'निसर्ग'ग्रस्त मच्छीमार, मूर्तिकारांची उपेक्षा, तीन महिन्यानंतरही भरपाई नाही!

'निसर्ग'ग्रस्त मच्छीमार, मूर्तिकारांची उपेक्षा, तीन महिन्यानंतरही भरपाई नाही!
'निसर्ग'ग्रस्त मच्छीमार, मूर्तिकारांची उपेक्षा, तीन महिन्यानंतरही भरपाई नाही!
Updated on

अलिबाग : चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील मच्छीमार व मूर्तिकारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तीन महिने होऊनही त्यांना अद्याप सरकारकडून मदत मिळाली नसल्याने ते भरपाईपासून उपेक्षितच राहिले आहेत. त्यामुळे सरकार भरपाई कधी देणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 

लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील मच्छीमार व मूर्तिकारांना आर्थिक फटका बसला. मासेमारीबरोबरच मूर्तिकार आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल झाले. त्यात 3 जून रोजी जिल्ह्यात आलेल्या चक्रीवादळात मच्छीमारांच्या बोटी, जाळ्यांचे नुकसान झाले. सुमारे चार कोटी रुपयांची हानी यात झाली आहे. याशिवाय, वादळी पावसात अनेक मूर्तीही भिजल्या. तर काही ठिकाणी मूर्ती व पत्रे तुटले. ही घटना घडून तीन महिने उलटून गेले; परंतु अद्याप सरकारकडून भरपाई मिळाली नाही. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊनही सरकार मच्छीमार व मूर्तिकारांना भरपाई देण्याबाबत दुर्लक्ष करत आहे. 

भरपाई तातडीने मिळावी म्हणून रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना नुकसानग्रस्तांनी निवेदन दिले. तरी सुद्धा मच्छीमार व मूर्तिकारांना आश्वासनाशिवाय अद्याप काहीच मिळाले नाही, अशी खंत नुकसानग्रस्तांनी व्यक्त केली.

चक्रीवादळात मच्छीमारांसह 25 हजार जणांचे नुकसान झाले. सुमारे 4 कोटी रुपयांची वित्तहानी झाली; मात्र सरकारकडून अजून भरपाई मिळाली नाही.
- शेषनाथ कोळी, अध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ

पंचनामे करून निसर्गग्रस्तांना भरपाई दिली आहे. मच्छीमार व मूर्तिकारांना भरपाई मिळावी म्हणून सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठवला आहे. त्यामध्ये मच्छीमारांसाठी निधी प्राप्त झाला असून तहसील कार्यालयाद्वारे त्यांना भरपाई देण्याचे काम सुरू आहे. मूर्तिकारांसाठी मात्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला नाही. निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने त्यांना भरपाई दिली जाईल.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.