महाड - मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरण कामात महामार्गालगत निर्माण होत असलेला कचरा नडगाव गावाजवळ सावित्री नदी पात्रात टाकण्यात आल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत जागरूक नागरिकांनी संबंधित कंपनीकडे तक्रार करताच हा संपूर्ण कचरा पुन्हा उचलण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण काम सद्या वेगाने सुरु आहे. महाड जवळ एस.टी. स्थानक जोड रस्त्यालगत गेली अनेक वर्षापासून भंगार गोदामाचा कचरा पडून होता. महामार्ग चौपदरीकरण काम करणाऱ्या एल. अॅंड. टी. कंपनीने हा कचरा उचलण्यासाठी सहठेकेदार नेमला आहे. या सहठेकेदाराने उचललेला कचरा नडगाव गाव परिसरात सावित्री नदीच्या कोरड्या पात्रात टाकून दिला. हा प्रकार येथील एका स्थानिक नागरिकाच्या लक्षात येताच त्याने याबाबत कचरा टाकणाऱ्या ट्रक चालकाला विचारले असता त्याने कंपनीच्या एका सुपरवायझरने हा कचरा येथे टाकण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. नदी पात्रात कचरा टाकणे पर्यावरण दृष्ट्या धोकादायक आहे. या कचऱ्यात काचा, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक, प्लास्टिक पिशव्या, आदीचे प्रमाण अधिक होते. यामुळे भविष्यात नदीतील जलचर आणि स्थानिक शेतकरी, मासेमारी करणारे आदिवासी यांना त्रास होणार होता. यामुळे हा कचरा येथून उचलला जावा आणि डंपिंग क्षेत्रात किंवा कचरा विघटन प्रकल्पात घेवून जाण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक जगमोहन नायडू यांनी हा कचरा येथून तत्काळ उचलला जाईल असे स्पष्ट करून. अवघ्या कांही तासातच हा कचरा नदीतून उचलण्यात आला. महामार्ग चौपदरीकरण होणे काळाची गरज आहे मात्र या कंपनीच्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जागोजागी पडलेले खड्डे, धुळीचा त्रास होत असलेल्या ठिकाणी पाणी न मारणे, भर दिवसा ब्लास्टिंग करणे आदीमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास जाणवत आहे.
महाड शहराच्या प्रवेशद्वाराजवळ साचलेला कचरा नदीत टाकण्यापासून एका स्थानिक नागरिकाने रोखला असला तरी हाच कचरा पुन्हा विसावा हॉटेल ते नडगाव दरम्यान रस्त्यालगत कामाच्या भरावात टाकला जात आहे. ज्या ठिकाणी हा कचरा टाकला जात आहे त्याच्या खालील बाजूला नदी प्रवाह आहे त्यामुळे हा कचरा पुन्हा नदीत जाण्याची भीती आहे. महामार्ग विभाग या बाबत प्रतिक्रिया देण्यास तयार नाही.
Garbage directly into Savitri river basin due to construction of goa highway
-----------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.