून ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर होणारे स्फोट धोकादायक ठरत आहेत. हे काम पवार एंटरप्रायझेस या कंपनीला दिले असून गेल्या सहा महिन्यांपासून येथे माती काढण्याचे काम सुरू आहे; मात्र याबाबत रेल्वे प्रशासनाला कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे.
या कामाबाबत तत्कालिन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी स्फोट करण्याबाबतचा परवाना कंपनीला दिला होता; मात्र याबाबत रेल्वे प्रशासन अंधारात असून अधिकाऱ्यांना याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे सचिन केणी यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या भागात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्फोटांबाबत स्थानिक पोलिसांनी पडताळणी करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे त्या पोलिस ठाण्याकडून विशेष शाखेला अहवाल दिला जातो. त्यानंतरच स्फोटासाठी परवाना दिला जातो.
करंजाडे येथील भुयारी मार्गाकरिता परवानगी दिली त्या वेळी पनवेल शहर पोलिसांनी बाजूला असलेला रेल्वे रुळ, आदिवासी वाडी आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बी कडे दुर्लक्ष केले, अशी प्रतिक्रिया जयवंत परदेशी या स्थानिक नागरिकाने दिली. स्फोटामुळे इमारतीला हादरे बसतात. त्यामुळे स्फोट असेच सुरू राहिल्यास इमारतीला तडे जाऊ शकतात. तसेच रेल्वे रुळालासुद्धा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठेकेदाराला परवानगी नाही
हे काम रेल्वेचे आहे. प्रशासनाने निविदा पद्धतीने ठेकेदार नेमला आहे. निविदा आणि करारनाम्यात स्फोटाचा उल्लेख नाही. खोदकाम हे ब्रेकरनेच होणे अपेक्षित आहे. तरीसुद्धा रेल्वेला अंधारात ठेवून ठेकेदार या ठिकाणी स्फोट करीत आहेत. ब्रेकरचे काम वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने स्फोटाचा वापर ठेकादार करीत आहे. त्यामुळे रेल्वेने ठरवून दिलेल्या नियमात काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हे काम सरकारी असल्याने गरज पाहून त्याला परवानगी दिली असावी. तरीसुद्धा प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे याची माहिती घेतली जाईल. जर रेल्वे प्रशासनाने सुरुंगाची परवानगी दिली नसेल आणि तो करारनामा मिळाला, तर हे काम
थांबवले जाईल.
- अजयकुमार लांडगे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल
रेल्वे रुळाच्या बाजूला सुरुंग लावण्याची परवानगी दिलेली नाही. ती पोलिसांनी दिली असेल तर लोहमार्ग किती दूर आहे याची पडताळणी केली जाईल. त्यानुसार त्या ठेकेदाराला सूचनाही दिल्या आहेत.
- सुरेंद्र द्विवेदी, विभागीय अभियंता, रेल्वे अभियांत्रिकी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.