Ganesh Visarjan 2023 : यंदाच्या श्रीगणेशोत्सवात पाच दिवसांच्या एकूण २९ हजार ७९२ घरगुती गणेशमूर्ती; तर ५९८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. गत वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावात घरगुती मूर्ती विसर्जनाची संख्या तब्बल १८ हजार २०६ने वाढली आहे.
उत्साही आणि आनंदमयी वातावरणात पाच दिवसांचे गणेशमूर्ती विसर्जन पार पडल्यानंतर महापालिकेने आज (ता. २४) सकाळी वेगवेगळ्या समुद्रकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत महानगरपालिका कर्मचारी, कामगारांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी श्रमदान करत निर्माल्यासह प्लास्टिक तसेच भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा गोळा करून किनारा स्वच्छ केला.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे, त्याचप्रमाणे स्वच्छ मुंबई ही संकल्पना अधिक व्यापकतेने राबविण्यासाठी, सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी महापालिकेने मागील काही दिवसांत विशेष मोहीम राबवली आहे. याअंतर्गत दैनंदिन स्वच्छतेसह सध्याच्या गणेश उत्सव कालावधीत निरनिराळ्या स्वच्छता उपक्रमांवर भर दिला जात आहे. पाचव्या दिवसाच्या गणेश मूर्तींचे शनिवारी विसर्जन करण्यात आले. त्यात नैसर्गिक स्थळांसह कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करण्यासदेखील मुंबईकर नागरिकांची पसंती मिळाली आहे. पर्यावरणपूरक गणेश उत्सवास जनतेकडून प्राधान्य मिळत असून त्यातून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यास हातभार लागतो आहे.
यंदा पाच दिवसांच्या एकूण २९ हजार ७९२ घरगुती गणेशमूर्ती; तर ५९८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या आहेत. गतवर्षी (२०२२) पाचव्या दिवशी ११ हजार ५८६ घरगुती; तर ३७७ सार्वजनिक गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावात घरगुती मूर्ती विसर्जनाची संख्या १८ हजार २०६ ने वाढली आहे.
- रमाकांत बिरादार, उपायुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सवाचे समन्वयक
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा!
सकाळी स्वराज्य भूमी (गिरगाव चौपाटी), दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा आदी किनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या विशेष स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. सागरी समृद्धी अबाधित ठेवण्यासाठी व मुंबई स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे महापालिकेच्या उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी सांगितले.
कुठे किती कचरा?
- जी उत्तर विभागात, माहीम समुद्रकिनारी महापालिका कर्मचाऱ्यांसह ‘युनायटेडवेज’ या स्वयंसेवी संस्थेच्या ६२ स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवत ५.६ मेट्रिक टन कचरा संकलित केला.
- के पश्चिम विभागाच्या वतीने वर्सोवा समुद्रकिनारी ५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ४० स्वयंसेवकांनी त्यात सहभाग घेतला.
- के पश्चिम विभागाच्या वतीने ‘वारसा आणि पर्यावरण संवर्धन फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या ५० स्वयंसेवकांच्या सहकार्याने जुहू समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात ५.५ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.
- पी उत्तर विभागाच्या वतीने आणि धीरजलाल शहा महाविद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी एकत्रित मिळून मार्वे समुद्रकिनारी स्वच्छता केली. या मोहिमेत चार मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला.
- ए विभागाच्या वतीने बधवार पार्क येथे स्वच्छता मोहीम राबवत चार मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. ११ स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.