महाविकास आघाडीच्या आमदारांना संबोधित करतानाचं शरद पवार यांचं संपूर्ण भाषण

महाविकास आघाडीच्या आमदारांना संबोधित करतानाचं शरद पवार यांचं संपूर्ण भाषण

Published on

याठिकाणी उपस्थित असलेले कॉंग्रेस पक्ष, शिवसेना,  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वाभिमानी शेतकरी, समाजवादी पार्टी आणि अन्य मित्र पक्ष या सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राच्या जनतेचा पाठींबा घेऊन मोठ्या मतांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित झालेले आपण सगळे बंधू भगिनी. पहिल्यांदाच तुमच्या या निवडणुकीच्या यशाच्या संदर्भात तुमचं मी अभिनंदन करतो. उद्याच्या पाच वर्षासाठी महाराष्ट्रातील हिताची जपणूक करण्याकरता संकल्प आपण सर्वांनी केला, माझी खात्री आहे की तो सिद्धीला नेण्यासाठी, आज या राज्यामध्ये ज्याची आवश्यकता होती त्या पुरेशा संख्येने पाठींबा देणाऱ्या सगळ्या पक्षांनीसुद्धा तुम्हाला अनुकूल अशी भूमिका घेतली. 

निवडणूक झाली, तातडीने राज्य उभं करायची जबाबदारी आपल्याकडे आली. आपण बघितलं की बहुमत नसताना महाराष्ट्रात एक सरकार याठिकाणी सत्तेत आलंय.  आज केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी देशतील काही राज्यांमध्ये बहुमत नसताना देखील सरकार स्थापित केलंय. कर्नाटकात त्यांचं बहुमत नव्हतं तरीही त्याठिकाणी सत्ता स्थापन केली. गोव्यात त्यांचं बहुमत नव्हतं तरीही त्याठीणी सत्ता स्थापन केली. मणिपुरमध्ये त्यांचं बहुमत नव्हतं त्याही ठिकाणी त्यांनी सत्ता स्थापन केली. संसदीय पद्धतीच्या, ज्या मार्गदर्शनतत्व आहेत त्या सगळ्याला हरताळ फासून सत्तेचा गैरवापर हा कसा केला जातो हे या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपने दाखवलं. 

त्या त्या राज्यामध्ये जिथं चुकीच्या पद्धतीने सत्ता स्थापन केली त्याठिकाणी काही कोर्टाच्या केसेस चालू आहेत, काही ठिकाणी निकाल घडलेले आहेत आहेत. आता महाराष्ट्राची ही वेळ आलेली आहे. महाराष्ट्रात 288 च्या सदनामध्ये 162 हे आज या ठिकाणी हजर आहेत . आणि याच पेक्षा आणखीन काही लोक ज्यांनी आम्हा काही प्रमुख सहकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे. पण प्रत्यक्ष प्रमाणे आम्ही त्यांचं लिखित स्वरूपात पत्र घेऊ शकलेलो नाही ते प्राप्त झाल्याशिवाय आम्ही त्यांचे संकेत किंवा त्यांची नावं ही आम्ही या ठिकाणी जाहीर करू इच्छित नाही. 

उद्याच्याला आपण सामोरं जायला तयार आहोत. सुप्रीम कोर्ट उद्याच्याला काहीतरी सांगेल, ज्यादिवशी सुप्रीम कोर्टाने मतदान करून बहुमत स्पष्ट करा असा आदेश दिला जाईल तो पूर्णपणे पाळण्याची आपल्या सगळ्यांची तयारी आहे. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण याठिकाणी येणार नाही. माझ्या कानावर असं येतंय की काहीतरी शंका गैरसमज, विशेषतः नवीन  सदस्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम केलं जातंय. आता उदाहरणार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एक महिन्याच्या पूर्वी निवडणुकीच्या निकालानंतर नेत्याची निवड केली श्रीयुत अजित पवार यांची. आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निकाल घेतला.  हा पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध आहे आणि म्हणून पक्षांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई केली. असं सांगण्यात येतं की ते पक्षाचे नेते होते, होते आणि त्यामुळे  काहीतरी व्हीप द्यायचा अधिकार आहे. त्या व्हीप ची अंमलबजावणी केली नाही तर त्यांचं सदस्यत्व जाईल. आणि या न त्या पद्धतीने नव्या सदस्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम किंवा भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.  

