उल्हासनगर : लोकलमधून प्रवासी पडण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. उल्हासनगर स्थानकात मंगळवारी व बुधवारी दोन प्रवासी पडल्याच्या घटना घडल्या आहेत; तर विठ्ठलवाडी स्थानकात मंगळवारी रात्री लोकलमधून तरुणी पडल्याची घटना घडली आहे.
मंगळवारी रात्री उल्हासनगरातील दहा चाळमध्ये राहणारा दिनेश गायकवाड हा तरुण अंबरनाथ लोकलमधून येत असताना, छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलाजवळ दारातून पडला. त्याला प्रथम शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर आज मुंबईच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे; तर बुधवारी (ता. १८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास डिसिल्वा सिमोन डॉमनिक (रा. मराठा सेक्शन) हा तरुण लोकलमधून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे; तर रात्री पावणेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकाजवळ एक तरुणी अंबरनाथ लोकलमधून पडली. तरुणीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
ही तरुणी बेशुद्धावस्थेत असल्याने तरुणीची ओळख पटलेली नाही. दरम्यान विठ्ठलवाडी येथे लोकलमधून तरुणी पडल्यानंतर दिनेश धुमाळ व विशाल रोकडे यांनी तरुणीला उचलण्याठी स्ट्रेचर हवे म्हणून विठ्ठलवाडी स्टेशनवर धाव घेतली; मात्र रेल्वे अधिकारी, पोलिस कोणीच उपलब्ध नव्हते; तसेच रुग्णवाहिका अथवा व्हीलचेअरदेखील तरुणांना उपलब्ध झाली नाही. त्यामुळे ते तरुण पुन्हा जखमी तरुणीकडे धावले. तेव्हा दुसऱ्या लोकलमधून जाणाऱ्या एका महिलेने स्वतःच्या अंगावरील ओढणी त्या जखमी मुलीच्या दिशेने फेकली.
शिवसेना आली मदतीला
शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना ही घटना समजताच त्यांनी शिवसैनिक संतोष चौधरी, अंबादास पवळ, प्रशांत धिवर, शरद उज्जैनकर, विकास अवसरमोल, धीरज जवरास, किरण जवरास आणि रिक्षा स्टॅंडप्रमुख सुनील उज्जैनकर यांना पाठवले. त्यानंतर ओढणीमध्ये उचलून त्या तरुणीला स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तत्काळ कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.