मी स्पष्ट आपल्याला सांगू इच्छितो, की ज्या व्यक्तीवर, व्यक्तीला पक्षातून बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्या पदावर असलेल्या, ज्याला पदावरून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.. त्याला पक्षाच्या संदर्भात कुठलाही निर्णय, कुठलाही आदेश हा काढण्याच्या संबंधीचा अधिकार नाही. देशाच्या  पार्लमेंटमध्ये संसदीय विभागाकडून या संबंधीची माहिती घेतली. घटना तज्ज्ञांकडून माहिती घेतेली आणि महाराष्ट्रात विधीमंडळामध्ये  अनेक वर्षांपासून कामं केली अशा जेष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांची लिखित पत्र आम्ही घेतली. याठिकाणी आदेश द्यायचा अधिकार जो पक्षातून सस्पेंड झालाय त्याला नाही आणि त्यामुळे कोणी काही सांगत असेल, आमचं सदस्यत्त्व रद्द होईल त्यांना सांगतो की त्याची पूर्ण जबाबदारी मी व्यक्तिगत घ्यायला तयार आहे त्याठिकाणी अशी काही स्थिती नाही.

आणि जे सांगतायत त्यानी कृपा करून सदस्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा संभ्रम करू नये असं या ठिकाणी मी मुद्दाम आग्रहाने सांगू इच्छितो. मी यापेक्षा अधिक याठिकाणी सांगण्याची काही आवशकता नाही. मतदान होईल, त्या मतदानामध्ये आपण 162 पेक्षा अधिक सदस्य त्या दिवशी स्पष्ट सिद्ध करू आणि अवैध मार्गाने सत्तेवर आलेल्या या व्यक्तींना आपण सत्तेपासून तातडीने दूर करू. आणि यापूर्वी आपण जे निर्णय घेतलेत. पक्षाच्या प्रमुखांनी बसून त्या निर्णयाची अंमलबजावणी करणारं नवीन सरकार याठिकाणी सत्याच्या मार्गाने स्थापन, संसदीय मार्गाने  स्थापन  करू हाच एक विश्वास याठिकाणी मी तुम्हाला देतो.

आता दोन दिवस का तीन दिवस हे आता सुप्रीम कोर्ट सांगेल आणि जे काही सुप्रीम कोर्टाने सांगितलं असेल त्या दिवसाची कारवाई संपल्यानंतर मला खात्री आहे राज्यपालांना तुम्हालाच बोलवलं लागेल. इतर ठिकाणी काही गोवा किंवा मणिपुरमध्ये गोष्टी चालल्या, पण हे गोवा नाहीये 'ये महाराष्ट्र है', महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये काहीही खपवून घेण्यासाठी आपणलोक समंजस आहोत. आपण लोक योग्य ला योग्य म्हणतो आणि म्हणजे जे योग्य नाही हे लादण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धडा शिकवण्याची ताकद या महाराष्ट्रात आहे. आणि यावेळेला आणखीन एक गोष्ट आमच्याकडे आहे, की आतापर्यंत आम्ही सगळे जण हे काम करत होतो, पण आता आमच्याबरोबर शिवसेना आली, त्यामुळे धडा शिकवण्याच्या भाषेमध्ये.... जास्त काही सांगत नाही.. अधिक याठिकाणी बोलण्याची गरज नाही.

आपण सगळे जण एकत्र राहू, या संसदीय मार्गावर घाला घालण्याचं काम भाजप कडून केलं जातंय. ते महाराष्ट्रात आम्ही कदापि होऊन देणार नाही हा इतिहास आपण तयार करू एव्हढंच याठिकाणी सांगतो.. तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.  

Webtitle : full speech of sharad pawar while having talk with mahavikas aaghadi MLAs

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.